क्रीडा

एक लाख क्षमतेच्या नव्या क्रिकेट मैदानासाठी जागा देणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

मुंबई क्रिकेट असोसिएशनला चार वर्षांनंतर शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. त्यावेळी मुंबई क्रिकेट असोसिएशनने एक लाख क्षमतेचे भव्य क्रिकेट मैदान उभारावे. मुंबई क्रिकेट असोसिएशनने प्रस्ताव दिल्यास या मैदानासाठी जागा उपलब्ध करून देण्यात येईल. तसेच शासन स्तरावर सर्व सहकार्य करू, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

Swapnil S

मुंबई : मुंबई क्रिकेट असोसिएशनला चार वर्षांनंतर शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. त्यावेळी मुंबई क्रिकेट असोसिएशनने एक लाख क्षमतेचे भव्य क्रिकेट मैदान उभारावे. मुंबई क्रिकेट असोसिएशनने प्रस्ताव दिल्यास या मैदानासाठी जागा उपलब्ध करून देण्यात येईल. तसेच शासन स्तरावर सर्व सहकार्य करू, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. आजच्या या सोहळ्यामध्ये क्रिकेटची पंढरी असलेल्या वानखेडे मैदानावरील स्टॅन्ड्सला जागतिक स्तरावर देशाचे नाव उज्ज्वल करणाऱ्या व्यक्तींचे नाव देण्यात येत असल्याबद्दल अभिमान वाटतो, अशी भावनाही यावेळी फडणवीस यांनी व्यक्त केली.

मुंबई क्रिकेट असोसिएशनने आयोजित केलेल्या वानखेडे मैदानातील स्टॅन्डच्या नामकरण सोहळ्यात मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. ‘ज्या ठिकाणी देव असतो तीच खरी पंढरी असते आणि या वानखेडे मैदानावर क्रिकेटचा देव असलेल्या सचिन तेंडुलकर यांचा पुतळा आहे. पुढील ५० वर्षे वानखेडे मैदान क्रिकेटसाठी आयकॉनिक असणार आहे. या वानखेडे मैदानावर अनेक दिग्गज खेळाडू घडले आहेत. रोहित शर्मा हा भारताच्या सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक आहे. पाठोपाठ दोन आंतरराष्ट्रीय स्पर्धा त्याने भारतासाठी जिंकून इतिहास रचला आहे. एखादा खेळाडू खेळत असतानाच त्याचे नाव मैदानातील स्टॅन्डला देण्याचा हा वानखेडेच्या इतिहासातील पहिलाच क्षण असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

शरद पवार यांचे क्रिकेटमधील योगदान मोठे आहे. देशातील क्रिकेटची उंची वाढवण्याचे मोठे कार्य त्यांनी केले आहे. भारतीय क्रिकेटचा विकास करणाऱ्या प्रशासकांमध्ये शरद पवार हे अग्रेसर असल्यामुळे त्याचे नाव वानखेडे मैदानावरील स्टॅन्डला देणे योग्यच आहे. अजित वाडेकर यांनी परदेशात जिंकण्याची सवय भारतीय क्रिकेटला लावली. १९७१ मध्ये पहिल्यांदा वेस्ट इंडिज आणि इंग्लंड अशा दोन्ही देशांसोबत मालिका जिंकून त्यांनी इतिहास रचला. आज त्यांच्या नावाच्या स्टॅन्डचे अनावरण होत आहे ही अभिमानाची गोष्ट आहे. अमोल काळे यांनी मुंबई क्रिकेट असोसिएशनमध्ये असताना कमी कालावधीमध्ये फार मोठे काम केले आहे. क्रिकेटसाठी उत्तम ते सर्व करण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे. त्यांनी क्रिकेटसाठी पाहिलेले स्वप्न मुंबई क्रिकेट असोसिएशन नक्कीच पूर्ण करेल, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.

रोहितने इच्छा पूर्ण करावी!

रोहित शर्माने लगावलेला फटका रोहित शर्माच्या नावाच्या स्टॅन्डमध्ये गेल्याचे पाहणे हे भाग्याचे असेल. त्याने लवकरच असा क्षण आमच्यासाठी आणावा आणि आम्हा सर्वांची इच्छा पूर्ण करावी, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

बीसीसीआयचे अध्यक्ष व खासदार शरद पवार म्हणाले की, वानखेडे उभारणीमध्ये तत्कालिन क्रीडा मंत्री म्हणून योगदान दिले. वानखेडे मैदानास मोठा इतिहास आहे. अनेक खेळाडू या मैदनावर घडले आहेत. क्रिकेटमधील महान खेळाडूंच्या योगदानाचा सन्मान मुंबई असोसिएशनने नेहमीच केला आहे. रोहित शर्माचे नाव आज देशाच्या घराघरात पोहचले आहे. त्याच्या कर्तृत्वाची कायम आठवण रहावी यासाठी त्याचे नाव देण्याच्या निर्णयाबद्दल मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अभिनंदन.

यावेळी मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अजिंक्य नाईक, उपाध्यक्ष संजय नाईक, सचिव अभय हडप यांच्यासह मुंबई इंडियन्सचे खेळाडू, तसेच दिलीप वेंगसरकर, रवी शास्त्री यांच्यासह मुंबई क्रिकेट असोसिएशनचे पदाधिकारी, विविध क्लब्सचे सचिव व क्रिकेटप्रेमी उपस्थित होते.

आयुष्यातील आजचा हा क्षण विशेष – रोहित
खेळत असतानाच वानखेडे मैदानावरील एका स्टॅन्डला नाव लागणे हा माझ्यासाठी मोठा अभिमानाचा क्षण आहे. देशासाठी खेळताना मिळालेला हा सन्मान आहे. आजचा दिवस विशेष आहे. वानखेडे मैदानात नाव असणे तेही अनेक दिग्गज क्रिकेट खेळाडूंसोबत हा मोठा सन्मान आहे, असे भारताचा माजी कर्णधार रोहित शर्मा म्हणाला.

दुबईत अडकलेल्या भारतीयांना दिलासा; मध्यपूर्व तणावानंतर उड्डाणाला सुरुवात, प्रवासी मुंबईत दाखल, Video

मध्यपूर्व संघर्षानंतर महाराष्ट्र सरकारकडून व्हॉट्सॲप हेल्पलाइन सुरू; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार म्हणाल्या, "नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य...

"कृपया मला मदत करा…"; विशाखा सुभेदारांचा मुलगा अडकला कुवेतमध्ये, अभिनेत्रीला अश्रू अनावर; Video

Mumbai : लोकलला बांधून नेलं होळीचं झाड; विरार ते माहीम जल्लोषमय प्रवास, कोळी बांधवांची अनोखी परंपरा चर्चेत; Video

लग्नाच्या वाटेतील अडथळा ठरला लिव्ह-इन पार्टनर; अभिनेत्रीने प्रियकरासोबत रचला खुनाचा डाव, तब्बल १२ दिवस…