ठाणे : मागील दोन दिवसांपासून ठाणे शहराला अवकाळी पावसाने चांगलाच तडाखा दिला आहे. अचानक आलेल्या पावसाने आता नवीनच समस्या निर्माण होण्याची शक्यता असून शहरात साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
मंगळवारी रात्रीपासून ठाणे शहरात वादळी वाऱ्यांसह सुरू झालेल्या अवकाळी पावसाने शहरात गारवा निर्माण केला असला, तरी या पावसामुळे संभाव्य साथीच्या आजारांचे संकट उभे राहिले आहे. उन्हाच्या झळांमध्ये हा पाऊस काहीसा सुखावणारा वाटला, मात्र याच पावसामुळे ‘अवकाळी आजारांचे’ संकट गडद झाले आहे. परिणामी, ठाणे जिल्हा आरोग्य विभाग आणि सामान्य रुग्णालय प्रशासन सज्ज झाले आहे.
गेल्या काही आठवड्यांपासून तापमानात झपाट्याने वाढ झाली होती. त्यातच अवकाळी पावसामुळे जमिनीवर पाणी साचले होते तसेच तापमान वाढीमुळे वातावरणात दमटपणा निर्माण झाला आहे. हीच आर्द्रता म्हणजे विविध विषाणूंसाठी योग्य वातावरण असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे. अवकाळी पावसामुळे वातावरणात अचानक गारवा निर्माण होतो आणि त्यानंतर उष्णता वाढते. या बदलामुळे शरीराची प्रतिकारशक्ती कमी होते आणि विषाणूजन्य आजारांना चालना मिळत असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलास पवार यांनी दिली.