ठाणे : दिवसेंदिवस वाढत असलेल्या तीव्र उन्हाळ्याचा सामना करण्यासाठी ठाणे महापालिकेने आखलेल्या कृती आराखड्यानुसार महापालिका क्षेत्रात २५ ठिकाणी विविध स्वयंसेवी संस्थाच्या सहकार्याने पाणपोई सुरू करण्यात आल्या आहेत. या उपक्रमात महापालिकेसोबत येस चॅरिटेबल ट्रस्ट, जेव्हीएम चॅरिटेबल फाऊंडेशन आणि समर्थ भारत व्यासपीठ यांनी सक्रिय सहभाग घेतला आहे. ठाणे स्टेशन येथे सॅटीसच्या खाली असलेल्या पाणपोईच्या उद्घाटनाने या उपक्रमाची मंगळवारपासून सुरुवात करण्यात आली.
वाढत्या नागरिकरणामुळे तसेच वाढत जाणाऱ्या उष्णतेमुळे निर्माण होणाऱ्या संकटांवर नियंत्रण ठेवण्यासाठी गेल्यावर्षी ठाण्याचा सर्वंकष उष्णता उपाययोजना आराखडा तयार करण्यात आला आहे. महाराष्ट्र शासन, ठाणे महानगरपालिका व काऊन्सील ऑफ एनर्जी एनव्हायरोमेंट ॲण्ड वॉटर या संस्थांनी हा आराखडा एकत्रितपणे तयार केलेला आहे. त्यानुसार, उष्णतेच्या लाटेच्या सामना करण्यासाठी ठाणे महानगरपालिका सजग असून परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन आयुक्त सौरभ राव यांच्या निर्देशानुसार महापालिका क्षेत्रात मोठ्या प्रमाणात जनजागृतीही करण्यात येत आहे.
आयुक्त सौरभ राव यांनी दिलेल्या निर्देशानुसार महापालिका क्षेत्रात गतवर्षीप्रमाणेच यंदाही पाणपोई सुरू करण्यात आल्या आहेत. या २५ ठिकाणी पाण्याचे मोठे माठ, ग्लास ठेवण्यात आले आहेत. तेथे दररोज पिण्याचे शुद्ध पाणी भरण्याची व्यवस्था संबंधित संस्था करणार असल्याची माहिती मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान यांनी दिली. नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा तसेच या पाणपोईच्या परिसरातील नागरिकांनी या पाणपोईंचे व्यवस्थापन योग्य होत असल्याकडे, स्वच्छता राखली जात असल्याकडे लक्ष ठेवावे, असे आवाहनही महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.
डॉक्टरांचा सल्ला घ्यावा
लहान अर्भक, लहान मुले, गर्भवती महिला, घराबाहेर काम करणाऱ्या व्यक्ती, ज्यांना मानसिक आजार आहे आशा व्यक्ती, विशेषतः उच्च रक्तदाब, हृदयरोग असणाऱ्या व्यक्तींची जास्त काळजी घेण गरजेचे आहे. घराबाहेर आणि घरामध्ये अतिउष्णतेच्या संपर्कामुळे हिटस्ट्रेस निर्माण होऊ शकतो. उष्माघाताची लक्षणे जाणवल्यास नजीकच्या दवाखान्यात उपचारासाठी जाण्याचे आवाहन जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात येत आहे.
'या' २५ ठिकाणी पाणपोईची सुविधा
ठाणे स्टेशन, कोपरी पूल, आईस फॅक्टरी, आशर आयटी पार्क, किसननगर शाळा, एमआयडीसी-अंबिका नगर नं. ३, पडवळ नगर, हाजुरी गाव, पासपोर्ट ऑफिस बस थांबा, तीन हात नाका, कोलशेत रोड नाका, बाळकूम नाका, माजीवडा नाका, कळवा स्टेशन रोड, ९० फूट रस्ता-खारेगाव, कळवा नाका-दत्त मंदिर, कौसा तलाव, वफा पार्क, अमृत नगर पोलीस चौकी-मुंब्रा, लोकमान्य डेपो, मध्यवर्ती कारागृहाच्या मागे- राबोडी, कोर्ट नाका, वर्तक नगर नाका, शास्त्री नगर नाका, बाळकूम अशा २५ ठिकाणी पाणपोई सुरू करण्यात आली आहे.
विद्यार्थ्यांनी घ्यावयाची काळजी
विद्यार्थ्यांनी मैदानी/शारीरिक हालचाली टाळाव्यात. बाहेर मैदानात वर्ग घेऊ नयेत.
विद्यार्थ्यांना उष्णतेच्या लाटेपासून बचाव करण्यासाठी शिक्षित करावे.
वर्गामध्ये पंखे सुस्थितीत असल्याची खात्री करणे.
विद्यार्थ्यांना थंड पाणी उपलब्ध करून द्यावे.
टरबूज, खरबूज, संत्री, द्राक्षे, अननस, काकडी, कोशिंबीर, स्थानिक उपलब्ध फळे आणि भाज्या यांसारखी उच्च पाणी सामग्री असलेली हंगामी फळे आणि भाज्या खाणे.
पातळ, सैल, सुती आणि शक्यतो हलक्या रंगाचे कपडे घालावे.
डोके झाकून ठेवण्यासाठी छत्री, टोपी, टॉवेल आणि इतर पारंपरिक साधनांचा वापर करणे.
उन्हात बाहेर पडणे टाळणे. उन्हात बाहेर जाताना शूज किंवा चप्पल घालणे.