ठाणे : ठाण्यातील सर्वसामान्य, गरीब व गरजू रुग्णांसाठी मोठा दिलासा ठरणारे विठ्ठल सायन्ना रुग्णालय (जिल्हा सामान्य रुग्णालय) डिसेंबरअखेर नागरिकांच्या सेवेत दाखल होणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार खासदार नरेश म्हस्के यांनी महापौर शर्मिला पिंपळोलकर, पदाधिकारी, बांधकाम विभाग व महापालिकेच्या अधिकाऱ्यांसमवेत शुक्रवारी रुग्णालयाची पाहणी केली. ९०० खाटांची क्षमता, एअर अॅम्ब्युलन्सची सुविधा, अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणे आणि विविध उपचार सुविधांनी सज्ज असलेले हे रुग्णालय ठाणेकरांसह संपूर्ण परिसरातील नागरिकांसाठी आरोग्यसेवेचे नवे केंद्र ठरणार असल्याची माहिती खासदार नरेश म्हस्के यांनी दिली.
ठाण्यासह रायगड, रत्नागिरी, पालघर, वसई तसेच ग्रामीण आणि आदिवासी भागातील हजारो रुग्णांना या रुग्णालयाचा मोठा लाभहोणार आहे. गंभीर रुग्णांना तातडीने उपचार मिळावेत आणि उपचारासाठी मुंबईकडे जाण्याची गरज कमी व्हावी, हा या प्रकल्पामागील महत्त्वाचा उद्देश आहे. या रुग्णालयात ९०० खाटांची सुविधा, एअर अॅम्ब्युलन्स, आधुनिक निदान यंत्रणा, अत्याधुनिक ऑपरेशन थिएटर, आयसीयू, विविध सुपर स्पेशालिटी विभाग, कर्करोगावरील उपचार तसेच विविध प्रकारच्या वैद्यकीय उपचारांची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे गंभीर रुग्णांवर तातडीने उपचार करणे शक्य होणार असून, नागरिकांना उपचारासाठी मुंबईकडे धाव घेण्याची गरजही मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. गरीब व गरजू रुग्णांना एकाच छताखाली दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध करून देणे हा या प्रकल्पाचा उद्देश असल्याचे खासदार म्हस्के यांनी स्पष्ट केले.
दहा मजली हे अत्याधुनिक रुग्णालय रुग्णांना विविध वैद्यकीय सुविधा एकाच छताखाली उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने उभारण्यात आले आहे. रुग्णालयाच्या इमारतीवर एअर अॅम्ब्युलन्सची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे.
यावेळी सभागृह नेते हणमंत जगदाळे, शिवसेना गटनेते तथा स्थानिक नगरसेवक पवन कदम, सुधीर कोकाटे, माजी नगरसेविका पूजा वाघ, महापालिकेचे कार्यकारी अभियंता मोहन कलाल, ऋषिकेश जवळकर, आरोग्य विभागाच्या डॉ. योगिता धायगुडे, माता-बालसंगोपन अधिकारी डॉ. वर्षा ससाणे तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
डिसेंबर अखेर हे रुग्णालय नागरिकांच्या सेवेत दाखल करण्याचे नियोजन असून, काम अंतिम टप्प्यात आले आहे. उर्वरित कामे दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. हे रुग्णालय सुरू झाल्यानंतर ठाणेकरांसह इतर जिल्ह्यांतील नागरिकांनाही मोठा दिलासा मिळणार असून, आरोग्यसेवेच्या क्षेत्रातील हा महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.नरेश म्हस्के, खासदार
नर्सिंग महाविद्यालयाचे कामही वेगाने
रुग्णालयाशेजारी नर्सिंग महाविद्यालयाचे कामही वेगाने सुरू आहे. या महाविद्यालयामुळे प्रशिक्षित परिचारिका आणि आरोग्य कर्मचारी उपलब्ध होणार असून, भविष्यात आरोग्य व्यवस्थेला सक्षम मनुष्यबळ मिळण्यास मदत होणार आहे. त्यामुळे आरोग्यसेवेची गुणवत्ता आणखी उंचावण्यास हातभार लागणार आहे.
आरोग्य व्यवस्थेवरील ताण कमी होणार
कळवा येथील मेडिकल हॉस्पिटलमध्ये सध्या २०० सुपर स्पेशालिटी बेड, मुलांसाठी २०० बेड आणि सर्वसाधारण उपचारांसाठी ५०० बेड उपलब्ध आहेत. नव्या जिल्हा सामान्य रुग्णालयासह या सुविधा पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाल्यानंतर ठाणे शहर आणि जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेवरील वाढता ताण मोठ्या प्रमाणात कमी होईल. तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांनाही अत्याधुनिक आणि दर्जेदार उपचार सहज उपलब्ध होतील, असा विश्वास खासदार म्हस्के यांनी व्यक्त केला.