भिवंडी : दुर्दशा झालेल्या भिवंडी-वाडा रस्त्याच्या काँक्रीटीकरणाचे काम समाधानकारक वेगाने सुरू असून, येत्या पावसाळ्यापूर्वी या रस्त्यावरील एक मार्गिका पूर्ण करून वाहतुकीसाठी खुली करण्यात येणार असल्याची माहिती खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांनी दिली.
भिवंडी-वाडा रस्त्याची पाहणी केल्यानंतर विश्वभारती फाटा येथे बुधवारी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी ही माहिती दिली. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता दत्तू गीते उपस्थित होते. खा. सुरेश म्हात्रे म्हणाले की, भिवंडी-वाडा रस्ता गेल्या अनेक वर्षांपासून अत्यंत दुरवस्थेत असून, त्यामुळे वारंवार अपघात घडत होते. हा रस्ता आपल्या कार्यकाळात पूर्ण व्हावा यासाठी आपण सातत्याने पाठपुरावा केला.
सुरुवातीला ठेकेदाराने निधीअभावी काम रखडल्याची तक्रार केली होती. त्यानंतर शासन स्तरावर पाठपुरावा करून ठेकेदाराला १३८ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला. त्यामुळे सध्या रस्त्याचे काम वेगाने सुरू असून, ८ जूनपर्यंत विश्वभारती फाट्यापर्यंत काँक्रीटीकरणाचे काम पूर्ण होईल. त्यानंतर ३० जूनपासून या रस्त्याची एक मार्गिका वाहतुकीसाठी खुली करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. रस्त्याचे काम प्रगतीपथावर असल्याबद्दल समाधान व्यक्त करताना, नागरिकांना लवकरच खड्डेमुक्त आणि सुरक्षित प्रवासाचा दिलासा मिळेल, असा विश्वासही खासदार सुरेश म्हात्रे यांनी व्यक्त केला.