ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली येथे एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शहरातील एका बंद घरात मानवी कवटीसह सांगाडा आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर पोलिसांनी तपास सुरू केला असून हा मृत्यू गुन्हेगारी स्वरूपाचा आहे की अपघाती, याचा शोध घेतला जात आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, डोंबिवलीतील सोनारपाडा परिसरातील म्हात्रे नगर येथील एका चाळीत असलेल्या बंद घरात शनिवारी (दि.३) एका व्यक्तीला मानवी सदृश्य अवशेष आढळले. त्यानंतर त्या घटनेची माहिती तातडीने मानपाडा पोलीस ठाण्याला देण्यात आली, असे एका पोलीस अधिकाऱ्याने मंगळवारी (दि.६) सांगितले.
पीटीआयच्या वृत्तानुसार, पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन मानवी कवटीसारखी दिसणारी कवटी, हाडे, कपडे, चप्पल, बांगड्या, केसांचे नमुने तसेच रक्ताने माखलेली माती जप्त केली आहे. प्राथमिक तपासानंतर, वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार हे अवशेष मुंबईतील जे. जे. रुग्णालयात शवविच्छेदन व सखोल फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.
या प्रकरणी मानपाडा पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून, मृत व्यक्तीची ओळख पटवणे आणि मृत्यूचे कारण शोधण्याचे काम सुरू आहे..