ठाणे

ठाण्यात महायुतीला सुरुंग? भाजप-शिंदे सेनेचा ‘स्वबळावर’ लढण्याचा नारा, दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये वाकयुद्ध

भाजपने गुरुवारी आयोजित इच्छुक उमेदवार मार्गदर्शन शिबिरात ‘अब की बार ७० पार, महापौर भाजपचाच’ असा नारा देत आपल्या ताकदीची जाणीव करून दिली, तर शिंदे सेनेने बुधवारी आयोजित संघटनात्मक बैठकीत ‘ठाण्यात शिवसेनेचा वारसा आमचाच, मग निवडणूक स्वबळावरच लढली पाहिजे’ असा ठाम आग्रह व्यक्त केला.

Swapnil S

आगामी ठाणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि शिंदे सेनेद्वारे स्वबळावर लढण्याच्या घोषणांमुळे राजकीय वातावरण तापले आहे. भाजपने गुरुवारी आयोजित इच्छुक उमेदवार मार्गदर्शन शिबिरात ‘अब की बार ७० पार, महापौर भाजपचाच’ असा नारा देत आपल्या ताकदीची जाणीव करून दिली, तर शिंदे सेनेने बुधवारी आयोजित संघटनात्मक बैठकीत ‘ठाण्यात शिवसेनेचा वारसा आमचाच, मग निवडणूक स्वबळावरच लढली पाहिजे’ असा ठाम आग्रह व्यक्त केला. दोन्ही पक्षांमधील संघटनात्मक तयारी, नियोजन यामुळे महापालिका निवडणुकीपूर्वी राजकीय तणाव वाढल्याचे स्पष्ट दिसत आहे.

‘अब की बार ७० पार, महापौर भाजपचाच’ नारा

ठाणे : आगामी ठाणे महापालिका निवडणुकीची लगबग आता प्रत्यक्षात दिसू लागली आहे. महायुतीतील मित्रपक्ष भाजप आणि शिंदे सेना या दोन्ही पक्षांकडून स्वबळावर लढण्याची चाचपणी सुरू झाली आहे.

गुरुवारी ठाणे भाजपतर्फे आयोजित इच्छुक उमेदवार मार्गदर्शन शिबिरात कार्यकर्त्यांनी ‘अब की बार ७० पार, महापौर भाजपचाच’ अशा घोषणा देत स्वबळावर निवडणुकीची मागणी केली. या माध्यमातून भाजपनेही ठाण्यातील राजकीय समीकरणात आपली ताकद दाखवून दिली आहे.

आमदार संजय केळकर यांनी म्हटले, भाजपची जिल्ह्यात ताकद वाढली आहे, आमदारांची संख्या अधिक आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या मनाचा विचार करावा लागणार आहे.

याशिबिरात आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे आणि शहराध्यक्ष संदीप लेले यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.

भाजप सज्ज

ठाणे शहरातील १८ मंडळांमधून तब्बल ४१६ इच्छुक उमेदवारांनी या शिबिरात सहभाग नोंदवला. शिबिरात प्रभागनिहाय नियोजन या बाबींवर सविस्तर चर्चा झाली. कार्यकर्त्यांनी दिलेल्या नाऱ्यांमुळे ठाण्यात भाजप स्वबळावर लढण्यासाठी सज्ज होत असल्याचे संकेत मिळाले.

युती हवी की नको, याचा निर्णय वरिष्ठ स्तरावर घेतला जातो. ‘अब की बार ७० पार’ हा नारा हा कार्यकर्त्यांच्या उत्साहाचा भाग असून, युतीच्या निर्णयाशी त्याचा काही संबंध नाही. कार्यकर्त्यांनी केलेल्या मेहनतीला योग्य संधी मिळावी, अशी त्यांची इच्छा आहे. - संदीप लेले, भाजप जिल्हाध्यक्ष

ठाण्यात शिवसेनेचाच वारसा

ठाणे : आगामी ठाणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून स्वबळावर लढण्याची घोषणा होत असतानाच, आता शिंदे सेनेनेही स्वबळाचा नारा दिला आहे. ठाण्यातील आनंद आश्रम येथे खासदार नरेश म्हस्के यांच्या उपस्थितीत बुधवारी रात्री झालेल्या संघटनात्मक बैठकीत अनेक पदाधिकाऱ्यांनी ‘ठाण्यात शिवसेनेचा वारसा आमचाच, मग निवडणूक स्वबळावरच लढली पाहिजे,” असा ठाम आग्रह व्यक्त केला.

