कोकणसह मुंबई महानगर परिसरात सुरू असलेल्या पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे, पालघर आणि नवी मुंबई परिसरात अनेक नद्या इशारा पातळीवर किंवा त्यापेक्षा वर वाहत असून अनेक गावे जलमय झाली आहेत. कर्जत, उरण, मुरूड, बदलापूर, वसई आणि सिंधुदुर्गमध्ये घरांमध्ये पाणी शिरणे, पूल व रस्ते पाण्याखाली जाणे, वाहतूक ठप्प होणे, दरडी कोसळणे आणि मोठ्या प्रमाणावर वित्तहानी अशा घटनांनी परिस्थिती गंभीर बनली आहे. सिंधुदुर्गमध्ये वादळासह झालेल्या मुसळधार पावसामुळे घरे उद्ध्वस्त झाली आहेत. दरम्यान, वसईतील पर्यटनस्थळांवर १५ जुलैपर्यंत बंदी घालण्यात आली आहे.
जगबुडी नदीने ओलांडली इशारा पातळी
रत्नागिरी : जिल्ह्यात गेल्या २४ तासांपासून मुसळधार पावसाची संततधार सुरू असून अनेक नद्या दुथडी भरून वाहत आहेत. खेड तालुक्यातील जगबुडी नदीची पातळी रविवारच्या अहवालानुसार इशारा पातळी ओलांडून वर वाहत असल्याने प्रशासनाने नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. जलसंपदा विभागाच्या अहवालानुसार खेड-मरणे
पुलाजवळील जगबुडी नदीची इशारा पातळी ५.०० मीटर असून सकाळी १० वाजता नदीची पातळी ६.३० मीटर इतकी नोंदविण्यात आली आहे. नदीने अद्याप धोक्याची पातळी गाठलेली नसली तरी प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.
मुसळधार पावसामुळे नदी नाल्यांच्या पाणीपातळीत सातत्याने जिल्ह्यात सुरू असलेल्या या वाढ होत आहे. हवामान विभागाने जिल्ह्यात पुढील काही तास मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केल्याने आपत्कालीन यंत्रणा सतर्क ठेवण्यात आल्या आहेत. कमी उंचीच्या पुलांवरून वाहतूक करताना नागरिकांनी विशेष दक्षता घ्यावी, नदीपात्रात जाणे टाळावे आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
चोवीस तासांत विक्रमी पावसाची नोंद
मुरूड-जंजिरा : मुरूड तालुक्यात गेल्या चोवीस तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. मुरूड तहसील कार्यालयाने रविवारी झालेल्या नोंदीनुसार तालुक्यात एका दिवसात २५८ मिलिमीटर इतक्या विक्रमी पावसाची नोंद झाली आहे, तर आज दुपारी १ वाजेपर्यंत आणखी ६० मिलिमीटर पाऊस पडला आहे. गेल्या ६ दिवसांपासून सुरू असलेल्या या धुवाधार पावसामुळे मुरूड परिसरातील सर्वच ठिकाणी पाणी साचले असून सोसाट्याच्या वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे विविध मार्ग आणि रस्ते पाण्याखाली गेले आहेत.
या प्रचंड पावसामुळे तालुक्यातील खरआंबोळी, शीघ्र, अगरदांडा, गारंबी, मजगाव, नांदगाव आणि ऊसरोल परिसरातील भातशेती पूर्णपणे पाण्याखाली गेली आहे. भातशेतीचे राब उशिरा लावल्याने ते वाहून जाण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. दुसरीकडे समुद्राला मोठे उधाण आल्याने जंजिरा किल्ल्यासमोर लाटांचे तांडव पाहायला मिळत आहे.
उल्हास नदी इशारा पातळीखाली
बदलापूर : बदलापूर शहरातून वाहणाऱ्या उल्हास नदीने रविवारी दुपारी इशारा पातळी ओलांडली होती. संध्याकाळी ४ वाजेपर्यंत नदीची पाणीपातळी स्थिर होती. मात्र दुपारनंतर पावसाचा जोर काहीसा कमी झाल्याने सायंकाळी ६ वाजेपर्यंत पाणीपातळी इशारा पातळीखाली आली.
दरम्यान, सायंकाळी ६.३० वाजल्यापासून पुन्हा पावसाचा जोर वाढल्याने नदीच्या पाणीपातळीत पुन्हा वाढ होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. उल्हास नदीचे उगमस्थान असलेल्या घाटमाथा व लोणावळा परिसरात तसेच रायगड जिल्ह्यातील माथेरान, नेरळ, कळंब, कर्जत आणि खोपोली या भागांत सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे नदीच्या उपनद्याही दुथडी भरून वाहत आहेत.
