ठाणे : उद्धवसेनेचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्या प्रकरणात त्यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्यासाठी ज्येष्ठ वकिलांची मदत उपलब्ध करून देण्यात येईल, अशी ग्वाही परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी शनिवारी दिली. पूर्णेकर कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांनी सांत्वन केले. तसेच कुटुंबीयांच्या सुरक्षेच्या मागण्यांची दखल घेऊन आवश्यक ती व्यवस्था करण्याच्या सूचना पोलिसांना दिल्याचे त्यांनी सांगितले.
प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येनंतर १८ दिवसांनी सरनाईक यांनी कुटुंबीयांची भेट घेतली. या भेटीस झालेल्या विलंबाबद्दल त्यांनी दिलगिरी व्यक्त केली. घटनेनंतर ठाण्यात निर्माण झालेल्या तणावपूर्ण वातावरणामुळे आणि अनुचित प्रकार टाळण्यासाठी योग्य वेळ साधून भेट घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पूर्णेकर कुटुंबीयांशी अनेक वर्षांपासून कौटुंबिक संबंध असल्याचे सांगत, या कठीण प्रसंगी त्यांच्या पाठीशी उभे राहणे ही आपली जबाबदारी असल्याचेही त्यांनी नमूद केले.
हत्या प्रकरणाचा निष्पक्ष तपास करून दोषींवर कायद्यानुसार कठोर कारवाई व्हावी आणि तपासावर कोणताही राजकीय दबाव येऊ नये, अशी भूमिका सरनाईक यांनी मांडली. कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्यासाठी अनुभवी ज्येष्ठ वकिलांची मदत उपलब्ध करून देण्याची ग्वाहीही त्यांनी दिली. यावेळी पूर्णेकर हत्या प्रकरणाचा तपास योग्य दिशेने आणि निष्पक्षपणे व्हावा, अशी मागणी ज्येष्ठ नगरसेवक संजय भोईर यांनी केली. मीनाक्षी शिंदे यांच्याविरोधात यापूर्वी तक्रारी करण्यात आल्या होत्या. मात्र, पोलिसांनी त्यांची वेळीच दखल घेतली असती, तर कदाचित ही घटना घडली नसती, असा आरोप भोईर यांनी केला.
शिंदेंनी फोनवरून दिला धीर
कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर सरनाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी फोनवरून संपर्क साधून राम पूर्णकर यांचे त्यांच्याशी बोलणे करून दिले. यावेळी राम पूर्णकर यांनी न्यायाची अपेक्षा व्यक्त करत माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांचा राजीनामा घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली. शिंदे यांनीही कुटुंबीयांना धीर देत त्यांच्या पाठीशी असल्याचे आश्वासन दिले.
न्यायासाठी मुख्यमंत्र्यांकडे साकडे
नवरात्रोत्सवानिमित्त ठाण्यातील बाळकुम येथील यशस्वी नगर परिसरात देवीच्या दर्शनासाठी आलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रदीप पूर्णकर यांचे पुत्र राम पूर्णकर यांनी भेट घेतली. वडिलांच्या हत्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर करून कुटुंबीयांची कुटुंबीयांना धीर देत त्यांच्या पाठीशी भूमिका मांडली. यावेळी फडणवीस यांनी ठामपणे उभे राहण्याचे आश्वासन दिले.