ठाणे : कमळाच्या पाकळ्यांत श्रद्धेचा रंग खुलतो, तर वॉटर लिलीच्या सौंदर्यात निसर्गाचे वैभव फुलते... नवरात्रोत्सवात देवीच्या मंदिरांबाहेर कमळासारख्या दिसणाऱ्या वॉटर लिलीचीही मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे. या दोन्ही जलपुष्पांतील साम्यामुळे भाविकांचा गोंधळ उडतो. मात्र, त्यांच्यातील फरक ओळखण्यासोबतच जलवनस्पतींचे पर्यावरणीय महत्त्व जाणून घेणेही आवश्यक आहे.
नवरात्रोत्सवात महालक्ष्मी, दुर्गामाता आणि अन्य देवींच्या मंदिरांमध्ये कमळाच्या फुलांना विशेष महत्त्व असते. देवीच्या चरणी फूल अर्पण करण्यासाठी भाविकांची पसंती कमळाला असते. याच काळात मंदिरांबाहेरील फूलविक्रेत्यांकडे कमळासारखी दिसणारी वॉटर लिली अर्थात जलकमळही विविध रंगांत विक्रीसाठी उपलब्ध असते. दोन्ही फुले दिसायला काहीशी सारखी असल्याने त्यांच्यातील फरक सहज लक्षात येत नाही.
दोन्ही फुलांची ओळख महत्त्वाची
कमळ आणि वॉटर लिली या दोन वेगवेगळ्या जलवनस्पती आहेत. कमळाच्या फुलाच्या मध्यभागी पिवळसर, ठळक बीजकोश दिसतो, तर त्याची पाने साधारणपणे पाण्याच्या पृष्ठभागापेक्षा वर उंचावलेली असतात. वॉटर लिलीची पाने प्रामुख्याने पाण्यावर तरंगतात आणि तिची फुले विविध रंगांत आढळतात.
जनजागृतीतून निसर्गसंवर्धन
कमळ आणि वॉटर लिलीतील फरक चित्रफलक, माहितीपत्रके आणि समाजमाध्यमांतून समजावून सांगता येऊ शकतो. मंदिरांबाहेरील विक्रेत्यांनीही विक्रीसाठी ठेवलेल्या फुलांची योग्य ओळख भाविकांना करून द्यावी. यामुळे नागरिकांना योग्य माहिती मिळेल आणि जलवनस्पतींच्या पर्यावरणीय महत्त्वाची जाणीवही वाढेल.
जलवनस्पतींचे पर्यावरणीय महत्त्व
कमळ आणि वॉटर लिली या केवळ सौंदर्य किंवा पूजेसाठी महत्त्वाच्या वनस्पती नाहीत. नैसर्गिक जलपरिसंस्थेत त्यांचेही स्थान आहे. तलावांमधील जलवनस्पती अनेक जलचर आणि सूक्ष्मजीवांना अधिवास उपलब्ध करून देतात. त्यामुळे तलावांचे प्रदूषण रोखणे, जलवनस्पतींचे अधिवास जपण्यास मदत मिळते.
श्रद्धा जपत निसर्गाचे संवर्धन करणे ही काळाची गरज आहे. देवीला फूल अर्पण करताना त्याची ओळख आणि जलपरिसंस्थेचे रक्षण याबाबत जनजागृती होणे आवश्यक आहे.डॉ. प्रशांत सिनकर, (पर्यावरण अभ्यासक, ठाणे)