बदलापूर शहरातून वाहणाऱ्या उल्हास नदीने रविवारी इशारा पातळी गाठली. नगरपरिषद प्रशासन सज्जसंभाव्य पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर बदलापूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी मारुती गायकवाड स्वतः शहरात फिरून परिस्थितीचा आढावा घेत आहेत. नगरपरिषदेचे अग्निशमन दल चोवीस तास सज्ज ठेवण्यात आले असून सखल भागातील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत
कर्जत : कर्जत तालुक्यात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. उल्हास नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने छोटे पूल, साकव आणि महामार्गावरील पूल पाण्याखाली गेले असून अनेक मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे.
रेल्वे स्थानकाच्या कामामुळे नैसर्गिक पाण्याचा निचरा बंद झाल्याने भैरवनाथ नगरमध्ये प्रथमच पाणी साचल्याचे प्राथमिक पाहणीत समोर आले आहे.
मुख्याधिकारी तानाजी चव्हाण, नगराध्यक्षा पुष्पा दगडे आणि उपनगराध्यक्ष संतोष पाटील यांनी तातडीने घटनास्थळाची पाहणी केली. रेल्वे प्रशासनाला अधिकृत पत्र देऊन नैसर्गिक नाला तातडीने खुला करण्याची मागणी नगरपरिषद करणार असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.
डेब्रीजच्या भरावामुळे उरणमध्ये पूरस्थिती
उरण : तालुक्यात गेल्या २४ तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे भीषण पूरस्थिती निर्माण झाली असून अनेक गावे जलमय झाली आहेत. चिरनेर, वेश्वी, दादरपाडा, जसखार, कोप्रोली तसेच जासई आणि नागाव परिसरातील शेकडो घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे.
स्थानिकांच्या मते, विविध ठिकाणी करण्यात आलेल्या डेब्रीजच्या भरावामुळे पावसाच्या पाण्याचा नैसर्गिक निचरा अडथळला गेला आणि त्यामुळे अनेक गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली. न्हावाशेवा पोलीस ठाण्याच्या परिसरातही पाणी शिरल्याने पोलीस यंत्रणेची तारांबळ उडाली.
दरम्यान, उरण-पेण मार्गावरील दिघाटी येथे रस्त्यावर पाणी आल्याने या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. चिरनेर गावाला सलग दुसऱ्या दिवशी पुराचा फटका बसला. शनिवारी पाणी ओसरल्यानंतर नागरिकांनी घरे आणि परिसराची साफसफाई केली होती.
सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. पूराचे पाणी ओसरल्यानंतर नुकसानग्रस्त भागांचे पंचनामे करून शासनाच्या नियमानुसार भरपाई देण्यात येईल. तसेच नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे.उद्धव कदम, तहसीलदार
वादळासह मुसळधार पावसाचा तडाखा; २५ घरे उद्ध्वस्त ; पुढील चार दिवसांसाठी यलो अलर्ट
सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील थंड हवेचे ठिकाण असलेल्या आंबोलीजवळील चौकुळ गावाला मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्याने अक्षरशः झोडपून काढले. शनिवारी पहाटे अवघ्या दोन तासांत झालेल्या अतिवृष्टीमुळे आणि वादळामुळे गावातील सुमारे २५ घरे उद्ध्वस्त झाली असून अनेक कुटुंबांचे संसार उघड्यावर आले आहेत. या घटनेमुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर वित्तहानी झाली असून प्रशासनाने तातडीने मदतकार्य सुरू केले आहे.
चौकुळ गावातील मऱ्हाटवाडी आणि बेरड परिसरात बहुतांश ग्रामस्थ गाढ झोपेत असताना वादळाने जोरदार तडाखा दिला. या दुर्घटनेत एका वृद्धाचे घर पूर्णपणे कोसळले. माहिती मिळताच जिल्हा आणि पथक परिषद, महसूल विभाग आपत्ती व्यवस्थापन घटनास्थळी दाखल झाले. पंचनामे आणि मदतकार्य सुरू करण्यात आले असून चौकुळचे सरपंच गावडे आणि तातडीने ग्रामविस्तार अधिकारी राऊळ यांनी ग्रामस्थांच्या मदतीने बचावकार्य राबविले.
सरासरी ९५ मिमी पावसाची नोंद
गेल्या २४ तासांत जोरदार पाऊस झाला असून जिल्ह्यात सरासरी ९५.१२ मिमी पावसाची नोंद झाली आहे. यामध्ये सर्वाधिक १८० मिमी पाऊस कणकवली तालुक्यात झाला असून वैभववाडीत १२४ मिमी, तर देवगडमध्ये १०६ मिमी पाऊस पडल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली.
