Thane : दिव्याला मिळाला ४००६११ हा स्वतंत्र पिनकोड; दीर्घकालीन मागणी अखेर पूर्ण  
ठाणे

Thane : दिव्याला मिळाला ४००६११ हा स्वतंत्र पिनकोड; दीर्घकालीन मागणी अखेर पूर्ण

मध्य रेल्वेवरील सर्वात वेगाने वाढणारे शहर म्हणून दिवा प्रसिद्ध आहे. दिवा हे रेल्वेचे जंक्शनही आहे.

प्रतिनिधी

फरियाल सय्यद/ठाणे: मध्य रेल्वेवरील सर्वात वेगाने वाढणारे शहर म्हणून दिवा प्रसिद्ध आहे. दिवा हे रेल्वेचे जंक्शनही आहे. या दिव्याला आतापर्यंत स्वत:चा पिनकोड नव्हता. आता केंद्र सरकारने अधिकृतपणे दिवा शहरासाठी ४००६११ हा नवीन आणि स्वतंत्र पिन कोड मंजूर केला आहे.

या निर्णयामुळे स्थानिक नागरिकांची अनेक वर्षांची जुनी मागणी अखेर पूर्ण झाली आहे. यापूर्वी दिव्यातील नागरिकांना शेजारील मुंब्रा परिसरासोबत एकच पिन कोड ४००६१२ वापरावा लागत होता.

या सामायिक पिन कोडमुळे दिवावासीयांना मोठ्या प्रमाणावर प्रशासकीय आणि वाहतुकीच्या अडचणींचा सामना करावा लागत होता. गेल्या अनेक वर्षांपासून टपाल मिळण्यास होणारा प्रचंड उशीर, महत्त्वाची सरकारी आणि प्रशासकीय कागदपत्रे मिळवण्यात येणाऱ्या अडचणी, बँकिंग व्यवहारांमधील त्रुटी आणि ऑनलाइन सेवांचा लाभ घेताना येणारे तांत्रिक अडथळे यामुळे स्थानिक नागरिक त्रस्त होते.

सुलभ टपाल सेवा आणि स्वतंत्र प्रशासकीय ओळख

नवीन पिन कोड लागू झाल्यामुळे या सर्व तांत्रिक आणि प्रशासकीय अडचणी आता कायमच्या दूर होतील, अशी अपेक्षा आहे. यामुळे केवळ टपाल आणि कुरिअर सेवाच सुरळीत होणार नाही, तर दिव्याला स्वतंत्र प्रशासकीय आणि भौगोलिक ओळखही मिळणार आहे. सरकारी योजना आणि खासगी डिजिटल सेवांसाठी लागणाऱ्या पडताळणी प्रक्रिया अधिक सुलभ होतील, ज्यामुळे पूर्वी सीमांबाबतीतील संभ्रमामुळे होणारा गोंधळ पूर्णपणे थांबेल.

जनआंदोलनाचा विजय

स्थानिक नागरिक आणि सामाजिक संस्थांनी अनेक वर्षांपासून केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याचे फलित आहे. स्थानिक नेते विजय भोईर यांच्या नेतृत्वाखाली ‘जागा हो दिवेकर’ या सामाजिक संस्थेने हा प्रश्न सर्वोच्च प्रशासकीय पातळीवर नेण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले.

भोईर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केंद्र सरकार, टपाल विभाग आणि विविध प्रशासकीय संस्थांकडे या समस्येचा सातत्याने पाठपुरावा केला. मुंबईच्या जनरल पोस्ट ऑफिसमध्ये आणि वरिष्ठ टपाल अधिकाऱ्यांसोबत महत्त्वाच्या बैठका घेऊन त्यांनी दिवावासीयांना रोज सहन कराव्या लागणाऱ्या हालअपेष्टा अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिल्या होत्या.

संजय केळकर आणि निरंजन डावखरे (आमदार, ठाणे): त्यांनी संबंधित सरकारी विभाग आणि पक्षनेतृत्वाकडे या मागणीचा सातत्याने पाठपुरावा केला.

विनय सहस्त्रबुद्धे (माजी खासदार): नवी दिल्लीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी थेट पत्रव्यवहार करून, झपाट्याने वाढणाऱ्या या शहरासाठी स्वतंत्र टपाल क्षेत्राची किती गरज आहे, हे पटवून दिले.

ठाणे मुख्य पोस्ट ऑफिसतर्फे करण्यात आलेली सातत्यपूर्ण तपासणी आणि प्रत्यक्ष जागेची पाहणी झाल्यानंतर, टपाल विभागाने अधिकृतपणे दिवा शहरासाठी ‘४००६११’ हा पिन कोड मंजूर आणि लागू केला.

सातारा जिल्ह्यात ५७, तर पुणे जिल्ह्यात २३२ मतदान केंद्रे; पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांसाठी उद्या मतदान

ठाणे-भिवंडीत पाणी कपातीचे संकट; ठाण्यात आजपासून ३६ तास, तर भिवंडीत दर बुधवारी १८ तास पाणीपुरवठा बंद

Cyber Fraud Alert : तुम्हालाही व्हॉट्सॲपवर लग्नपत्रिका आलीय? सावधान... APK फाइलमुळे क्षणात खातं होईल रिकामं

दिवेआगर दुर्घटनेप्रकरणी ५ जणांवर गुन्हा, सहलीत निष्काळजीपणा; पुण्यातील ८ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू

डेटा लीकप्रकरणी HDFC बँक अधिकाऱ्यांची चौकशी