Thane : भयमुक्त ठाण्यासाठी सर्वपक्षीय जनमोर्चा; पूर्णेकर कुटुंबीयांचा सहभाग, महापालिका परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप 
ठाणे

Thane : भयमुक्त ठाण्यासाठी सर्वपक्षीय जनमोर्चा; पूर्णेकर कुटुंबीयांचा सहभाग, महापालिका परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मानपाडा विभागप्रमुख प्रदीप ऊर्फ बाळू पूर्णेकर यांच्या हत्येच्या निषेधार्थ आणि शहरातील वाढत्या गुन्हेगारीकडे लक्ष वेधण्यासाठी शुक्रवारी ठाण्यात सर्वपक्षीय जनमोर्चा काढण्यात आला.

Swapnil S

ठाणे : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मानपाडा विभागप्रमुख प्रदीप ऊर्फ बाळू पूर्णेकर यांच्या हत्येच्या निषेधार्थ आणि शहरातील वाढत्या गुन्हेगारीकडे लक्ष वेधण्यासाठी शुक्रवारी ठाण्यात सर्वपक्षीय जनमोर्चा काढण्यात आला. ‘भयमुक्त ठाणे’चा नारा देत विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी मोर्चात सहभागी झाले. पूर्णेकर यांच्या मारेकऱ्यांना तातडीने अटक करून कुटुंबीयांना न्याय देण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

२९ सप्टेंबर रोजी पूर्णेकर यांची हत्या झाल्यानंतर शहरातील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी सायंकाळी साडेपाच वाजता ठाणे महापालिका मुख्यालयातून मोर्चाला सुरुवात झाली. पूर्णेकर यांचे पुत्र राम, भाऊ तथा माजी नगरसेवक जयनाथ पूर्णेकर आणि कुटुंबातील अन्य सदस्य मोर्चाच्या अग्रभागी होते.

शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, काँग्रेस, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, आम आदमी पक्ष आणि धर्मराज्य पक्षाचे पदाधिकारी सहभागी झाले. माजी खासदार राजन विचारे, आमदार जितेंद्र आव्हाड, केदार दिघे, विजय कदम, गुरुनाथ खोत, मनसेचे अविनाश जाधव, काँग्रेसचे राहुल पिंगळे, राजेश जाधव, विक्रांत चव्हाण आणि धर्मराज्य पक्षाचे राजन राजे यांच्यासह विविध पक्षांचे कार्यकर्ते उपस्थित होते.

‘प्रदीप पूर्णेकर अमर रहें’, ‘पूर्णेकर कुटुंबाला न्याय मिळालाच पाहिजे’ आणि ‘आरोपींना अटक करा’ अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला. राष्ट्रध्वज आणि पूर्णेकर यांची छायाचित्रे असलेले फलकही हातात घेण्यात आले.

दरम्यान, राबोडी येथे पाच वर्षांपूर्वी हत्या झालेल्या मनसेचे पदाधिकारी जमील शेख यांच्या कुटुंबीयांनीही मोर्चात सहभाग घेतला. ‘जस्टिस फॉर जमील शेख’ असा संदेश असलेला फलक हातात घेऊन त्यांनी न्यायाची मागणी केली. या सहभागामुळे ठाण्यातील गुन्हेगारी आणि पीडित कुटुंबीयांना न्याय मिळण्याचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला.

कडेकोट बंदोबस्त

मोर्चाच्या पार्श्वभूमीवर महापालिका मुख्यालय परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. अतिरिक्त पोलीस आयुक्त अशोक दुधे आणि उपायुक्त प्रशांत कदम यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते. त्यामुळे परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप आले होते. महापालिका मुख्यालयातून निघालेला मोर्चा अल्मेडा रोड, एल.बी.एस. रोड, एल.जी. रोड, टेंभी नाका आणि सिव्हिल रुग्णालय मार्गे पॅव्हेलियन हॉटेल येथे समाप्त झाला. भाजपच्या काही स्थानिक कार्यकर्त्यांनीही मोर्चात सहभाग घेतला. पूर्णेकर हे आगरी समाजातील असल्याने त्यांना न्याय मिळावा, या भूमिकेतून सहभागी झाल्याचे त्यांनी सांगितले.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

मोठी बातमी! ध्रुव राठीला दिल्ली पोलिसांनी घेतले ताब्यात

दिल्लीची नाकेबंदी, झुरळे आक्रमक; रेल्वे रद्द, मेट्रो, इंटरनेट सेवा बंद, ड्राय-डे जाहीर; परवानगी नाकारली तरी CJP आंदोलनावर ठाम

MPSC Protest Pune : प्रकृती बिघडली, तिघांचे उपोषण मागे

विप निवडणुकीत बंडोबांचे आव्हान; नागपूरच्या उमेदवारीवरून भाजपमध्ये दुफळी, शिवसेना शिंदे गटाच्या मंगेश चिवटेंची माघार

जेन-झीला घाबरून सरकारची आणीबाणी; संपूर्ण देशच बंद करून टाका; CJP चा केंद्रावर हल्ला