Thane : 'देवाभाऊंवरच विश्वास, तेच न्याय मिळवून देतील'; प्रदीप पूर्णेकर यांच्या मुलाची मुख्यमंत्र्यांना साद 
ठाणे

Thane : 'देवाभाऊंवरच विश्वास, तेच न्याय मिळवून देतील'; प्रदीप पूर्णेकर यांच्या मुलाची मुख्यमंत्र्यांना साद

उद्धवसेनेचे मानपाडा विभागप्रमुख प्रदीप पूर्णकर यांच्या हत्येला एक महिना उलटूनही त्यांच्या कुटुंबीयांची न्यायासाठीची प्रतीक्षा कायम आहे.

Swapnil S

ठाणे : उद्धवसेनेचे मानपाडा विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास दडपण्याचा प्रयत्न होत असल्याची भीती व्यक्त करत पूर्णेकर यांचे पुत्र राम यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भावनिक साद घातली आहे. 'इतर कोणाकडूनही आता अपेक्षा नाही. माझा विश्वास केवळ देवाभाऊंवर आहे. तेच माझ्या कुटुंबाला न्याय मिळवून देऊ शकतात,' अशी भावना त्यांनी समाजमाध्यमांवर व्यक्त केली आहे.

मानपाडा येथील कार्यालयात प्रदीप पूर्णेकर यांची हत्या करण्यात आली होती. या घटनेला एक महिना पूर्ण झाला असूनही हत्येमागील सर्व बाबींचा उलगडा होण्याची कुटुंबीयांना प्रतीक्षा आहे. या प्रकरणावरून ठाण्यात राजकीय आरोप-प्रत्यारोप आणि आंदोलने सुरू असतानाच राम पूर्णेकर यांनी थेट मुख्यमंत्र्यांकडे न्यायाची अपेक्षा व्यक्त केली आहे. पोलिसांच्या तपासाबाबतही त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. पोलिसांनी करावयाची कामे आज आम्हाला स्वतः करावी लागत आहेत. ठाण्यात अनेक घडामोडी घडत असून, वडिलांच्या हत्येचे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न होत असल्याची भीती वाटत आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

या प्रकरणातील काही महत्त्वाच्या बाबी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून द्यायच्या आहेत. काही गोष्टी त्यांना प्रत्यक्ष दाखवायच्या आणि सांगायच्या आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी भेटीसाठी वेळ द्यावा, अशी विनंती राम यांनी केली आहे.

मुख्यमंत्र्यांच्या भेटीची प्रतीक्षा

हत्येला महिना उलटूनही न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या पूर्णकर कुटुंबीयांनी आता मुख्यमंत्र्यांकडे आशेने पाहिले आहे. राम पूर्णेकर यांनी केलेल्या भावनिक आवाहनानंतर मुख्यमंत्री त्यांना भेटीसाठी वेळ देणार का आणि या प्रकरणाच्या तपासाला कोणती दिशा मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Mumbai : फटाके फोडणाऱ्यांवर नोडेल अधिकाऱ्यांची नजर; पोलीस व पालिकेचे पथक तैनात, १९१६ हेल्पलाइनवर तक्रार करण्याचे आवाहन

मुंबईकरांना मिळणार ४०० नवे लोखंडी कचरा डबे; एका डब्यासाठी पंधराशे रुपये अधिक मोजणार

IIT Bombay Student Suicide Case : आत्महत्येची सीबीआय चौकशी करा! साहिल वाकोडेच्या पालकांची न्यायालयात याचिका

Mumbai : १४ ट्रॅक्शन सबस्टेशन्सची उभारणी अंतिम टप्प्यात; बुलेट ट्रेनसाठी महाराष्ट्रात पाच, तर गुजरातमध्ये ९ सबस्टेशन्स

ठाणे महापालिका कर्मचाऱ्यांना २५ हजारांचे सानुग्रह अनुदान; आशा सेविकांना सहा हजार रुपये, दिवाळीपूर्वी रक्कम कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यांत जमा होणार