ठाणे : महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी ठाण्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले. अनेक दिग्गज नेते, माजी नगरसेवक आणि इच्छुकांच्या नावांवर उमेदवारी यादीत फुली मारण्यात आल्याने शिंदे सेनेत नाराजीची लाट उसळली आहे.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे पुत्र पूर्वेश सरनाईक आणि खासदार नरेश म्हस्के यांचे पुत्र आशुतोष म्हस्के यांना उमेदवारी नाकारण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः हा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे.
प्रभाग क्रमांक १४ मधून माजी नगरसेवक पूर्वेश सरनाईक, तर प्रभाग क्रमांक १९ (आनंदनगर) मधून आशुतोष म्हस्के यांना उमेदवारी नाकारल्याचे स्पष्ट झाल्यानंतर नाराज कार्यकर्त्यांनी मंगळवारी आनंदाश्रम येथे जमून संताप व्यक्त केला.
ठाणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी शिवसेनेने प्रभाग क्रमांक ६ मधून हणमंत जगदाळे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांसह तीन अन्य उमेदवारांना उमेदवारी जाहीर केली आहे. गत निवडणुकीत आमचा प्रभाग विकासाच्या बाबतीत संथ होता. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमच्या प्रभागाचा विकास करण्याचे वचन दिल्यामुळे आम्ही शिवसेनेत प्रवेश केला. लोकमान्यनगर आणि शास्त्रीनगर रहिवाशांना हक्काचे आणि प्रशस्त घर देणे हे माझे स्वप्न आहे. आता प्रभागाच्या विकासाचा मार्ग मोकळा झाला असून, लवकरच एक वर्षांच्या आत पुनर्विकासाचे काम सुरू होईल.हणमंत जगदाळे, शिवसेना उमेदवार