ठाणे : ठाण्यात भाजप व शिवसेना (शिंदे गट) यांच्यात ठाणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी जागावाटपावरून जोरदार घमासान सुरू आहे. कारण ठाणे मनपा ही अनेक वर्षांपासून शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेला आहे. तर भाजपला शिवसेनेकडून अधिक जागा हव्या आहेत. या दोन्ही पक्षांमध्ये होणारी तिसरी बैठक सोमवारी होणार होती. मात्र, ती न झाल्याने भाजपने ठाणे मनपाच्या १३१ जागांवर स्वबळावर निवडणुकीची चाचपणी सुरू केल्याचे उघड झाले आहे.
गेल्या आठवड्यात शिंदे सेना आणि भाजपच्या दोन बैठका पार पडल्या होत्या. या पहिल्या बैठकीत युतीबाबत साधक बाधक चर्चा झाल्यानंतर जागा वाटपाचा फार्म्युला शिंदे सेनेने द्यावा, अशी भूमिका भाजपने घेतली होती. त्यानंतर झालेल्या दुसऱ्या बैठकीत भाजपने थेट शिंदे सेनेच्या काही महत्वांच्या जागांवर दावा केला. त्यामुळे या जागांवरून तीन तास घासाघीस झाली. तसेच युती झाल्यास किमान ५५ जागा मिळाव्यात यासाठी भाजपने आग्रह धरला होता. अखेर या संदर्भात २२ डिसेंबर रोजी घोषणा केली जाईल, यावर एकमत झाल्याचेही दिसून आले.
शिंदे सेनेकडून कोणताच प्रतिसाद न आल्याने सोमवारी भाजपने १३१ प्रभागातून आलेल्या इच्छुकांच्या अर्जांची छाननी केली. यात कोणत्या प्रभागात कोणता उमेदवार दिला जाऊ शकतो. कोणत्या प्रभागात उमेदवार बदलावा लागेल. या संदर्भातील चर्चा करीत संपूर्ण १३१ प्रभागातील जवळ जवळ उमेदवार निश्चितीवर भाजपचे पदाधिकारी आल्याची माहिती समोर आली आहे.
सोमवारी झालेल्या या बैठकीला आमदार संजय केळकर, कोकण पदवीधर मतदार संघाचे आमदार तथा ठाणे निवडणुक प्रभारी निरंजन डावखरे, शहर अध्यक्ष संदीप लेले, माधवी नाईक आदींसह इतर महत्त्वाचे पदाधिकारी उपस्थित होते.
युती करायची की नाही ते स्पष्ट करा
यापूर्वी बैठकीसाठी आम्हीच पुढाकार घेतल्याचा दावा भाजपने केला आहे. शिंदे सेनेकडून निरोप येत नसल्याने आता कोणत्या प्रभागात कोण विजयी ठरू शकतो, याची चाचपणी सोमवारी केली गेली आहे. शिंदे सेनेने युती करायची की नाही ते स्पष्ट करावे अन्यथा आम्हाला वेगळा विचारा करावा लागेल, अशी ताठर भूमिका भाजपने घेतल्याचे सूत्रांनी सांगितले.