अंबरनाथ : महाविकास आघाडीने जाहीर केलेली तीन हजारांची महालक्ष्मी योजना म्हणजे महायुतीच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची कॉपीपेस्ट असल्याचा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. राज्यात पहिल्यांदाच असे घडले असून खोटी आश्वासने देणाऱ्या महाविकास आघाडीला जागा दाखवण्याची वेळ आली असल्याचा हल्लाबोल एकनाथ शिंदे यांनी केला.
अंबरनाथमध्ये महायुतीचे उमेदवार डॉ. बालाजी शिंदे यांच्या प्रचारार्थ आयोजित प्रचारसभेत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महायुती सरकारच्या कामगिरीची माहिती देतानाच महाविकास आघाडीला टीकेचे लक्ष्य केले. ते म्हणाले की, राहुल गांधी खटाखट खटाखट म्हणाले, पण काही आले नाही. मी पटापट पटापट म्हणालो आणि दीड हजार रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा केले. महाविकास आघाडीच्या घोषणा फसव्या असल्याची टिका एकनाथ शिंदे यांनी केली. ते म्हणाले की, सरकार आल्यानंतर आम्ही काय सुरू करू, आम्ही काय लोकांना देऊ, नवीन योजना काय करू हे सांगितले पाहिजे. परंतु महाविकास आघाडी सत्तेत आल्यानंतर हे बंद करू, ते बंद करू सांगत आहेत. महायुती सरकारने लाडकी बहिण योजनेसह बेरोजगारांना प्रशिक्षण भत्ता, अंगणवाडी, आशा सेविकांना १५ हजार मानधन, वीज बिलात ३० टक्के सवलत, शेतकऱ्यांना कर्जमाफी अशा कितीतरी योजना राबविण्याचे निर्णय सर्वसामान्यांसाठी घेतल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मी स्वतःला कॉमन मॅन समजतो, कार्यकर्ता समजतो. सीएम म्हणजे सर्वसामान्य माणूस. त्यामुळे सर्वसामान्य माणसांमध्ये जाताना मला कुठलाही प्रोटोकॉल आडवा येत नाही. आम्ही बाळासाहेबांच्या विचारांचे सरकार आणल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले.