कर्जत : कर्जत-कल्याण राज्यमार्गावरील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या डिकसळ शांतीनगर येथे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त भव्य डिजिटल बॅनर लावण्यात आला असून त्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
येथील शांतीदूत मंडळ आणि रमाबाई महिला मंडळ यांच्या वतीने उभारण्यात आलेला हा बॅनर ७० फूट लांब आणि ८ फूट उंच असून डॉ. आंबेडकर यांच्या ऐतिहासिक कार्याचा सविस्तर परिचय त्यामध्ये देण्यात आला आहे.
सध्या हा बॅनर संपूर्ण कर्जत तालुक्यात चर्चेचा आणि आदराचा विषय ठरत आहे.
या भव्य बॅनरचे आकर्षक डिझाईन पुणे येथे तयार करण्यात आले, तर त्याची छपाई कर्जत शहरात करण्यात आली आहे. विशेष म्हणजे हा बॅनर केवळ शुभेच्छापर नसून माहितीपर स्वरूपाचा आहे. त्यामध्ये डॉ. आंबेडकरांचे संपूर्ण जीवनकार्य, संविधान निर्मितीतील योगदान, महिलांचे अधिकार, कामगार प्रश्न आणि सामाजिक न्यायासाठी केलेले कार्य यांचा सविस्तर आढावा देण्यात आला आहे.
यामुळे हा बॅनर येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांसाठी प्रेरणादायी ठरत असून डॉ. आंबेडकर यांच्या विचारांची नव्या पिढीला ओळख करून देण्याचे कार्य करत आहे. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी शांतीदूत मंडळ आणि रमाबाई महिला मंडळाच्या कार्यकर्त्यांनी मोठी मेहनत घेतली आहे. कर्जत तालुक्यात अशा प्रकारचा माहितीपूर्ण आणि भव्य बॅनर प्रथमच उभारण्यात आल्याने हा उपक्रम इतर मंडळांसाठी आदर्श ठरत असल्याचे स्थानिक नागरिकांचे मत आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार पुढच्या पिढीपर्यंत पोहोचावेत आणि लोकांना त्यांच्या कार्याची सखोल माहिती मिळावी, हाच या भव्य बॅनरमागचा मुख्य उद्देश आहे.किशोर गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते