भाईंंदर : १४ वर्षांच्या संघर्षपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश मिळत असून २००९ मध्ये मीरा-भाईंदरकरांना दाखवलेले मेट्रो प्रकल्पाचे स्वप्न आता प्रत्यक्षात उतरणार आहे. दहिसर ते काशिमीरा या मार्गावरची मेट्रो सेवा डिसेंबर अखेर सुरू करण्याचे नियोजन असून ही सेवा सुरू होताच मीरा-भाईंदरकरांसाठी ही अभिमानाची आणि सोयीची नवी पायरी ठरणार असल्याचे प्रतिपादन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले.
दहिसर-काशिमीरा मेट्रो मार्गाच्या पाहणी दौऱ्यावेळी ते बोलत होते. यावेळी महामेट्रोचे अधीक्षक अभियंता, तंत्रज्ञ सल्लागार आणि कंत्राटदार प्रतिनिधी उपस्थित होते. सरनाईक म्हणाले, २००९ मध्ये लोकप्रतिनिधी झाल्यानंतर मी या भागासाठी मेट्रोचे स्वप्न मांडले होते. तत्कालीन प्रस्थापित पुढाऱ्यांनी त्याची खिल्ली उडवली होती.
मात्र गेल्या १४ वर्षांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर हा मार्ग सुरू होण्याच्या उंबरठ्यावर आहे. दहिसर-काशिमीरा मार्ग सुरू झाल्यानंतर नागरिकांना मेट्रोने थेट अंधेरी आणि त्यानंतर मेट्रो-१ मार्गे विमानतळ स्थानक ३ ते कुलाबापर्यंत पोहोचण्याचा पर्याय उपलब्ध होईल, असे त्यांनी सांगितले.
सुरक्षा प्रमाणपत्रानंतर मार्गाला हिरवा कंदील
दहिसर-काशिमीरा या नव्या मेट्रो मार्गाला मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांचे प्रमाणपत्र मिळणे आवश्यक असून ते मिळाल्यानंतरच मार्ग सुरू केला जाईल. प्रमाणपत्र मिळताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या हस्ते लोकार्पण करण्याचे नियोजन असल्याची माहिती सरनाईक यांनी दिली.
२०२६ अखेर मेट्रो सुभाषचंद्र बोस मैदानापर्यंत
दहिसर-काशिमीरा मेट्रो मार्ग डिसेंबर २०२६ पर्यंत नेताजी सुभाषचंद्र बोस मैदानापर्यंत वाढविण्यात येईल. त्याचबरोबर वसई–विरार मेट्रो लाईनचे काम लवकरच सुरू होणार असून या मार्गामुळे वसई-विरारपासून थेट अंधेरी, विमानतळ इंटरचेंजमार्गे कुलाबा येथेही मेट्रोने जाता येणार असल्याचा आशावाद मंत्री सरनाईक यांनी व्यक्त केला.