नामदेव शेलार/मुरबाड
मुरबाड तालुक्यातील १२५ ग्रामपंचायतींना 'हर घर नळ, हर घर जल' अभियानात शासनाने २०० पाणीपुरवठा योजनांसाठी १७३ कोटीचा निधी मंजूर करूनही पाणीटंचाईने उग्ररूप धारण केले आहे.
कोटी रुपयांच्या योजना कागदावरच राहिल्या असून, पाण्यासाठी महिलांना वणवण भटकावे लागत आहे. मुरबाड तालुक्यातील पाणीटंचाई फार पूर्वीपासून आहे; मात्र २० गावे वाड्या, पाडे गेली ५३ वर्ष टंचाईग्रस्त टँकरने पाणीपुरवठा म्हणून नियोजन आढावा बैठकीत नोंदवली जात आहेत. यंदाही या गावांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागणार आहे.
तालुक्यात २००५ ते २०१० कालावधीत तब्बल १८९ पाणीपुरवठा योजना राबवल्या होत्या; परंतु ठेकेदारांवर जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी मुरबाड पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहेत; त्याची चौकशी स्थानिक स्तरावर दडपण्यास ठेकेदारांना यश आले; तक्रारदार अधिकारीही थंडावल्याने मुरबाड तालुक्याची पाणीटंचाई अधिक तीव्र बनली. वाड्या-पाड्यांमधील पाणीटंचाई दूर व्हावी, यासाठी पुन्हा २०० योजना तालुक्यात मंजूर झाल्या, त्यासाठी १७३ कोटी रुपये अनुदान अदा करण्यात आले; मात्र ठेकेदारांनी अद्यापही कामे पूर्ण केली नसल्याने पुन्हा मुरबाड तालुक्यातील पाणीटंचाईत महिला वर्ग हैराण झाले आहेत. ज्याठिकाणी ४० योजना पूर्ण झाल्या; तेथेही नळाद्वारे पाणीपुरवठा होतो किंवा नाही याची माहिती पाणीपुरवठा अधिकाऱ्यांना अद्यापही माहिती नसल्याने गावकऱ्यांनी सांगितले.
मुरबाड तालुक्यातील २०० पैकी ४० योजना पूर्ण झाल्या आहेत, उर्वरित प्रगतीपथावर आहेत. ज्या गावात तीव्र पाणीटंचाई आहे, त्याचे प्रस्ताव वरिष्ठांकडे मंजुरीसाठी पाठवले आहेत. एप्रिल महिन्यात टँकरला मंजुरी मिळाल्यास पाणीपुरवठा सुरू केला जाईल.
- जगदीश बनकरी, उपअभियंता, पाणीपुरवठा विभाग, पंचायत समिती