टीएमटी जाळणार ४ कोटी ६३ लाख तिकिटांसह पास; कळवा-वागळे आगारातील साठा हटवण्याचा निर्णय 
ठाणे

टीएमटी जाळणार ४ कोटी ६३ लाख तिकिटांसह पास; कळवा-वागळे आगारातील साठा हटवण्याचा निर्णय

ठाणे परिवहन सेवेच्या (टीएमटी) साठा विभागात मागील जवळपास दोन दशकांपासून पडून असलेली कोट्यवधी बस तिकिटे आणि हजारो पास आता जाळून नष्ट करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. भाडेवाढीनंतर ही तिकिटे वापरात येण्याची शक्यता नसल्याने साठा विभागात जागेची कमतरता निर्माण झाली आहे.

Swapnil S

ठाणे : ठाणे परिवहन सेवेच्या (टीएमटी) साठा विभागात मागील जवळपास दोन दशकांपासून पडून असलेली कोट्यवधी बस तिकिटे आणि हजारो पास आता जाळून नष्ट करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. भाडेवाढीनंतर ही तिकिटे वापरात येण्याची शक्यता नसल्याने साठा विभागात जागेची कमतरता निर्माण झाली आहे. त्यामुळे कळवा आणि वागळे आगारात पडून असलेल्या जुन्या तिकिटे-पासेसची विल्हेवाट लावण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून तो १८ मार्च रोजी होणाऱ्या महासभेत मंजुरीसाठी मांडला जाणार आहे.

यानुसार टीएमटीकडील ४ कोटी ६३ लाख ८५ हजार ५३७ तिकिटे तसेच विविध पास जाळून नष्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. टीएमटीच्या वागळे आणि कळवा आगारातील मुख्य साठा विभागात विविध दरांची बस तिकिटे आणि पास दीर्घकाळापासून वापरात नसल्याने पडून आहेत. यामध्ये २००७ ते २००८ या कालावधीतील एक कोटीहून अधिक तिकिटांचा समावेश आहे. २०१५ मध्ये परिवहन सेवेचे भाडे वाढवण्यात आल्यानंतर ही तिकिटे आणि पास पुढे वापरणे शक्य राहिले नाही. परिणामी हा मोठा साठा जागा व्यापून पडला असून साठा विभागात जागेची टंचाई निर्माण झाली आहे. तसेच दीर्घकाळ पडून राहिल्याने कागदी तिकिटे खराब होण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, या प्रस्तावाला परिवहन व्यवस्थापकांनी मान्यता दिली आहे. मात्र आर्थिक अडचणीत असलेल्या ठाणे परिवहन सेवेने पूर्वी इतक्या मोठ्या प्रमाणावर तिकिटांची छपाई का केली, असा प्रश्न उपस्थित होत असून त्या खर्चाचा मोठा भाग आता वाया जाणार असल्याची चर्चा सुरू आहे.

परिवहनकडे दुसरा पर्यायच नाही

या पार्श्वभूमीवर ही तिकिटे आणि पास स्क्रॅप करून नष्ट करण्याव्यतिरिक्त दुसरा पर्याय उपलब्ध नसल्याने त्यांना जाळून विल्हेवाट लावण्याची परवानगी देण्याची मागणी परिवहन विभागाने केली आहे. त्यासंदर्भातील प्रस्ताव प्रशासनाने तयार केला असून तो महासभेसमोर मंजुरीसाठी ठेवण्यात येणार आहे. परिवहन सेवेच्या साठ्यातील नष्ट करण्यात येणाऱ्या सामग्रीमध्ये ४ कोटी ६३ लाख ८५ हजार ५३७ तिकिटे, ७१ हजार ४०८ विविध पास, १३ हजार २०२ ओळखपत्रे आणि १४ हजार ५४५ अर्ज यांचा समावेश आहे. यामध्ये एप्रिल २००७ ते एप्रिल २००८ या कालावधीतील १ कोटी ९८ लाख ९० हजार ४७५ तिकिटे, ३१ मार्च २०१५ पूर्वी रद्द करण्यात आलेली १ कोटी ७ लाख तिकिटे, कळवा आगारातील २४ लाख ७४ हजार १०० आणि वागळे आगारातील १ कोटी २४ लाख ८५ हजार ५०० तिकिटांचा समावेश आहे. याशिवाय सुमारे ७१ हजार विद्यार्थी सवलत व प्रवासी पास देखील नष्ट केले जाणार आहेत.

तेल कंपन्यांकडून इंधन गुणवत्ता तपासणीत मोठी वाढ; सोशल मीडियावरील चर्चेची इंधन वितरण कंपन्यांकडून खबरदारी

Mumbai : घराबाहेर खेळत असताना दोन मुलींचे अपहरण; पोलिसांनी उत्तराखंडमधून केली सुखरूप सुटका, आरोपी अटकेत

१५ वर्षांचा संसार संपला! आदिनाथ कोठारे-ऊर्मिला कानेटकर विभक्त; मुलीबाबत पोस्टमध्ये काय म्हटलं?

Driving Licence : १ ऑगस्टपासून ड्रायव्हिंग लायसन्ससाठी डोमिसाइल प्रमाणपत्र बंधनकारक होणार? जाणून घ्या नवे नियम

Mumbai Hit-and-Run : विरुद्ध दिशेने भरधाव येणाऱ्या दुचाकीने ९ वर्षीय मुलीला उडवले; चालक फरार, CCTV मध्ये घटना कैद