ठाणे : संकटाच्या क्षणी नागरिकांनी केलेल्या प्रत्येक मदतीच्या हाकेला ठाणे पोलिसांनी तत्पर प्रतिसाद दिल्याचे आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे. १ जून ते १० जुलै या ४० दिवसांच्या कालावधीत ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या नियंत्रण कक्षात २२ हजार ५०७ आपत्कालीन कॉल प्राप्त झाले. या प्रत्येक कॉलची तत्काळ नोंद घेऊन संबंधित पोलीस ठाण्यांशी समन्वय साधत शक्य तितक्या कमी वेळेत मदत पोहोचविण्यात आली.
पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे पोलीस आयुक्तालयाचा नियंत्रण कक्ष चोवीस तास कार्यरत असून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सातत्याने सेवा देत आहे. नियंत्रण कक्षामार्फत महिला अत्याचार, ज्येष्ठ नागरिकांना मदत, चोरी, घरफोडी, महिला व बालकांच्या सुरक्षेशी संबंधित घटना, नैसर्गिक आपत्ती, संशयास्पद हालचाली तसेच इतर विविध आपत्कालीन घटनांबाबत आलेल्या हजारो कॉलवर तातडीने कारवाई करण्यात आली. उपलब्ध आकडेवारीनुसार जून महिन्यात पोलिसांनी सरासरी ८ मिनिटे ३६ सेकंदांत, तर जुलैच्या पहिल्या दहा दिवसांत ९ मिनिटे २ सेकंदांत घटनांवर प्रतिसाद दिला.
जून महिन्यात ठाणे नगर पोलीस ठाण्याने सरासरी ५ मिनिटे १५ सेकंदांत घटनास्थळी पोहोचून सर्वाधिक जलद प्रतिसाद दिला, तर जुलैच्या पहिल्या दहा दिवसांत कोनगाव पोलीस ठाण्याने सरासरी ६ मिनिटे १० सेकंदांत प्रतिसाद देत उल्लेखनीय तत्परता दाखविली.
कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास नागरिकांनी घाबरून न जाता तत्काळ ११२ या हेल्पलाइनवर संपर्क साधावा. घटनास्थळाची अचूक माहिती दिल्यास पोलिसांना अधिक वेगाने मदत पोहोचविता येते. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी ठाणे पोलीस चोवीस तास सज्ज आणि तत्पर आहेत.निशिकांत विश्वकार, सहाय्यक पोलीस आयुक्त
मुंब्रा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून सर्वाधिक फोन
आयुक्तालयाच्या आकडेवारीनुसार १ ते ३० जून या कालावधीत १७ हजार ५९८ कॉल प्राप्त झाले, तर १ ते १० जुलै या दहा दिवसांत ४ हजार ९०९ कॉलची नोंद झाली. म्हणजेच या ४० दिवसांत दररोज सरासरी ५६० हून अधिक नागरिकांनी आपत्कालीन मदतीसाठी पोलिसांशी संपर्क साधला. पोलीस ठाणानिहाय आकडेवारीत मुंब्रा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून सर्वाधिक १,७४६ कॉल प्राप्त झाले. त्यापाठोपाठ कळवा, मानपाडा आणि नौपाडा या पोलीस ठाण्यांच्या हद्दींमधूनही मोठ्या प्रमाणात आपत्कालीन कॉल आले, तर कोपरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून सर्वात कमी १७७ कॉल नोंदविण्यात आले.