'एआय' ने बनविलेली प्रतिमा
ठाणे

Thane : अपघात आणि नियमभंगावर लगाम; स्कूल बसमध्ये आता डॅश कॅम अनिवार्य, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी जिल्हास्तरीय समितीचा निर्णय

आता ठाणे जिल्ह्यातील सर्व शाळांच्या बसमध्ये पुढच्या काचेजवळ डॅश कॅम बसवणे बंधनकारक करण्यात आले आहे.

किशोरी घायवट-उबाळे

विद्यार्थ्यांच्या दैनंदिन प्रवासाची सुरक्षा अधिक मजबूत करण्यासाठी ठाणे जिल्हास्तरीय शाळा बस सुरक्षा समितीने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आता ठाणे जिल्ह्यातील सर्व शाळांच्या बसमध्ये पुढच्या काचेजवळ डॅश कॅम बसवणे बंधनकारक करण्यात आले आहे.

हा निर्णय मंगळवारी (दि. २४) उपपोलीस आयुक्त (वाहतूक) कार्यालयात झालेल्या त्रैमासिक बैठकीत घेण्यात आला. बैठकीचे अध्यक्षस्थान ठाणे शहर वाहतूक विभागाचे उपपोलीस आयुक्त पंकज शिरसाट यांनी भूषवले. विद्यार्थ्यांचा प्रवास अधिक सुरक्षित, शिस्तबद्ध आणि जोखीममुक्त करण्यासाठी विविध उपाययोजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

महत्त्वाचे सुरक्षा निर्देश :

डॅश कॅम बसवणे अनिवार्य

सर्व शाळा बसच्या पुढील बाजूस डॅश कॅम बसवणे आता सक्तीचे असेल. चालकांचे वर्तन निरीक्षणात ठेवणे, अपघातांच्या घटनांमध्ये पुरावा उपलब्ध राहणे आणि वाहतूक नियमभंगावर नियंत्रण ठेवणे हा यामागील मुख्य उद्देश आहे.

दररोज ब्रेथ ॲनालायझर चाचणी

दारूच्या नशेत वाहन चालवण्याच्या घटना टाळण्यासाठी चालकांची दररोज ब्रेथ ॲनालायझर मशीनद्वारे तपासणी करणे आवश्यक राहील.

CNG टाक्यांची सुरक्षा तपासणी

सीएनजीवर चालणाऱ्या बससाठी दर तीन वर्षांनी गॅस टाक्यांची अनिवार्य सुरक्षा तपासणी करणे बंधनकारक असेल.

वाहतूक कोंडी टाळण्यासाठी नियोजन

शाळेजवळील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी बस शाळा सुरू होण्यापूर्वी आणि सुट्टीपूर्वी किमान ३० मिनिटे आधी निश्चित ठिकाणी उभी करणे आवश्यक राहील.

चालक व सहाय्यकांचे प्रशिक्षण

मानवी चुका कमी करण्यासाठी सर्व चालक आणि परिचारकांनी औपचारिक रस्ता सुरक्षा प्रशिक्षण घेणे आवश्यक असल्याचे समितीने स्पष्ट केले.

सुरक्षेबाबत कोणतीही तडजोड नाही

बैठकीत बोलताना उपपोलीस आयुक्त पंकज शिरसाट यांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य असल्याचे स्पष्ट केले.

"विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत कोणतीही तडजोड होणार नाही. पोलीस, प्रशासन, परिवहन विभाग, शाळा व्यवस्थापन आणि बस मालक यांनी समन्वयाने काम केल्यास विद्यार्थ्यांचा प्रवास अधिक सुरक्षित आणि शिस्तबद्ध होईल," असे त्यांनी नमूद केले.

ई-चलन तक्रारींसाठी पर्याय

ई-चलन संदर्भात बस मालकांना काही आक्षेप असल्यास 'महापोलिस' ॲपमधील Grievance विभागात तक्रार नोंदवता येईल. संबंधित अधिकाऱ्यांकडून पडताळणी करून अंतिम निर्णय घेतला जाईल.

या बैठकीला जिल्हा परिषद, ठाणे महापालिका शिक्षण विभाग, टीएमटी (TMT), केडीएमटी (KDMT) व्यवस्थापक तसेच महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC)चे अधिकारी उपस्थित होते.

एकनाथ शिंदेंसोबत गेलेल्या त्या वेळच्या सगळ्या आमदारांना अपात्र करा; सर्वोच्च न्यायालयात ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

मराठवाड्यात दाटले दुष्काळाचे ढग; ११ मोठ्या धरणांमध्ये ६९ टक्के पाणीसाठा

Mumbai : तीन वर्षांत एसी लोकलची तयारी; आयसीएफ १२०, आरसीएफ ७१, एमसीएफ ४७ रेक तयार करणार

महापौरांच्या पत्रामुळे नव्या वादाला तोंड; शैक्षणिक सल्लागाराच्या नियुक्तीसाठी शिक्षण समिती अध्यक्षांना पत्र

व्यावहारिक मराठी येत नसलेल्या ६६४ चालकांना नोटिसा; ३० सप्टेंबरपर्यंत राज्यभर तपासणी मोहीम, ३,९९५ वाहनचालकांची तपासणी