ठाणे : ठाणे महापालिकेच्या महासभेत नारी शक्ती वंदन अधिनियम मुद्द्यावरून राजकारण तापले असून भाजप आणि शिंदे सेनेतील यांच्यातील मतभेद पुन्हा एकदा उघड झाले आहेत. भाजप नगरसेवकांनी मांडलेला तहकुबी प्रस्ताव महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी पटलावर न घेतल्याने वाद निर्माण झाला. त्यामुळे संतप्त झालेल्या भाजपच्या नगरसेवकांनी महापौरांऐवजी आयुक्तांसह प्रशासनावर टीका करत निषेध नोंदवला. दरम्यान, असा प्रकार करणाऱ्यांना सभा शास्त्र शिकवण्याची गरज असल्याचा टोला शिंदे सेनेच्या नगरसेवकांना लगावला.
भाजपकडून संसदेत या विधेयकाला विरोध करणाऱ्या काँग्रेस आणि सहयोगी पक्षांच्या निषेधार्थ ठाणे पालिकेची सभा पूर्ण दिवस तहकूब करण्याचा प्रस्ताव भाजपचे नगरसेवक भरत चव्हाण यांनी मांडला होता. या प्रस्तावाला उपमहापौर कृष्णा पाटील आणि नंदा पाटील यांनी अनुमोदन दिले होते. दरम्यान, माजी नगरसेवक श्याम पाटील आणि प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांच्या निधनाचे दुखवठा ठरावाचे वाचन करून पूर्णवेळ सभा तहकूब करण्यात आली.
भाजप-शिंदे सेनेत शाब्दिक चकमक
भाजपच्या नगरसेवकाने मांडलेला प्रस्ताव सभागृहात घेण्यात आला नाही. यामुळे संतप्त भाजप नगरसेवकांनी महापौरांऐवजी प्रशासनावर टीका करत पालिका आवारात निषेध नोंदवला. दरम्यान, या घटनेवर प्रतिक्रिया देताना शिंदे सेनेच्या नगरसेवकांनी भाजपवरच टीका केली. सभागृहाचे नियम समजून घेण्याची गरज आहे, असा टोला त्यांनी लगावला. यामुळे दोन्ही पक्षांत शाब्दिक चकमक झाली.
आरोप-प्रत्यारोप
या प्रकरणात भाजपचे नगरसेवक भरत चव्हाण यांनी आरोप केला की, महिलांशी संबंधित महत्त्वाच्या मुद्द्यावर चर्चा टाळण्यात आली. प्रशासनाने आमचा प्रस्ताव वाचलाच नाही. त्यामुळे आम्ही निषेध नोंदवला. यावर शिंदे सेनेचे नगरसेवक राजेश मोरे म्हणाले, सभागृहाचे नियम समजून घेणे आवश्यक आहे. प्रत्येक विषय मांडण्याची प्रक्रिया असते. केवळ त्रुटी शोधून निषेध करणे योग्य नाही. दरम्यान, ठाणे महापालिकेच्या सभागृहात कोणते विषय घ्यायचे याचा अंतिम अधिकार महापौरांकडे असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.