क्रीडा

वेस्ट इंडिजचा झिम्बाब्वेवर ३१ धावांनी शानदार विजय; सुपर-१२मध्ये प्रवेशाच्या आशा पल्लवित

वृत्तसंस्था

टी-२० विश्वचषक स्पर्धेतील पात्रता फेरीच्या सामन्यात वेस्ट इंडिजने झिम्बाब्वेवर ३१ धावांनी विजय मिळवत सुपर-१२मध्ये प्रवेशाच्या आशा पल्लवित ठेवल्या. विजयासाठी १५४ धावांचा पाठलाग करताना झिम्बाब्वेचा संघ १८.२ षटकांत १२२ धावांत गारद झाला. अवघ्या १६ धावांच्या मोबदल्यात चार विकेट‌्स घेणाऱ्या अल्झारी जोसेफला सामनावीर म्हणून गौरविण्यात आले.

झिम्बाब्वेने वेस्ट इंडिजला १५३ धावात रोखल्यानंतर दोन वेळा टी-२०चे विजेतेपद पटकाविणारा विंडीज संघ पात्रता फेरीतच गारद होण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र विंडीजच्या गोलदाजांनी आपल्या प्रभावी गोलंदाजी करीत माफक धावसंख्येचा यशस्वी बचाव केला. गोलंदाजांनी झिम्बाब्वेचा डाव १२२ धावात संपुष्टात आणून पहिला विजय साकारला. विंडीजकडून अल्झारी जोसेफने चार षटकात १६ धावा देत ४ विकेट्स घेतल्या. अनुभवी जेसन होल्डरने १२ धावांमध्ये तीन विकेट्स टिपल्या.

विजयासाठी १५४ धावांचा पाठलाग करताना झिम्बाब्वेने आपल्या डावाची आक्रमक सुरूवात केली होती. दोन षटकांत २९ धावांपर्यंत मजल मारली होती. तिसऱ्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर अल्झारी जोसेफने कर्णधार रेगिस चकाब्वाला १३ धावांवर त्रिफळाचीत करून झिम्बाब्वेच्या डावाला खिंडार पाडले. त्यानंतर जोसेफनेच पाचव्या षटकातील चौथ्या चेंडूवर टोनी मुनयोंगाला दोन धावांवर बाद केले. सहाव्या षटकातील पहिल्या चेंडूवर मॅकॉयने विलियम्सला एक धावेवर बाद केले. विजली मॅधवेरेचा (१९ चेंडूत २७ धावा) जम बसलेला असतानाच होल्डरने त्याची विकेट घेतली.

झिम्बाब्वेची अवस्था ४ बाद ५८ अशी झाल्याने सर्व भार अनुभवी सिकंदर रझावर असतानाच त्याला ओडेन स्मिथने अवघ्या १४ धावांवर बाद केले. झिम्बाब्वेचा मॅच विनरच माघारी परतला. यानंतर विंडीजची सामन्यावरील पकड मजबूत झाली. झिम्बाब्वेची अवस्था १५.३ षटकात ८ बाद १०२ अशी झालेली असतानाच शेपूट वळवळले. तळातील फलंदाज ल्युक जाँगवेने २२ चेंडूंत २९ धावांची आक्रमक खेळी करत कडवी झुंज दिली. परंतु जोसेफने त्याचा त्रिफळा उडविला. होल्डरने तेंदई चताराचा तीन धावांवर त्रिफळा उडवत विंडीजचा विजय निश्चित केला.

त्याआधी, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या वेस्ट इंडिजला झिम्बाब्वेने ७ बाद १५३ धावसं‌ख्येवर रोखले. झिम्बाब्वेच्या गोलंदाजांनी १० षटकांत १ बाद ७७ अशा सुस्थितीत असणाऱ्या वेस्ट इंडिजची अवस्था ६ बाद १०१ धावा अशी केली. सिकंदर रझाने चार षटकांत १९ धावांच्या मोबदल्यात चार बळी टिपले. विंडीजकडून जॉन्सन चार्ल्सने ३६ चेंडूंत सर्वाधिक ४५ धावा केल्या. रोव्हमन पॉवेलने २१ चेंडूत आक्रमक २८ धावा केल्या. अन्य फलंदाजांना अपेक्षित कामिगरी करण्यात अपयश आले.

ठाकरेंसाठी मोदींची साखरपेरणी; बाळासाहेबांवर स्तुतिसुमने

प्रज्वल, रेवण्णा नव्याने अडचणीत

‘वंदे भारत मेट्रो’ पश्चिम रेल्वेवर धावणार? मुंबईत पहिली ट्रेन जुलैमध्ये येण्याची शक्यता

केजरीवाल यांच्या अंतरिम जामिनावर विचार होऊ शकतो; निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाचे संकेत

अकोला : दोन कारची भीषण टक्कर, ६ जण ठार ; आमदार सरनाईकांच्या नातलगांचा मृतांमध्ये समावेश