‘लोकतंत्र बचाव, अराजकता हटाव’च्या नावाखाली काँग्रेस, इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडी हे पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात फेक नॅरेटिव्ह पसरवत आहेत. १९७५ मध्ये आणीबाणी होती; तेव्हा नेते तुरुंगात, आणि माध्यमांवर बंदी होती. आज विरोधक जंतरमंतरवर आंदोलन करतात, मोर्चे काढतात, पंतप्रधानांच्या घरासमोर आंदोलन करतात, तरी लोकशाही धोक्यात असल्याचा दावा करतात, असा घणाघात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला.
ठाणे शहर भाजपच्या ‘लोकतंत्र बचाव, अराजकता हटाव’ आंदोलनात बोलताना शिंदे यांनी सर्वोच्च न्यायालय, निवडणूक आयोग आणि घटनात्मक संस्थांवर संशय निर्माण करण्यावरून काँग्रेसला सुनावले. “न्यायव्यवस्थेवर दबाव आणणे, न्यायाधीशांच्या राजीनाम्याची मागणी करणे हा बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचा अपमान आहे,” असे ते म्हणाले.
राजीनामे देऊन व्होट चोरी सिद्ध करा...
राहुल गांधींच्या ‘व्होट चोरी’च्या आरोपांवरही शिंदेंनी पलटवार केला. “आरोप करा, पण पुरावे द्या. तेलंगणा, कर्नाटक, तामिळनाडू, केरळ, हिमाचलमध्ये काँग्रेसची सरकारे आली, तीही व्होट चोरीने आली का? ईव्हीएमवर निवडून आलेल्या खासदारांनी राजीनामा देऊन व्होट चोरी सिद्ध करावी,” असे आव्हान त्यांनी दिले.
२०१९ मध्ये जनतेने शिवसेना-भाजपला दिलेला जनादेश काँग्रेससोबत सत्ता स्थापून बदलण्यात आला, “खरी व्होट चोरी तेव्हा झाली,” असा टोलाही त्यांनी उबाठाला लगावला.कोविड काळात मुंबई मनपामध्ये खुलेआम नोट चोरी करणारे आज व्होट चोरीची भाषा करू लागले असल्याची घाणघाती टीका शिंदे यांनी केली.
मोदींना ३६ देशांनी दिलाय सर्वोच्च नागरी सन्मान
मोदी सरकारने कोट्यवधी नागरिकांना गरिबीतून बाहेर काढले, ८० कोटींना धान्य दिले, जनधन, लखपती दीदी, पीएम-किसान, बेटी बचाओ, स्टार्टअप, स्किल डेव्हलपमेंट, स्पोर्ट्स, रोजगाराच्या योजना राबवल्या, असा दावा त्यांनी केला.
गरीबी २७.१ टक्क्यांवरून २.६ टक्क्यांवर आल्याचा जागतिक बँकेच्या अहवालाचा संदर्भही त्यांनी दिला. मोदींना ३६ देशांनी सर्वोच्च नागरी सन्मान दिला असून, आईच्या निधनानंतरही कर्तव्यावर परतणारा हा कर्मयोगी प्रधानमंत्री असल्याचे शिंदे म्हणाले.
प्रमुख नेत्यांची उपस्थिती
या पदयात्रेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, वन मंत्री गणेश नाईक, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, नरेश म्हस्के, डॉ. हेमंत सावरा माजी खासदार कपिल पाटील, संजीव नाईक, आनंद परांजपे, आमदार योगेश सागर, मंदा म्हात्रे, स्नेहा दुबे-पंडित, रवींद्र फाटक, राजन नाईक, निरंजन डावखरे, विक्रांत पाटील, कुमार अयलानी, शिवाजी पाटील, नरेंद्र मेहता, प्रशांत ठाकूर, सुलभा गायकवाड, राजेश मोरे, शांताराम मोरे, ज्ञानेश्वर म्हात्रे, शिवसेना उपनेते प्रकाश पाटील, महापौर शर्मिला पिंपळोलकर, उपमहापौर कृष्णा पाटील आणि शिवसेना भाजपचे सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.