क्रीडा

भारतीय महिला सलग ९ व्यांदा आशिया चषकाच्या अंतिम फेरीत; बांगलादेशचा १० गडी राखून धुव्वा; रविवारी जेतेपदासाठी श्रीलंकेशी गाठ

Swapnil S

दाम्बुला : वेगवान गोलंदाज रेणुका सिंग (१० धावांत ३ बळी) आणि डावखुरी फिरकीपटू राधा यादव (१४ धावांत ३ बळी) यांनी केलेल्या प्रभावी गोलंदाजीच्या बळावर भारतीय महिला संघाने आशिया चषक टी-२० क्रिकेट स्पर्धेतील उपांत्य फेरीत बांगलादेशचा तब्बल १० गडी आणि ५४ चेंडू राखून फडशा पाडला. याबरोबरच भारताने तब्बल सलग नवव्यांदा अंतिम फेरीत धडक मारली.

बांगलादेशमध्ये ३ ते २० ऑक्टोबरदरम्यान महिलांचा टी-२० विश्वचषक खेळवण्यात येणार आहे. त्या स्पर्धेच्या निमित्ताने आशिया चषकाचे महत्त्व वाढले आहे. २०२२मध्ये झालेल्या आशिया चषकात भारतीय संघाने श्रीलंकेला धूळ चारून सातव्यांदा जेतेपद मिळवले होते. आतापर्यंत ४ वेळा एकदिवसीय, तर ४ वेळा टी-२० प्रकारात महिलांची ही स्पर्धा खेळवण्यात आली आहे. त्यापैकी २०१८मध्येच भारताला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. अन्यथा प्रत्येक वेळी भारतानेच बाजी मारली आहे.

दरम्यान, शनिवारी झालेल्या या उपांत्य सामन्यात प्रथम गोलंदाजी करताना भारताने बांगलादेशला २० षटकांत ८ बाद ८० धावांत रोखले. रेणुकाने पॉवरप्लेमध्येच दिारा अख्तर (६), मुर्शीदा खातून (४), इश्मा तांझिम (८) यांचे बळी मिळवले. तर मधल्या षटकात राधाने कर्णधार निगर सुल्ताना (३२), रुमाना अहमद (१), नाहिदा अख्तर (०) यांना जाळ्यात अडकवले. त्यामुळे बांगलादेशला १०० धावाही करता आल्या नाहीत.

मग महाराष्ट्राच्या स्मृती मानधनाने ३९ चेंडूंतच ९ चौकार व १ षटकारासह नाबाद ५५ धावांची धडाकेबाज खेळी साकारून भारताचा ११ षटकांतच विजय साकारला. शफाली वर्माने २८ चेंडूंत नाबाद २६ धावा करताना स्मृतीसह ८३ धावांची सलामी नोंदवली.

श्रीलंकेची पाकिस्तानवर सरशी

भारतासमोर रविवारी होणाऱ्या अंतिम लढतीत श्रीलंकेचे आव्हान असेल. चामरी अटापटूच्या ४८ चेंडूंतील ६३ धावांच्या झुंजार खेळीमुळे श्रीलंकेने दुसऱ्या उपांत्य सामन्यात पाकिस्तानचा १ चेंडू व ३ गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने २० षटकांत ४ बाद १४० धावा केल्या. मात्र अटापटू व अनुष्का संजीवनीच्या (नाबाद २४) योगदानामुळे श्रीलंकेने १९.५ षटकांत विजय मिळवला.

संक्षिप्त धावफलक

बांगलादेश : २० षटकांत ८ बाद ८० (निगर सुल्ताना ३२; रेणुका सिंग ३/१०, राधा यादव ३/१०) पराभूत वि. भारत : ११ षटकांत बिनबाद ८३ (स्मृती मानधना नाबाद ५५, शफाली वर्मा नाबाद २६), सामनावीर : रेणुका सिंग

Jammu Kashmir Election : नंदनवनात आज अखेर मतदान; २४ जागांसाठी २१९ उमेदवार रिंगणात

One Nation, One Election ची अंमलबजावणी कधी? केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचे मोठे विधान

सुप्रीम कोर्टाने रोखला 'बुलडोझर न्याय'! आमच्या परवानगीशिवाय एकही पाडकाम नको; पुढील सुनावणीपर्यंत आदेश

सगेसोयरे अधिसूचनेवर सरकारनियुक्त समित्यांचे काम सुरू; कोणत्याही समाजाची फसवणूक करणार नाही - मुख्यमंत्री

विधानसभा निवडणुकीची आचार संहिता कधी लागू होणार? गिरिश महाजनांनी वर्तवले भाकीत