कोची : महिला प्रीमियर लीगच्या (डब्ल्यूपीएल) २०२७ हंगामासाठी बुधवारी कोची येथे झालेल्या खेळाडूंच्या लिलावात यूपी वॉरियर्सने ऑस्ट्रेलियाची कर्णधार आणि फिरकीपटू सोफी मोलिन्यू हिला १ कोटी १० लाख रुपयांना खरेदी केले. यंदाच्या मिनी ऑक्शनमध्ये ती एकमेव कोट्यधीश खेळाडू ठरली. भारतीय खेळाडूंत किरण नवगिरे सर्वात महागडी ठरली. दिल्ली कॅपिटल्सने तिच्यावर ७५ लाखांची बोली लावली.
मोलिन्यूची मूळ किंमत ५० लाख रुपये होती. तिच्या अनुभवाचा आणि नेतृत्वगुणांचा फायदा संघाला होईल, असा विश्वास यूपी वॉरियर्सने व्यक्त केला. संघाने ऑस्ट्रेलियाची अनुभवी अष्टपैलू ग्रेस हॅरिस हिलाही ३० लाख रुपयांत खरेदी केले. भारतीय अष्टपैलू स्नेह राणा हिलाही संघाने ३० लाख रुपयांत आपल्या ताफ्यात सामील केले. बुधवारी झालेल्या या लिलावात दिल्ली आणि गुजरात जायंट्स यांनीही महत्त्वाच्या खेळाडूंना संघात स्थान दिले.
कॅप्री स्पोर्ट्सचे क्रिकेट संचालक क्षेमल वाईणकर यांनी मोलिन्यूच्या समावेशाबाबत समाधान व्यक्त केले. सोफी मोलिन्यू आणि ग्रेस हॅरिस या दोघींच्या उपस्थितीमुळे संघाला विविध संयोजनांचा विचार करता येईल, असे त्यांनी सांगितले. हॅरिस मधल्या फळीत आक्रमक फलंदाजीची ताकद देईल, तर मोलिन्यू उत्कृष्ट गोलंदाजी आणि नेतृत्वगुणांसह संघासाठी महत्त्वाची ठरेल, असेही ते म्हणाले. सोफी एक्लेस्टोन आणि मोलिन्यू यांची फिरकी जोडी प्रतिस्पर्ध्यांसाठी घातक ठरू शकते, असे त्यांनी नमूद केले.
दिल्ली कॅपिटल्सने आक्रमक फलंदाज किरण नवगिरे हिला ७५ लाख रुपयांत खरेदी केले. तिच्यासाठी मुंबई इंडियन्सनेही बोली लावली होती. याशिवाय दिल्लीने माजी यष्टिरक्षक-फलंदाज सुषमा वर्मा हिला ३० लाख रुपयांत संघात घेतले. स्कॉटलंडची डावखुरी फिरकीपटू कर्स्टी गॉर्डन आणि १५ वर्षीय अष्टपैलू उमा काश्वी यांना प्रत्येकी १० लाख रुपये देऊन स्थान दिले.
गुजरात जायंट्सने युवा भारतीय फलंदाज जी. कमलिनी हिला ४० लाख रुपयांत, तर आयर्लंडची अष्टपैलू ऑर्ला प्रेंडरगास्ट हिला ३० लाख रुपयांत खरेदी केले. गुजरातचे मुख्य प्रशिक्षक मायकेल क्लिंगर यांनी कमलिनी ही लिलावातील सर्वाधिक प्रतिभावान फलंदाज असल्याचे सांगितले. प्रेंडरगास्टच्या समावेशामुळे संघाला वेगवान गोलंदाजी आणि अष्टपैलू पर्याय उपलब्ध होतील, असेही ते म्हणाले.
दोन वेळच्या विजेत्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने ऑस्ट्रेलियाची जेस जोनासन हिला ४० लाख रुपयांत खरेदी केले. नितंबाच्या दुखापतीमुळे ती महिला बिग बॅश लीगमध्ये खेळणार नसली, तरी डब्ल्यूपीएल सुरू होईपर्यंत ती तंदुरुस्त होण्याची अपेक्षा आहे. यूपी वॉरियर्सने स्कॉटलंडची अष्टपैलू कॅथरीन ब्राइस हिला १० लाख रुपयांत घेतले. सहयोगी देशातील लिलावात विकली गेलेली ती पहिली खेळाडू ठरली.
दुसरीकडे, भारताची वेगवान गोलंदाज तितास साधू, माजी मुंबई इंडियन्स फिरकीपटू सायका इशाक, यष्टिरक्षक तानिया भाटिया आणि उमा छेत्री यांना पहिल्या फेरीत कोणत्याही संघाने खरेदी केले नाही. इंग्लंडची सोफिया डंकली हिलाही लिलावात खरेदीदार मिळाला नाही.
मुंबईचे युवा खेळाडूंवर लक्ष
मुंबई इंडियन्सने दिशा कासट, सानिका चाळके, भारती रावल आणि लतिका इनामदार या अनकॅप्ड भारतीय खेळाडूंना प्रत्येकी १० लाख रुपयांत खरेदी केले. मुंबईच्या विदेशी खेळाडूंचा कोटा लिलावापूर्वीच भरला होता. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वात खेळणाऱ्या मुंबई इंडियन्समध्ये नॅट शीव्हर ब्रंट, हीली मॅथ्यूज, अमेलिया कर, निकोला कॅरी, शबनिम इस्माइल व तारा नॉरिस हे सहा विदेशी खेळाडू आहेत. मुंबईकडून देशांतर्गत क्रिकेटमध्ये छाप पाडणाऱ्या सानिकाला मुंबई इंडियन्सने घेतल्याने आनंद व्यक्त केला जात आहे. इरा जाधवला मात्र कोणीही संघात घेतले नाही.
पाच महागडे खेळाडू
सोफी मोलिन्यू (अष्टपैलू) : यूपी वॉरियर्स (१.१० कोटी)
किरण नवगिरे (फलंदाज : दिल्ली कॅपिटल्स (७५ लाख)
गुणालन कमलिनी (यष्टिरक्षक) : गुजरात जायंट्स (४० लाख)
जेस जोनासन (अष्टपैलू) : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (४० लाख)
ग्रेस हॅरिस (सलामीवीर) : यूपी वॉरियर्स (३० लाख)