दुबई : सात वेळचा विजेता भारत रविवारी महिला टी-२० आशिया कपच्या अंतिम सामन्यात श्रीलंकेविरुद्ध मैदानात उतरणार असून, विक्रमी आठवे जेतेपद पटकावण्याचे भारतीय संघाचे लक्ष्य आहे. श्रीलंकेच्या जिद्दी संघाला नमवण्यासाठी भारताला शेफाली वर्मा आणि दीप्ती शर्मा यांच्याकडून पुन्हा एकदा निर्णायक कामगिरीची अपेक्षा आहे.
शेफालीने या स्पर्धेत आतापर्यंत दोन अर्धशतकांसह १६८ धावा केल्या असून, ती भारताची सर्वाधिक धावा करणारी फलंदाज आहे. दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवरील संथ आणि फिरकीला अनुकूल खेळपट्ट्यांवरही तिने कोणताही दबाव न घेता सातत्यपूर्ण फलंदाजी केली आहे.
स्मृती मानधनाने १५४ धावा केल्या असल्या तरी तिच्या कामगिरीत सातत्याचा अभाव दिसून आला आहे. तिने शानदार शतक झळकावले, मात्र दोन सामन्यांत तिची धावसंख्या एकेरी राहिली. याउलट शेफालीने सातत्य राखताना इतर फलंदाजांना अडचणींचा सामना करावा लागत असतानाही आपले फटके सहजपणे खेळले आहेत. अचूक टप्प्यावर गोलंदाजी करून धावा रोखणारी फिरकी गोलंदाज श्री चरणी आणि लयीत येत असलेली प्रेमा रावत यांच्या उपस्थितीत भारताची फिरकीची फळी अधिक भक्कम झाली आहे.
या स्पर्धेतील अनेक सामन्यांमध्ये भारतीय फिरकीपटूंनी वर्चस्व गाजवले असून, या आघाडीचे नेतृत्व दीप्ती करत आहे. दोन्ही संघांनी अंतिम फेरीपर्यंतचा प्रवास अपराजित राहून केला आहे. मात्र, भारताला श्रीलंकेच्या जिद्दी संघापासून सावध राहावे लागेल. २०२४च्या मागील आवृत्तीच्या अंतिम सामन्यात श्रीलंकेने भारताचा तब्बल आठ गडी राखून पराभव केला होता.
अटापट्टूच्या नेतृत्वाखालील श्रीलंकेने कर्णधाराप्रमाणेच आपल्या संकटाच्या परिस्थितीत हार न मानण्याची वृत्ती दाखवली आहे. पाकिस्तानविरुद्धच्या उपांत्य सामन्यात याचे ताजे उदाहरण पाहायला मिळाले. श्रीलंकेची सुरुवात अत्यंत खराब झाली होती. पहिल्या दोन षटकांतच २ बाद ५ अशी अवस्था झाल्यानंतर सातव्या षटकात त्यांची धावसंख्या ४ बाद ३३ झाली होती. तरीही त्यांनी १३१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग सोडला नाही.
हर्षिता समरविक्रमेने ३६ धावांची सर्वोच्च खेळी करताना कविशा दिलहारीच्या ३३ धावांच्या साथीने डाव सावरला. त्यानंतर निलाक्षिका सिल्वा आणि कौशिनी नुथ्यांगना यांनी संयमाने फलंदाजी करत श्रीलंकेला विजय मिळवून दिला.
दोन वर्षापूर्वी दाम्बुला येथे झालेल्या अंतिम सामन्यातही हर्षिताने अटापट्टसोबत भारताला धक्का दिला होता. दोन्ही श्रीलंकन फलंदाजांनी अर्धशतके झळकावत मोठ्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग केला होता. २०२४च्या अंतिम सामन्यातील बहुतांश खेळाडू यंदाही अंतिम सामन्यात आमनेसामने येणार असल्याने हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ कोणतीही कसर सोडणार नाही. मात्र, भारतीय संघासमोर काही गंभीर चिंता कायम आहेत.
स्पर्धेच्या सलामीच्या सामन्यात थायलंडविरुद्धही भारताने दोन झेल सोडले होते. त्यामुळे चार सामन्यांत भारताने आतापर्यंत एकूण नऊ झेल सोडले आहेत. अंतिम सामन्यात श्रीलंकेसारख्या जिद्दी संघाविरुद्ध ही चूक भारताला महागात पडू शकते.
हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीया संघाला स्मृती मानधना, भारती फुलमाळी, रिचा घोष, गुणालन कमलिनी, प्रतिका रावल, शेफाली वर्मा, दीप्ती शर्मा, क्रांती गौड, रेणुका सिंह ठाकूर, नंदनी शर्मा, श्री चरणी आणि राधा यादव यांच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे.
प्रतिस्पर्धी संघ
श्रीलंका: चमारी अटापट्टू (कर्णधार), हर्षिता समरविक्रमा (उपकर्णधार), इमेशा दुलानी, विष्मी गुणरत्ने, कौशिनी नुथ्यांगना (यष्टिरक्षक), संजना कविंदी, हसिनी परेरा, निलाक्षिका सिल्वा, कविशा दिलहारी, मिथाली अयोध्या, काव्या कविंदी, सुगंधिका कुमारी, निमाशा मीपागे, चामुडी प्रबोधा, चेथाना विमुक्ती.
भारत : हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), भारती फुलमाळी, रिचा घोष (यष्टिरक्षक), गुणालन कमलिनी (यष्टिरक्षक), प्रतिका रावल, शेफाली वर्मा, दीप्ती शर्मा, क्रांती गौड, प्रेमा रावत, अरुंधती रेड्डी, रेणुका सिंह ठाकूर, नंदनी शर्मा, श्री चरणी, राधा यादव.