ठाणे : शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर ठाकरे गट आणि शिंदेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये नेहमीच खटके उडत असून रविवारी पुन्हा एकदा दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. ठाकरे गटाच्या वतीने ठाण्यात आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्याच्या आधी पक्षाचे नेते संजय राऊत यांनी टेंभीनाका परिसरात दिवंगत जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. काही क्षणातच त्याच ठिकाणी शिंदेंच्या शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते जमा झाले. दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते एकमेकांना भिडणार त्यापूर्वीच पोलिसांनी हस्तक्षेप करत अनुचित प्रकार थांबवला. मात्र, दोन्हीकडून यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. ठाकरे गटाकडून अभिवादन करण्यात आल्यानंतर अपवित्र हातांचा स्पर्श आनंद दिघे यांच्या पुतळ्याला झाला असल्याचा आरोप करत शिंदेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यानी आनंद दिघे यांच्या पुतळ्याला यावेळी दुधाने अभिषेक केला.
शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने ठाण्यातील एन.के.टी महाविद्यालयात रविवारी एका मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यासाठी पक्षाचे नेते संजय राऊत, विनायक राऊत, चंद्रकांत खैरे, माजी खासदार राजन विचारे आदी नेते उपस्थित होते. मेळावा सुरू होण्यापूर्वी संजय राऊत हे टेंभीनाका परिसरात शिवसेनेचे दिवंगत जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांना अभिवादन करण्यासाठी गेले. यावेळी संजय राऊत यांनी आनंद दिघे यांना अभिवादन करून त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर हे सर्व नेते त्या ठिकाणाहून निघून गेले. मात्र, याची माहिती शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांना मिळताच शहरप्रमुख हेमंत पवार, माजी नगरसेवक सुधीर कोकाटे, महिला आघाडी प्रमुख मीनाक्षी शिंदे आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते त्या ठिकाणी आले. त्यांनी संजय राऊत यांनी अर्पण केलेला हार काढून त्या ठिकाणी आनंद दिघे यांच्या पुतळ्याला दुधाने अभिषेक केला. आनंद दिघे यांच्या पुतळ्याला संजय राऊत यांचा अपवित्र स्पर्श झाल्याचा आरोप त्यांनी केला.
पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे अनर्थ टळला
टेंभीनाक्यावर तोपर्यंत दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आमनेसामने आले होते. दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना एकत्र येऊ न दिल्याने पुढचा अनर्थ टळला.