ठाणे पालिका शिक्षण विभागाची पुनर्रचना; २,३०४ पदांचा आकृतिबंध; ३४९ नवीन पदांची निर्मिती प्रस्तावित 'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
ठाणे

ठाणे पालिका शिक्षण विभागाची पुनर्रचना; २,३०४ पदांचा आकृतिबंध; ३४९ नवीन पदांची निर्मिती प्रस्तावित

ठाणे महापालिकेच्या शिक्षण विभागाचा कारभार अधिक सक्षम आणि गतिमान करण्यासाठी प्रशासनाने विभागाच्या पुनर्रचनेचा प्रस्ताव तयार केला आहे. पूर्वप्राथमिक, प्राथमिक आणि माध्यमिक विभागांचा एकत्रित आकृतिबंध निश्चित करण्यात आला असून, अधिकारी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची मिळून एकूण २ हजार ३०४ पदे प्रस्तावित करण्यात आली आहेत. यामध्ये ३४९ नवीन पदांची निर्मिती करण्याचा समावेश आहे.

Swapnil S

ठाणे : ठाणे महापालिकेच्या शिक्षण विभागाचा कारभार अधिक सक्षम आणि गतिमान करण्यासाठी प्रशासनाने विभागाच्या पुनर्रचनेचा प्रस्ताव तयार केला आहे. पूर्वप्राथमिक, प्राथमिक आणि माध्यमिक विभागांचा एकत्रित आकृतिबंध निश्चित करण्यात आला असून, अधिकारी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची मिळून एकूण २ हजार ३०४ पदे प्रस्तावित करण्यात आली आहेत. यामध्ये ३४९ नवीन पदांची निर्मिती करण्याचा समावेश आहे. हा प्रस्ताव महासभेच्या मंजुरीनंतर अंतिम मान्यतेसाठी शासनाकडे पाठविण्यात येणार आहे.

महापालिकेच्या शिक्षण मंडळांतर्गत पूर्वप्राथमिक, प्राथमिक आणि माध्यमिक असे स्वतंत्र विभाग कार्यरत होते. ३ एप्रिल २०१४ रोजीच्या महापालिका आदेशानुसार या तिन्ही विभागांचे एकत्रीकरण करून त्यांना शिक्षण विभाग असे संबोधण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, एकत्रित विभागासाठी आवश्यक आकृतिबंध आणि सेवा प्रवेश नियम निश्चित झाले नव्हते. त्यामुळे नियुक्त्या, पदोन्नती आणि प्रशासकीय कामकाजात सुसूत्रता आणण्यासाठी नव्या पदरचनेची आवश्यकता निर्माण झाली होती.

प्रशासनाने यापूर्वी २०१६ आणि २०२१ मध्ये आकृतिबंध व सेवा प्रवेश नियमांचे प्रस्ताव शासनाकडे पाठविले होते. त्यानंतर विविध संवर्गांतील पदांना मान्यता देणे, पदांचे समायोजन, पदनामात बदल तसेच काही पदे रद्द करण्याबाबत शासनस्तरावर निर्णय घेण्यात आले. २०२३ मध्ये महापालिकेच्या विविध संवर्गांच्या सेवा प्रवेश नियमांनाही शासनाची मान्यता मिळाली. त्यानुसार आता शिक्षण विभागाच्या पदरचनेत बदल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

नव्या प्रस्तावात प्रशासकीय विभागातील उपआयुक्त (शिक्षण), शिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी, लेखाधिकारी, कार्यालयीन अधीक्षक, उपअधीक्षक, वरिष्ठ व कनिष्ठ लिपिक, वाहनचालक आणि शिपाई अशा ५६ पदांचा समावेश आहे. शैक्षणिक विभागात गटाधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, प्राथमिक व माध्यमिक शिक्षक, बालवाडी शिक्षिका, प्रयोगशाळा सहाय्यक, परिचर आणि विशेष शिक्षकांची पदे प्रस्तावित आहेत.

महापालिका क्षेत्रातील वाढती लोकसंख्या, विद्यार्थ्यांची संख्या आणि भविष्यात सुरू होणाऱ्या सीबीएसई शाळांच्या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाचे मनुष्यबळ सक्षम करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. उपआयुक्त (मुख्यालय) यांनी हा प्रस्ताव महासभेच्या मंजुरीसाठी सादर केला आहे. महासभेची मान्यता मिळाल्यानंतर तो अंतिम मंजुरीसाठी शासनाकडे पाठविण्यात येईल. त्यानंतरच नवीन पदांची निर्मिती, भरती आणि पदोन्नतीचा मार्ग मोकळा होणार आहे.

पदोन्नती आणि भरतीचे निकष निश्चित होणार

प्रत्येक पदासाठी शैक्षणिक पात्रता, अनुभव, वेतनश्रेणी, नियुक्तीची पद्धत आणि पदोन्नतीचे निकष निश्चित करण्यात आले आहेत. काही पदे पदोन्नतीने, काही प्रतिनियुक्तीने, तर काही थेट भरतीद्वारे भरण्याचे प्रस्तावित आहे. उपआयुक्त पदासाठी ५० टक्के पदोन्नती आणि ५० टक्के प्रतिनियुक्ती अशी नियुक्तीची पद्धत सुचविण्यात आली आहे. सातव्या वेतन आयोगानुसार वेतनश्रेणी निश्चित करताना महापालिकेतील अन्य संवर्गांशी समानता राखण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

पाच माध्यमांसाठी स्वतंत्र शिक्षक पदरचना

प्राथमिक विभागात मराठी माध्यमासाठी ४२२, हिंदीसाठी ४७, उर्दूसाठी १७६, गुजरातीसाठी ३ आणि इंग्रजी माध्यमासाठी ५७७ शिक्षक पदांचा समावेश आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे, यासाठी कर्णबधिर, दिव्यांग, गतिमंद, अध्ययन अक्षमता आणि बहुविकलांग विद्यार्थ्यांसाठी विशेष शिक्षकांची पदेही प्रस्तावित करण्यात आली आहेत. याशिवाय मानसोपचारतज्ज्ञ, श्रवण व वाचा तज्ज्ञ, भौतिकोपचारतज्ज्ञ आणि व्यवसायोपचारतज्ज्ञ अशा विशेष तज्ज्ञ पदांचाही समावेश आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

महाराष्ट्रात थंडीचा कडाका वाढणार; जळगावात नीचांकी ८ अंश तापमानाची नोंद

Maharashtra HSC Exam 2027 : बारावीच्या अर्थशास्त्राच्या पेपरची वेळ बदलली

Satara : जिल्हा बँकेतील पराभवाने भाजप नेते बिथरले; शिवेंद्रसिंहराजे आणि जयकुमार गोरे यांच्यात जुंपली!

सलग नवव्या दिवशी सोन्याच्या दरात घसरण; सोने ५,२००, तर चांदी ४,००० रुपयांनी स्वस्त

मुंढवा जमीन व्यवहार प्रकरण : पार्थ पवार यांना दिलासा