ठाणे : ठाणे महापालिका निवडणुकीत विजयी उमेदवारांइतकीच चर्चा पराभूत ठरलेल्या काही उमेदवारांचीही झाली. विशेष म्हणजे, अपक्ष म्हणून निवडणूक लढवलेल्या आणि थेट बलाढ्य पक्षांना टक्कर देणाऱ्या २७ उमेदवारांनी मतदारांवर आपली ठसठशीत छाप उमटवली. पराभव स्वीकारूनही या उमेदवारांनी दिलेल्या लढतींमुळे संपूर्ण निवडणूक रणधुमाळीत रंगत निर्माण झाली.
या २७ अपक्ष उमेदवारांनी मिळून तब्बल १ लाख ४२ हजार ५३ मते मिळवली. विशेष बाब म्हणजे अनेक विजयी नगरसेवकांपेक्षा अधिक मते या पराभूत अपक्ष उमेदवारांना मिळाली आहेत. त्यामुळे ठाण्यातील राजकीय समीकरणे ढवळून निघाल्याचे चित्र दिसून आले.
प्रभाग क्रमांक ५ मधील अपक्ष उमेदवार विकी पाटील यांनी सर्वाधिक ९८९२ मते मिळवत भाजपच्या उमेदवाराविरोधात चुरशीची लढत दिली. त्यांच्यानंतर खारेगाव येथील सुरेखा पाटील यांनी ९६५८ मते, तर प्रभाग क्रमांक २२ मधील विकास दाभाडे यांनी ९३८२ मते मिळवत शेवटच्या फेरीपर्यंत उत्कंठा कायम ठेवली.
विशेष लक्ष वेधून घेतलेली लढत प्रभाग क्रमांक ३ मध्ये पाहायला मिळाली. येथे अपक्ष उमेदवार भूषण भोईर यांनी ७७४९ मते घेत अवघ्या ११ मतांनी पराभव पत्करला.
अनेक प्रभागांत अपक्षांचा प्रभाव
प्रभाग क्रमांक १५ मध्ये सुप्रिया सोडारी यांनी ८८२७ मते मिळवत सत्ताधारी उमेदवारांसमोर मोठे आव्हान उभे केले. प्रभाग क्रमांक २१ मध्ये किरण नाकती यांनी ६७०३ मते, तर प्रभाग क्रमांक ४ मध्ये नितीन लांडगे यांनी ६९२५ मते मिळवत लक्षवेधी कामगिरी केली. कोपरी, खारेगाव, मुंब्रा, कळवा आणि घोडबंदर रोड परिसरातील अनेक प्रभागांत अपक्ष उमेदवारांनी मोठ्या पक्षांचे गणित बिघडवले. काही ठिकाणी विजयाचा फरक अत्यंत कमी राहिल्याने अपक्षांची ताकद स्पष्टपणे दिसून आली.
एकूण अपक्षांची मतलूट
या निवडणुकीत एकूण १७५ अपक्ष उमेदवार रिंगणात होते. त्यापैकी २७ प्रमुख अपक्षांनी १.४२ लाख मते मिळवली, तर उर्वरित १४८ अपक्षांना मिळून ६३,५४१ मते मिळाली. एकूण पाहता अपक्ष उमेदवारांनी सुमारे २ लाख ५ हजार ५९४ मते मिळवत ठाणे महापालिका निवडणुकीत निर्णायक भूमिका बजावली.
राजकीय पक्षांसाठी इशारा
या निकालांनी राजकीय पक्षांना स्पष्ट संदेश दिला आहे. स्थानिक पातळीवर असलेली नाराजी, बंडखोरी आणि व्यक्तीगत संपर्कामुळे अपक्ष उमेदवारांना मोठा पाठिंबा मिळू शकतो, हे या निवडणुकीतून अधोरेखित झाले आहे. आगामी काळात महापालिका राजकारणात अपक्ष घटक दुर्लक्षित करता येणार नाही, हे मात्र नक्की.