छायाचित्र : दीपक कुरकुंडे
ठाणे

ठाणे दिवाळी पहाट : रील्स, फोटो अन् डीजेचा तरुणाईत उत्साह, दिव्यांग विद्यार्थ्यांकडून पाणी बचतीचा संदेश

दिवाळीच्या पहिल्या दिवशी ठाणे शहरात विविध ठिकाणी आयोजित दिवाळी पहाट कार्यक्रमांना तरुणाईचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पारंपरिक वेशभूषा, मित्र-मैत्रिणींसोबत फोटो, रील्स आणि डीजेच्या तालावर नृत्य अशा उत्साही वातावरणात शहरातील चौक आणि तलाव परिसर गजबजले होते.

Swapnil S

ठाणे : दिवाळीच्या पहिल्या दिवशी ठाणे शहरात विविध ठिकाणी आयोजित दिवाळी पहाट कार्यक्रमांना तरुणाईचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पारंपरिक वेशभूषा, मित्र-मैत्रिणींसोबत फोटो, रील्स आणि डीजेच्या तालावर नृत्य अशा उत्साही वातावरणात शहरातील चौक आणि तलाव परिसर गजबजले होते. मात्र, दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर काही आयोजकांनी कार्यक्रम रद्द केले, तर पूर्णेकर प्रकरणाचे पडसाद काही कार्यक्रमांवर उमटल्याने तेथे अपेक्षेपेक्षा कमी गर्दी दिसली.

तलावपाळी, गडकरी रंगायतन, राम मारुती रोड आणि उपवन परिसरात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. गजानन महाराज मठ आणि कौपिनेश्वर मंदिरात दर्शनासाठीही नागरिकांनी गर्दी केली. गर्दीचे नियोजन करण्यासाठी काही मार्गांवरील वाहतूक बंद करण्यात आल्याने पादचाऱ्यांची वर्दळ वाढली.

दरम्यान, डॉ. राजेश मढवी आणि प्रतिभा मढवी यांच्या पुढाकाराने दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी विशेष दिवाळी पहाट आयोजित करण्यात आली. आठ शाळांमधील विद्यार्थ्यांनी नृत्य आणि गायन सादर केले. यावेळी ‘पाण्याविना नाही प्राण, पाण्याचे तू महत्त्व जाण’ अशा संदेशांचे फलक हातात घेऊन विद्यार्थ्यांनी पाणी बचतीचे आवाहन केले. राम मारुती रोडवर विश्वास सामाजिक संस्थेच्या माध्यमातून राष्ट्रीय ब्रास बँड आणि वीर गर्जना ढोल-ताशा पथकाचे सादरीकरण झाले, तर तलावपाळी येथे नितीन लांडगे फाऊंडेशनतर्फे ‘जनरेशन झेड दिवाळी पहाट आणि युवा जल्लोष २०२६’ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमादरम्यान गर्दीत एका व्यक्तीची प्रकृती बिघडून तो कोसळल्याची घटनाही घडली.

विशेष म्हणजे, फटाके फोडण्यास बंदी असल्याचे सांगण्यात येत असतानाही काही ठिकाणी रस्त्यांवर फटाके फोडण्यात आले. तलावाच्या पाण्यातही फटाके टाकले जात असल्याचे चित्र दिसून आले. त्यामुळे उत्सवाच्या जल्लोषासोबत नियमांच्या पालनाचा प्रश्नही ऐरणीवर आला.

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर राजन विचारे, मराठा प्रतिष्ठान आणि ब्रदर्स प्रतिष्ठानचे कार्यक्रम रद्द करण्यात आले. मासुंदा तलाव परिसरातील एका कार्यक्रमात पूर्णेकर प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर काही कलाकार अनुपस्थित राहिल्याची चर्चा होती.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

मुंबईत पाणीकपात वाढणार? BMC ची राखीव पाण्यासाठी फिल्डिंग, ७ धरणांत फक्त ८२.४७ टक्के पाणी, ६ महिने आधीच राज्य सरकारला पत्र

महाराष्ट्रातील MBBS इंटर्नना कमी विद्यावेतन

पुणे-मिरज-कोल्हापूर लोहमार्गाला सुरक्षा 'कवच'

दिवाळी पहाट : षण्मुखानंद हॉलमध्ये महेश काळे यांच्या स्वरोत्सवाला तुफान प्रतिसाद; पंडित हरिप्रसाद चौरसियांनी केले कौतुक

Mumbai : अंधेरीत उंच इमारतीत अग्निभडका; लिफ्ट ऑपरेटरचा गुदमरून मृत्यू