ठाणे : दिवा प्रभागातील डंपिंग ग्राऊंडमध्ये गेल्या सात वर्षांपासून (२०१६ ते २०२३) ठाणे महापालिकेकडून सातत्याने बेकायदेशीर कचरा टाकण्यात येत होता. या प्रकारामुळे परिसरातील खारफुटीचे जैवविविधतेचे मोठे नुकसान, दुर्गंधी, लीचेट्समुळे भूजल प्रदूषण आणि स्थानिक नागरिकांच्या आरोग्यावर मोठा परिणाम झाला. या गंभीर प्रकरणी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (MPCB) ठाणे महापालिकेला तब्बल १०.२ कोटींचा दंड ठोठावला आहे.
ही कारवाई म्हणजे दिवा परिसरातील जनतेचा संघर्ष आणि वनशक्ती फाऊंडेशनचे संस्थापक स्टॅलिन दयानंद या सारख्या पर्यावरण प्रेमी संस्थांचा विजय आहे. आम्ही सुरुवातीपासूनच या प्रश्नावर सातत्याने आवाज उठवत आलो असून, आजची ही कारवाई म्हणजे जनतेच्या आवाजाची दखल घेतली गेली, असल्याचे मत उद्धव सेनेचे नेते रोहिदास मुंडे यांनी व्यक्त केले.
महापालिकेने डंपिंग ग्राऊंड परिसरातील सर्व बेकायदेशीर कचरा त्वरित साफ करण्यात यावा. प्रदूषित भूजल व परिसराचे वैज्ञानिक पुनर्वसन केले जावे. आरोग्य धोका निर्माण झालेल्या परिसरातील नागरिकांसाठी वैद्यकीय शिबिरे लावावीत, अशा मागण्या दिव्यातील नागरिकांनी केल्या आहेत.
या संदर्भात आम्ही अपिलात जाणार आहोत. दिवा आणि भांडरली येथील डंपिंगचे ठिकाणची जागा पूर्ववत करून दिली जाणार आहे. त्या संदर्भातला निविदा काढून ठेकेदार अंतिम झालेला आहे आणि येथील जागा पूर्ववत करण्यासाठी आमची तयारी देखील पूर्ण झालेली आहे. त्यामुळे आम्हाला लावलेला दंड रद्द करावा, अशी आमची मागणी असणार आहे.मनीष जोशी , उपायुक्त घनकचरा विभाग ठाणे मनपा