ठाणे : महापालिकेच्या शाळांमध्ये डिजिटल वर्गखोल्यांच्या नावाखाली कोट्यवधी रुपये खर्च केले जात असताना विद्यार्थ्यांच्या मूलभूत सुविधांकडे मात्र दुर्लक्ष होत असल्याचा आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चे ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे यांनी केला. शाळांमध्ये इंटरनेट नाही, सुरक्षा कॅमेरे बंद आणि शिक्षकांची कमतरता असताना डिजिटल शिक्षणाचा कसला गाजावाजा केला जात आहे, असा सवाल दिघे यांनी केला.
महापालिकेने डिजिटल वर्गखोल्यांची मोठी घोषणा केली असली तरी प्रत्यक्ष शाळांमधील परिस्थिती वेगळीच असल्याचा दावा दिघे यांनी केला. डिजिटल फलकांसह महागडी उपकरणे बसविण्यात आली; मात्र त्यासाठी आवश्यक इंटरनेट सुविधाच उपलब्ध नसेल, तर हा खर्च नेमका कशासाठी, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. इंटरनेटअभावी ही उपकरणे विद्यार्थ्यांच्या उपयोगाऐवजी केवळ शोभेची वस्तू ठरत असल्याची टीका त्यांनी केली.
मूलभूत सुविधा कुठे?
एका बाजूला डिजिटल शिक्षणासाठी कोट्यवधींचा खर्च केला जात असताना दुसरीकडे शिक्षकांची कमतरता, पिण्याच्या पाण्याची समस्या, अपुरी स्वच्छतागृहे आणि इंटरनेटचा अभाव कायम आहे. त्यामुळे पालिका शिक्षण विभागाचे नियोजन कुठे आहे, असा प्रश्न दिघेंनी केला.
‘प्रसिद्धीपेक्षा शिक्षणाला प्राधान्य द्या’
ठाणेकरांच्या करातून मिळणारा पैसा विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी खर्च झाला पाहिजे. प्रसिद्धीच्या फलकांवर किंवा कंत्राटदारांच्या फायद्यासाठी निधी खर्च करू नये, असा टोला त्यांनी लगावला. कागदावर योजना आखून त्याचा गाजावाजा करणे थांबवावे, असेही ते म्हणाले.