ठाणे : तब्बल दहा महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर ठाणे महापालिकेची स्थायी समिती अखेर अस्तित्वात आली आहे. मात्र, सदस्य निवडीची प्रक्रिया पूर्ण होताच आता सभापतीपदासाठी जोरदार राजकीय रस्सीखेच सुरू झाली आहे. सभापतीपदासाठी दिलीप बारटक्के, पवन कदम आणि राजेश मोरे यांच्या नावांची चर्चा सुरू असून, महिला सभापतीचीही शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे या महत्त्वाच्या पदावर कोणाची वर्णी लागणार, याकडे ठाण्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
गेल्या दहा महिन्यांपासून ठाणे महापालिकेतील स्थायी समितीसह विविध विषय समित्यांच्या निवडी रखडल्या होत्या. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर अखेर शुक्रवारी झालेल्या महासभेत स्थायी समितीच्या १६ सदस्यांची अधिकृत घोषणा करण्यात आली. या निवडीमुळे महापालिकेतील राजकीय समीकरणे स्पष्ट झाली असली, तरी सदस्य निवडीच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षातील अनेक दिग्गजांना डावलून नव्या चेहऱ्यांना संधी दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
शिंदेसेनेकडून दिलीप बारटक्के, राजेश मोरे, पवन कदम, बाबाजी पाटील, महेश साळवी, संध्या मोरे, प्रमिला केणी, विक्रांत तांडेल आणि आदेश भगत या नऊ जणांची निवड करण्यात आली आहे. भाजपकडून कमल चौधरी, भरत चव्हाण आणि मृणाल पेंडसे यांना संधी देण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाकडून यासिन कुरेशी आणि पल्लवी जगताप, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाकडून सुहास देसाई, तर एमआयएमकडून शोहेब डोंगरे यांची निवड झाली आहे.
स्थायी समितीत शिंदेसेनेचे नऊ सदस्य असून भाजपचे तीन सदस्य आहेत. त्यामुळे महायुतीचे एकूण संख्याबळ १२ झाले आहे. मात्र, या निवडीतील सर्वाधिक चर्चेचा विषय ठरला आहे तो म्हणजे अनुभवी आणि प्रभावशाली नगरसेवकांना डावलून नव्या चेहऱ्यांना देण्यात आलेली संधी. अनेक वर्षांपासून महापालिकेच्या राजकारणात आपले वर्चस्व राखणाऱ्या दिग्गजांना बाजूला सारत शिंदे यांनी नव्या नेतृत्वाला संधी दिल्याचे बोलले जात आहे.
स्थायी समिती सदस्यांची घोषणा होण्यापूर्वी शिंदेसेनेतील राम रेपाळे, विकास रेपाळे, योगेश जाणकर, रमाकांत मढवी, सिद्धार्थ ओवळेकर, मनोज शिंदे, राजेंद्र फाटक आणि राजेश मोरे यांच्या नावांची जोरदार चर्चा होती. सोशल मीडियावरही संभाव्य सदस्यांची यादी फिरत होती. याच नावांमधून स्थायी समितीचा सभापती निवडला जाईल, असे राजकीय वर्तुळात बोलले जात होते. मात्र, शुक्रवारी महापौर शर्मिला पिंपळोलकर यांच्याकडे गटनेते पवन कदम यांनी नऊ सदस्यांची नावे असलेले पत्र सादर केले. महापौरांनी सदस्यांची नावे जाहीर करताच अनेकांचे अंदाज फोल ठरले. चर्चेतील अनेक दिग्गजांना डावलण्यात आले, तर नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली. या यादीत राजेश मोरे यांना मात्र स्थान मिळाले.
महिला सभापतीची शक्यता
तीन वेळा नगरसेविका म्हणून निवडून आलेल्या संध्या मोरे यांच्या नावाचीही सभापतीपदासाठी चर्चा सुरू झाली आहे. महापौरपद महिलेकडे असताना स्थायी समितीचे सभापतीपदही महिलेला देऊन पक्षाकडून नवे राजकीय समीकरण मांडले जाणार का, याबाबत उत्सुकता आहे. त्यामुळे बारटक्के, कदम आणि राजेश मोरे यांच्यासह महिला उमेदवाराचाही पर्याय पक्षाकडून विचाराधीन असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
बारटक्के, कदम, मोरे यांची नावे आघाडीवर
स्थायी समितीच्या सभापतीपदासाठी दिलीप बारटक्के यांचे नाव प्रामुख्याने चर्चेत आहे. चार वेळा नगरसेवक म्हणून निवडून आलेले बारटक्के हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू मानले जातात. महापालिकेच्या कामकाजाचा अनुभव आणि पक्षातील जवळीक या पार्श्वभूमीवर त्यांच्या नावाला पसंती मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे. दुसरीकडे, शिंदेसेनेचे गटनेते पवन कदम यांनाही स्थायी समितीत स्थान देण्यात आले आहे. त्यामुळे त्यांच्या नावाचीही चर्चा सुरू आहे. मात्र, गटनेतेपदाची जबाबदारी सांभाळत असताना त्यांच्याकडे सभापतीपदाची अतिरिक्त जबाबदारी सोपवली जाणार का, हा प्रश्न आहे. राजेश मोरे यांचे नावही सभापतीपदाच्या शर्यतीत असून, ते शिंदे यांचे निष्ठावंत पदाधिकारी म्हणून ओळखले जातात.
सभापती निवडीतही धक्कातंत्राचा प्रयोग?
सदस्य निवडीतून पक्षातील प्रस्थापितांना बाजूला सारण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता सभापतीपदाच्या निवडीतही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे धक्कातंत्राचा वापर करणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अनुभवी नगरसेवकाला संधी मिळणार, पक्षाच्या निष्ठावंत पदाधिकाऱ्याला बक्षीस मिळणार की, महिला सभापतीच्या माध्यमातून नवे राजकीय समीकरण आकाराला येणार, हे लवकरच स्पष्ट होणार आहे. तब्बल दहा महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर स्थायी समिती अस्तित्वात आली असली, तरी आता सभापतीपदासाठी सुरू झालेली राजकीय रस्सीखेच शिंदेसेनेतील अंतर्गत समीकरणांची कसोटी पाहणारी ठरणार आहे. त्यामुळे सभापतीपदाची माळ नेमकी कोणाच्या गळ्यात पडते, याबाबत ठाण्याच्या राजकीय वर्तुळात उत्सुकता निर्माण झाली आहे.