रस्ते जलमय, जनजीवन विस्कळीत
रायगड - रायगड जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून अनेक प्रमुख मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. रोहा-नागोठणे मार्गावर मोठे झाड रस्त्यावर कोसळल्याने हा मार्ग पूर्णपणे बंद झाला आहे. झाड हटविण्याचे काम आणि रस्त्यावर साचलेला मलबा व माती हटविल्यानंतरच हा मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
सततच्या पावसामुळे जिल्ह्यातील अनेक सखल भाग जलमय झाले आहेत. पाण्याची पातळी वाढल्याने अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली गेले असून वाहनांची वाहतूक अशक्य झाली आहे. त्यामुळे पाली-खोपोली मार्गही वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. तसेच मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील काही भागांमध्ये गुडघ्यापेक्षाही अधिक पाणी साचल्याने पुलांवरून वाहने नेणे धोकादायक ठरत असून त्या ठिकाणीही खबरदारीचा उपाय म्हणून वाहतूक तात्पुरती बंद करण्यात आली आहे.
दरम्यान, रायगडमधील अंबा, कुंडलिका आणि पाताळगंगा या तीनही प्रमुख नद्या धोक्याच्या पातळीवरून वाहत आहेत. नदीपात्रातील पाण्याची पातळी सातत्याने वाढत असल्याने नदीकाठच्या गावांमध्ये, शहरांमध्ये आणि वस्त्यांमध्ये पाणी शिरण्याचा धोका निर्माण झाला आहे.
प्रशासनाचे आवाहन
या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने नागरिकांना अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, पूल तसेच पाण्याखाली गेलेले रस्ते ओलांडण्याचा प्रयत्न करू नये आणि प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन केले आहे. तसेच हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन सतर्क राहण्याचे आणि कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तातडीने प्रशासनाशी संपर्क साधण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.
पापडखिंड धरण ओव्हरफ्लो; महापौरांकडून पाहणी
वसई : सलग तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे विरार येथील पापडखिंड धरण ओव्हरफ्लो झाले आहे. या पार्श्वभूमीवर वसई-विरार शहराचे महापौर अजीव पाटील यांनी रविवारी (५ जुलै) सकाळी धरणाची प्रत्यक्ष पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेतला. पाहणीदरम्यान बुलेट ट्रेन प्रकल्प प्रशासनाने वसई-विरार महापालिकेची पूर्वपरवानगी न घेता धरण परिसरातील एका सांडव्यावर रस्ता तयार केल्याचे निदर्शनास आल्याचा आरोप करण्यात आला.
या पाहणी दौऱ्यात महापालिका आयुक्त पृथ्वीराज बी. पी., सार्वजनिक बांधकाम विभागाचे शहर अभियंता प्रदीप पांचगे तसेच पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुरेंद्र ठाकरे उपस्थित होते.
हवामान विभागाने पुढील काही तासांत मुसळधार पावसाचा इशारा दिल्याच्या पार्श्वभूमीवर धरणातील अतिरिक्त पाण्याचा विसर्ग, संभाव्य पूरस्थिती आणि त्यासाठी करावयाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत महापौर व अधिकाऱ्यांमध्ये सविस्तर चर्चा झाली. पाहणीदरम्यान बुलेट ट्रेन प्रकल्प प्रशासनाने महापालिकेची कोणतीही पूर्वपरवानगी न घेता सांडव्यावर रस्ता तयार केल्याचे समोर आल्याचा आरोप महापालिका प्रशासनाने केला. ही बाब गंभीर असल्याचे नमूद करत महापौर अजीव पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांसह त्या ठिकाणाची पाहणी केली. या प्रकरणाची चौकशी करून आवश्यक ती कारवाई करण्यात येईल, असे संकेत त्यांनी दिले.
१५ जुलैपर्यंत पर्यटकांना बंदी
पावसाळ्यात घडणाऱ्या अपघाती घटनांच्या पार्श्वभूमीवर वसई तालुक्यातील धबधबे, समुद्रकिनारे, किल्ले आणि इतर निसर्गरम्य पर्यटनस्थळांवर १५ जुलैपर्यंत पर्यटकांना जाण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे.
मान्सून सुरू होताच चिंचोटी, तुंगारेश्वर येथील धबधबे तसेच अर्नाळा, भुईगाव आणि राजोडी समुद्रकिनाऱ्यांवर मोठ्या प्रमाणावर पर्यटकांची गर्दी होत असते. वसई-विरार पोलीस आयुक्तालयाचे पोलीस उपायुक्त अशोक वीरकर आणि शशिकांत बोराटे यांनी मनाई आदेश लागू केला आहे. या आदेशानुसार संबंधित पर्यटनस्थळांवर पर्यटकांना प्रवेश करण्यास बंदी असेल.