भिवंडी : पोलीस ठाण्यातच लाच घेताना एक बडा पोलीस अधीकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात रंगेहात दोन लाखांची लाच घेताना पकडला गेल्याने पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. ही लाचखोरीची घटना ठाणे जिल्ह्यातील भिवंडी शहरातील नारपोली पोलीस ठाण्यात घडली आहे.
याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्याने दिलेल्या तक्रारी वरून याच पोलीस ठाण्यात लाचखोर पोलीस अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.शरद बबन पवार (३७) असे लाच घेताना अटक केलेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षकाचे नाव आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, लाचखोर शरद पवार हे भिवंडी शहरातील नारपोली पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत आहेत. त्यातच काही दिवसांपूर्वी नारपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका हत्येप्रकरणी ३८ वर्षीय महिला तक्रारदार यांचा मुलगा त्या हत्येतील आरोपी असल्याने त्याला पोलिसांनी अटक केली आहे. शिवाय या गुन्ह्याचा तपास लाचखोर सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद पवार यांच्याकडे असल्याने त्यांनी तक्रारदार महिलेच्या अटक मुलाला या गुन्ह्यातून वाचविण्यासाठी मदत करतो असे सांगून त्यांच्याकडे पाच लाखांच्या लाचेची मागणी केली होती.