उल्हासनगर : भारतीय रेल्वेच्या १७३ वर्षांच्या गौरवशाली इतिहासाचा स्मरणदिन साजरा होत असताना, या इतिहासाच्या मुळाशी असलेल्या उल्हासनगर-अंबरनाथ परिसरातील काकोळे रेल्वे डॅम आणि वालधुनी नदीची कथा आजही अनेकांसाठी अनोळखीच आहे. पहिल्या रेल्वेला पाणी पुरवणारा हा ऐतिहासिक डॅम तब्बल दीडशे वर्षे उपेक्षित राहिला होता. मात्र वर्षभरापूर्वी उभारण्यात आलेल्या एका फलकामुळे या विस्मृतीत गेलेल्या वारशाला नव्याने उजाळा मिळाला आहे. इतिहास, पर्यावरण आणि स्थानिक अभिमान यांची ही गुंफण आता जतनाची हाक देत आहे.
१६ एप्रिल १८५३ हा दिवस भारतीय रेल्वेच्या इतिहासातील सुवर्णक्षण मानला जातो. बोरिबंदर (छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस) ते ठाणे दरम्यान धावलेल्या पहिल्या प्रवासी रेल्वेने देशाच्या प्रगतीचा नवा मार्ग खुला केला. सुमारे ४०० प्रवाशांना घेऊन ३४ किलोमीटरचा प्रवास करणारी ही ‘ग्रेट इंडियन पेनिनसुला रेल्वे’ केवळ वाहतुकीची सुरुवात नव्हती, तर आधुनिक भारताच्या विकासाची नांदी होती.
या ऐतिहासिक प्रवासामागे अंबरनाथजवळील काकोळे गावातील रेल्वे डॅमचे योगदान अत्यंत महत्त्वाचे होते. त्या काळातील वाफेवर चालणाऱ्या इंजिनांना आवश्यक असलेले पाणी या डॅममधून वालधुनी नदीच्या माध्यमातून पुरवले जात होते. मात्र इतकी मोठी ऐतिहासिक भूमिका बजावणारा हा डॅम अनेक दशकांपासून दुर्लक्षित राहिला होता. इतिहास आणि पर्यावरणाचा हा दुर्मीळ संगम जपण्यासाठी काकोळे डॅम आणि वालधुनी नदीचे संवर्धन करणे अत्यंत आवश्यक आहे. योग्य नियोजन केल्यास हा परिसर पर्यटन आणि अभ्यासासाठी महत्त्वाचे केंद्र ठरू शकतो. रेल्वे दिनाच्या निमित्ताने उजळलेला हा इतिहास आता जतनाच्या दिशेने ठोस पावले उचलण्याची मागणी जोर धरत आहे.
औद्योगिक सांडपाण्यामुळे नदी प्रदूषित
एक वर्षापूर्वी रेल्वे दिनानिमित्त येथे ‘द ग्रेट इंडियन पेनिनसुला-काकोळे’ असा माहितीफलक लावण्यात आला आणि या ठिकाणाला नव्याने ओळख मिळाली. वालधुनी नदी अभ्यासक शशिकांत दायमा यांच्या सातत्यपूर्ण संशोधनामुळे हा इतिहास पुन्हा प्रकाशझोतात आला आहे. या डॅमशी संबंधित असलेली वालधुनी नदी पर्यावरणीयदृष्ट्या देखील अत्यंत महत्त्वाची आहे. श्रीमलंगगडातून उगम पावणारी ही नदी उल्हासनगर, एमआयडीसी आणि विविध भागांतून वाहत कल्याण खाडीत विलीन होते. मात्र गेल्या काही दशकांत औद्योगिक सांडपाण्यामुळे या नदीचे रूपांतर प्रदूषित नाल्यात झाले आहे.