ठाण्याचा मासुंदा तलाव तुडुंब; बाजारपेठेत पाणी शिरले संग्रहित छायाचित्र
ठाणे

ठाण्याचा मासुंदा तलाव तुडुंब; बाजारपेठेत पाणी शिरले

सलग दोन दिवस सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे ठाणे शहरातील ऐतिहासिक मासुंदा तलाव ओसंडून वाहू लागला आहे.

Swapnil S

ठाणे : सलग दोन दिवस सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे ठाणे शहरातील ऐतिहासिक मासुंदा तलाव ओसंडून वाहू लागला आहे. तलावाचे पाणी थेट जांभळी नाका परिसरात रस्त्यावर आल्याने वाहतुकीचा वेग मंदावला, तर लगतच्या बाजारपेठेतही पाणी शिरल्याने व्यापाऱ्यांचे नुकसान झाले.

रविवारपासून सुरू असलेल्या मुसळधार पाऊस सोमवारीही पडत होता. सततच्या पावसामुळे मासुंदा तलावाची पाणीपातळी झपाट्याने वाढली आणि अतिरिक्त पाणी बाहेर पडू लागले. परिणामी जांभळी नाका, तलावपाळी आणि बाजारपेठ परिसरात पाणी साचले. ठाणे रेल्वे स्थानकाकडे जाणारा हा महत्त्वाचा मार्ग असल्याने टीएमटी बस, रिक्षा आणि इतर वाहनांच्या वाहतुकीवर त्याचा थेट परिणाम झाला.

मासुंदा तलावातील पाणी रस्त्यावर आल्यामुळे परिस्थिती गंभीर होताच महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने आणि अग्निशमन दलाने पंपांच्या साहाय्याने पाण्याचा उपसा सुरू केला. त्यानंतर वाहतूक हळूहळू पूर्ववत झाली. मात्र, अनेक ठिकाणी वाहने संथगतीने धावत असल्याने नागरिकांना प्रवासासाठी अतिरिक्त वेळ लागला. दरम्यान, बाजारपेठेतील काही दुकानांमध्ये पाणी शिरल्याने व्यापाऱ्यांना आर्थिक फटका बसला.

प्रत्येक पावसाळ्यात जांभळी नाका आणि तलावपाळी परिसरात पाणी साचण्याच्या घटना घडत असतानाही कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात प्रशासनाला अपयश आल्याची टीका नागरिकांनी केली आहे. कोट्यवधींच्या पावसाळी कामांच्या दाव्यानंतरही शहराच्या मध्यवर्ती भागात अशी परिस्थिती निर्माण होत असल्याने ठाणे महापालिकेच्या नियोजनावर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

दिल्लीत मुसळधार पावसाचा तडाखा; खराब हवामानामुळे २६ उड्डाणे रद्द, १५ विमानांचे बदलले मार्ग

'खेलो मुंबई' ॲपद्वारेच होणार नोंदणी; ॲडव्हान्स्ड स्मार्ट टर्फ धोरण लवकरच लागू; पालिका सभागृहाची मंजुरी

Amravati : व्हेंटिलेटरच्या स्फोटामुळे NICU मध्ये आग; ३ नवजात बालकांचा करुण अंत, मुख्यमंत्र्यांकडून उच्चस्तरीय चौकशीचे आदेश

Ulhasnagar: घरे-दुकानांवरील 'रुंदीकरणाची टांगती तलवार' दूर होणार; ३६ ऐवजी २४ मीटरचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे

माथेरानमध्ये साथीच्या आजारांचा उद्रेक; दररोज ३० ते ४० रुग्णांवर उपचार; तातडीच्या उपाययोजनांची मागणी