या बैठकीत अनेक माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी भाजपविरोधात नाराजी व्यक्त केली. शिंदे सेनेच्या माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांकडून स्वबळावर निवडणूक लढण्याची मागणी जोर धरत होती. या नाराजीच्या पार्श्वभूमीवर खासदार नरेश म्हस्के यांनी सर्व पदाधिकाऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला आणि सर्वांनी एकत्र राहून संघटन बळकट ठेवावे, असे आवाहन केले.

वनमंत्री गणेश नाईक हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करण्याची कोणतीही संधी सोडत नाहीत, तर शिंदे सेनेचे खासदार नरेश म्हस्के हे नाईकांच्या टिकेला प्रत्युत्तर देत आहेत. परिणामी, दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये वाकयुद्ध रंगले असून, यामुळे आगामी महापालिका निवडणुकीपूर्वी राजकीय वातावरण तापले आहे.

‘युती नसेल तर आम्ही स्वबळावर लढू!’

आगामी ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकांबाबत शिवसेनेने (शिंदे गटाने) आपली भूमिका स्पष्ट केली आहे. माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी बोलताना सांगितले की, ‘जर युतीत लढायचे नसल्याचे ठरल्यास आम्हीही पूर्ण तयारीत आहोत, आम्ही देखील स्वबळावर लढू.’ भाजपच्या स्वबळाच्या मुद्द्यावर नाराजी व्यक्त करत त्या पुढे म्हणाल्या की, ‘नाहीतरी आमचे कॉर्पोरेटर संख्येने जास्त आहेत. उलट जर युतीत लढलो, तर आमचे काही नगरसेवक कमी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आम्हाला दोन्ही पर्याय चालतील. युती झाली तरी चालेल, नाही झाली तरी आम्ही तयार आहोत. आम्ही आधीपासूनच स्वबळावर लढत आलोय, युतीत कधी लढलो नाही. माजी महापौर शिंदे यांनी शिवसेनेच्या संघटनात्मक तयारीबाबत बोलताना आत्मविश्वास व्यक्त केला. त्या म्हणाल्या, ‘आम्हाला वेगळं नियोजन करण्याची काही गरज नाही. शिवसेनेची भूमिका नेहमीच ‘२४ तास, ७ दिवस लोकांसाठीच’ अशीच आहे. शाखा पातळीवरची आमची संघटना सतत कार्यरत असते. काही पक्षांना निवडणुकीच्या दोन महिन्यांपूर्वी ऑफिस उघडावे लागते, पण आमची शाखा कायम उघडी असते. लोक आमच्याकडे नेहमी येतात, म्हणून आम्हाला निवडणुकीपूर्वी स्वतंत्र तयारीची गरजच नसते, कारण आम्ही कायमच तयारीत असतो.

Maharashtra Rain : अतिवृष्टीग्रस्त २३ जिल्ह्यांसाठी महाराष्ट्र सरकारकडून मदत जाहीर; ३,२५८ कोटींची मंजूरी

मतदार यादीत गोंधळ! संभाजीनगरात ३६,००० डुप्लिकेट नावे; निवडणुका पुढे ढकला, विरोधी पक्षानंतर महायुतीच्या आमदाराची मागणी

Nandurbar : ऐन दिवाळीत भाविकांवर काळाचा घाला; चांदशैली घाटात भीषण अपघात, अस्तंबा यात्रेवरून परतणाऱ्या ६ जणांचा मृत्यू

Pakistan-Afghanistan War : ३ खेळाडूंच्या मृत्यूनंतर अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाचा मोठा निर्णय; पाकिस्तानला मोठा फटका बसणार?

Pakistan-Afghanistan War : युद्धविरामानंतरही पाकिस्तानकडून हवाई हल्ला; अफगाणिस्तानच्या ३ खेळाडूंचा मृत्यू