ठाणे : ठाणे महापालिकेच्या महासभेतील गोंधळानंतर शिंदे सेना आणि भाजपमधील संघर्ष पेटला आहे. सभागृह नेते हणमंत जगदाळे यांनी हा पक्षीय वाद नसून भाजपमधील काही नगरसेवकांमधील वैयक्तिक आकस असल्याची टीका केली आहे. दुसरीकडे शिंदे सेनेचे नगरसेवक मनोज शिंदे यांनी ‘शिवसेना मुर्दाबाद’च्या घोषणा दिल्याने भाजप नगरसेवकांच्या निलंबनाची मागणी करत महापौरांकडे लेखी तक्रार केली आहे.
महासभेत गैरवर्तन, घोषणाबाजी, ठिय्या आंदोलन आणि राष्ट्रगीताचा अवमान केल्याचा गंभीर आरोप या तक्रारीत करण्यात आला आहे. परंतु आता भाजपचे गटनेते मुकेश मोकाशी यांनी महासभेतील शिंदे सेनेच्या नगरसेवकांचे वर्तन आक्षेपार्ह असल्याने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.
शुक्रवारी झालेल्या महासभेत गोंधळात २३१ विषय चर्चा न करता मंजुर करण्यात आले. त्यानंतर शिंदे सेना विरुद्ध भाजप यांच्यात राजकीय संघर्ष आणखी वाढल्याचे दिसून आले. रविवारी भाजपच्या नगरसेवकांनी मागील चार महासभेत झालेल्या गोंधळाची माहिती प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना दिली, तर विरोधी बाकावर बसण्याची भूमिकाही विषद केली. परंतु वरिष्ठ पातळीवर हे वाद मिटवले जातील, असा विश्वास चव्हाण यांनी व्यक्त केला होता. त्यानंतर शिंदे सेनेचे गटनेते पवन कदम यांनी यापुढील महासभेत असे गोंधळाचे प्रकार होणार नाही, आम्ही युतीत राहून काम करू, असे स्पष्ट केले.
तरीही सोमवारी पुन्हा भाजप आणि शिंदे सेनेच्या वादाचा दुसरा अध्याय सुरूझाला. सभागृह नेते हणमंत जगदाळे यांनी पत्रकार परिषद घेऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्याला विकासाच्या वेगळ्या उंचीवर नेण्याचा प्रयत्न सुरु केला आहे, अनेक विकास प्रकल्पांची कामे शहरात सुरू आहेत. त्यामुळे त्यांना साद देण्याऐवजी सत्तेत असलेलेच काही जण विरोधाची भूमिका मांडत असल्याची टीका केली. हा प्रकार पक्षीय नसून केवळ वैयक्तिक आकसातून घडत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. पीठासीन अधिकाऱ्यांच्या समोरच गोंधळ घालणे, त्यानंतर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार करणे हे निंदनीय असल्याचेही ते म्हणाले.
दुसरीकडे त्यांच्याच पक्षातील नगरसेवक मनोज शिंदे यांनी गोंधळ घालणाऱ्या आणि शिवसेनेच्या विरोधात घोषणाबाजी देणाऱ्या भाजपच्या नगरसेवकांवर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी महापौरांकडे लेखी पत्राद्वारे केली.
प्रत्येक विषयावर चर्चा व्हावी, हा भाजपचा सुरुवातीपासून आग्रह आहे. आता ठाण्यातील नागरिकांमध्ये नाराजी उमटल्यानंतर, शिंदे सेनेने सर्व विषयांवर चर्चेची तयारी दाखविली. मग, शुक्रवारची महासभा राष्ट्रगीत घेऊन का गुंडाळली? महापौरांच्या आदेशाविना राष्ट्रगीत कोणी म्हटले? राष्ट्रगीत म्हणणारे शिंदे सेनेचे पदाधिकारी जाहीर करणार का, असा सवाल ही त्यांनी केला आहे.
शिंदे सेनेचे वर्तन आक्षेपार्ह
भाजपने शिंदे सेनेला प्रत्युत्तर दिले असून महासभेत गोंधळ हा भाजपच्या नाही तर शिंदे सेनेच्या नगरसेवकांनी घातल्याचा आरोप भाजपचे गटनेते मुकेश मोकाशी यांनी केला आहे. शुक्रवारच्या महासभेत ऑनलाइन प्रक्षेपण सुरू असते, तर हा सूर्य आणि हा जयद्रथ फैसला झाला असता, असे नमूद करीत त्यांनी महासभेमध्ये भाजपचे नव्हे तर शिंदे सेनेच्याच नगरसेवकांचेच वर्तन आक्षेपार्ह असल्यामुळे त्यांच्या नगरसेवकांनाच निलंबित करावे, अशी मागणी केली आहे.
नगरसेवकांच्या कुरबुरी दूर केल्या जातील - एकनाथ शिंदे
ठाणे: भाजपच्या नगरसेवकांची प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी बैठक घेऊन त्यांची बाजू समजून घेतल्यानंतर शिंदे सेनेच्या नगरसेवकांची बैठक घेऊन त्यांची बाजू ऐकून घेतली जाणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. आमची युती आहे, परंतु काही कुरबुरी असतील तर त्या दूर केल्या जातील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
ठाणे महापालिकेतील शिंदे सेनेच्या पक्ष कार्यालयाचे उद्घाटन शिंदे यांच्या हस्ते सोमवारी सांयकाळी करण्यात आले. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधतांना ही माहिती दिली.
ते म्हणाले की, काही गोष्टींवरून कुरबुरी असू शकतात, मात्र त्या दूर केल्या जातील. आमची युती आहे, त्यामुळेच या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला उपमहापौर व इतर पदाधिकारी आले असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, स्थायी समिती व इतर समितींच्या निवडीबाबत त्यांना छेडले असता, स्थायी समितीसह इतर समित्या देखील मार्गी लावल्या जातील, असा दावाही त्यांनी यावेळी व्यक्त केला.