ठाणे : निवडणूक आयोगाच्या मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) मोहिमेवरून ठाण्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. एसआयआरमध्ये ठाणे महापालिका क्षेत्रातील २४ लाख मतदारांची नावे कमी करण्यात आल्याचा गंभीर आरोप ठाणे जिल्हा काँग्रेसचे माजी अध्यक्ष ॲॅड. विक्रांत चव्हाण यांनी केला.
धक्कादायक बाब म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्याचे निवासी नायब तहसीलदार असलेल्या दिनेश पैठणकर यांच्या ८० वर्षीय मातोश्रीचे तसेच चव्हाण यांच्या पत्नीचेही नाव वगळल्याचे आढळून आल्याचे विक्रांत चव्हाण यांनी स्पष्ट केले.
ठाण्यातील एसआयआर मोहीमेचा काँग्रेसच्या विक्रांत चव्हाण यांनी पर्दाफाश केला आहे. ही मोहीम पारदर्शकपणे न राबवता अनेक ठिकाणी बीएलओंनी प्रत्यक्ष घरोघरी न जाता घरबसल्या सर्वेक्षण केल्याचा दावा चव्हाण यांनी केला. ओवळा-माजिवडा मतदारसंघात सुमारे साडेतीन लाख, तर कळवा-मुंब्रा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात नावे वगळण्यात आली आहेत.
आमरण उपोषणाचा इशारा
एसआयआर प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर अनियमितता झाल्याचा आरोप करत चव्हाण यांनी निवडणूक विभाग व जिल्हा प्रशासनाकडे चौकशीची मागणी केली आहे. वगळण्यात आलेली सर्व नावे तातडीने पूर्ववत करावीत, अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. तसेच एसआयआर मोहीम पुन्हा राबवावी, अशी मागणीही विक्रांत चव्हाण यांनी केली आहे.