डोंबिवलीतील राहुलनगर परिसरात शनिवारी घडलेल्या एका धक्कादायक घटनेने संपूर्ण परिसर हादरला. २२ वर्षीय ऋषिकेश परब नावाच्या तरुणाने ११व्या मजल्यावरून खाली उडी मारून आपलं जीवन संपवलं. हा प्रकार समोरच्या इमारतीतील एका व्यक्तीने मोबाईलमध्ये शूट केला असून तो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
प्राथमिक माहितीनुसार, ऋषिकेशचे प्रेयसीसोबत भांडण झाल्याने त्याने रागात ही पाऊल उचलल्याचे समजते. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेच्या आधी तो बराच वेळ जिन्यावर बसला होता. त्यानंतर सकाळी ८ च्या सुमारास तो थेट सुरक्षा भिंतीकडे गेला आणि बाहेरच्या बाजूला लटकून राहिला.
या क्षणी समोरच्या इमारतीत राहणाऱ्या एका तरुणाने संपूर्ण घटना मोबाईल कॅमेऱ्यात टिपली. त्याने त्वरित अग्निशमन दल व पोलिसांना बोलावले. मात्र, जवानांकडून बचावकार्य सुरू होण्यापूर्वीच त्याने हात सोडले आणि ११व्या मजल्यावरून कोसळून जागेवरच त्याचा मृत्यू झाला.
या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. प्राथमिक चौकशीत हा आत्महत्येचा प्रकार असल्याचे दिसत असले तरी, त्याने हे टोकाचे पाऊल का उचलले याचा सखोल तपास पोलीस करत आहेत.