नवनीत बऱ्हाटे/ उल्हासनगर
एका बाजूला महिलांच्या आणि नवजात बाळांच्या सोयीसाठी उभारलेले हिरकणी कक्ष आणि दुसऱ्या बाजूला त्याच ठिकाणी बेधडक सुरू असलेली दारूची मैफल! उल्हासनगर महापालिकेच्या शाळेच्या आवारात अज्ञात इसमांकडून मद्यपान केले जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे, हा प्रकार भरदिवसा घडत असूनही शाळा प्रशासन अनभिज्ञ असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे हिरकणी कक्ष हे स्तनपानासाठी आहेत की मद्यपानासाठी? असा संतप्त सवाल उपस्थित झाला आहे.
उल्हासनगर कॅम्प नंबर ३ मधील फार्व्हर लाइन परिसरात असलेल्या महापालिकेच्या शाळा क्रमांक २९ आणि ८ च्या आवारात तीन हिरकणी कक्ष बसवले आहेत. या कक्षांचा उपयोग स्तनदा मातांसाठी केला जातो, मात्र गुरुवारी दुपारी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते नरेश गायकवाड यांना या कक्षांपैकी एकात काही इसम मद्यपान करत असल्याची माहिती मिळाली. त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली असता, मद्यपी इसम गडबडून तिथून पळ काढू लागले. मात्र, त्यांच्या मागे मद्याच्या बाटल्या आणि ग्लास मात्र तिथेच पडून राहिले. या प्रकारानंतर हे इसम नेमके कोण होते, याबाबत उल्हासनगरमध्ये तर्कवितर्क सुरू झाले आहेत. प्रत्यक्षदर्शींच्या मते, हे इसम महापालिकेचेच सफाई कामगार असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मात्र, याबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.
या प्रकरणाने शाळेतील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दुपारी भर वर्ग सुरू असताना शाळेच्या आवारात असा प्रकार सुरू असेल, तर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचं काय? शाळेच्या आवारात अशा गैरप्रकारांना कुणाचा आशीर्वाद आहे? शाळेच्या मुख्याध्यापकांना आणि शिक्षकांना याची कल्पना नव्हती का? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, पालिका सुरक्षारक्षक या कक्षांची देखभाल करत नाहीत का? असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत. या संतापजनक प्रकारानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नरेश गायकवाड यांनी या घटनेची सखोल चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी महापालिकेकडे केली आहे. हिरकणी कक्षांचा मूळ उद्देश महिलांसाठी असून अशा प्रकारांनी त्याचा अपमान होत आहे. हा प्रकार अत्यंत गंभीर असून, भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी कठोर उपाययोजना करण्यात याव्यात, असे त्यांनी म्हटले आहे.
सुरक्षारक्षकांची कमतरता असल्याने नवीन कर्मचाऱ्यांची मागणी करण्यात आली होती. पहिल्या सत्राची समाप्ती झाल्यानंतर दुसरे सत्र सुरू होण्याच्या तयारीत असताना सफाई कर्मचारी कामात गुंतले होते आणि त्याचदरम्यान हा प्रकार घडला. जे काही घडले ते चुकीचे आहे. प्रशासन या प्रकरणाची सखोल तपासणी करत असून, दोषी आढळलेल्या व्यक्तींवर योग्य ती कारवाई केली जाईल.
- नीलम कदम (शिक्षण विभाग - उपलेखा अधिकारी )