ठाणे

ठाणे : माझा पोलिसांवर विश्वास नाही, माझ्याकडून जबरदस्ती सही करुन घेण्याचा प्रयत्न; प्रिया सिंगचे पोलिसांवर गंभीर आरोप

मी पोलिसांच्या कारवाईने समाधानी नाही, त्यांच्यामुळे माझी प्रकृती खराब झाली. मी मीडियाला विनंती करते माझ्यावर आरोप करू नका, मला सपोर्ट करा, असं प्रिया सिंग म्हणाली.

Swapnil S

ठाण्यातील घोडबंदर रोडवरील ओवळा भागात एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक अनिल गायकवाड यांचा मुलगा अश्वजित गायकवाडने प्रेयसी प्रिया सिंगला आपल्या मित्रांच्या मदतीने मारहाण करत तिच्या अंगावर कार घालून चिरडण्याचा प्रयत्न केला. यात प्रियाला गंभीर दुखापत झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. आज तिला एमआरआय करण्यासाठी नेत असताना तिने पोलिसांवर गंभीर आरोप केले. आपला पोलिसांवर विश्वास नसून पोलिसांनी जबदस्तीने आपल्याकडून सही करून घेण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप प्रिया सिंगने केला आहे.

यावेळी प्रिया सिंग म्हणाली, " मी पोलिसांच्या कारवाईवर समाधानी नाही. काल रात्री 10 ते 10:30 वाजेदरम्यान माझ्याजवळ दोन पोलीस आले, त्यांनी माझ्याकडून जबरदस्ती सही करुन घेण्याचा प्रयत्न केला. माझ्याजवळ वकील आणि कुटंबातील कोणीही नसल्याने मी कुठेही सही करण्यास नकार दिला. तुम्ही उद्या या, माझ्या कुटुंबातील सदस्य असतील तेव्हा मी सही करेल असं त्यांना सांगितलं. यावर त्यांनी बेटा हे तुझ्या सुरक्षेसाठी आहे. सही करुन टाक असं सांगितलं. मी नकार दिल्याने ते माझ्यावर रागावले आणि निघून गेले."

तुमच्यावर दबाव बनवला जात आहे का असा प्रश्न विचारल्यावर प्रिया म्हणाली, "मला नाही माहिती, अप्रत्यक्ष अनेक गोष्टी आहेत. मी ३०७ कलम लावण्याची मागणी केली आहे. गेल्या आठड्याभरापासून मी ३०७ लावण्याची मागणी करत आहे.मात्र ते लावलं जात नाही. माझ्यावर चुकीचे आरोप केले जात आहेत. त्यांच्याकडे सांगायला काही नाही. मी प्रत्यक्ष कोणाला भेटत नसल्याने थेट धमक्या येत नाहीत. या घटनेला अपघात दाखवण्याचा प्रयत्न केला जात आहे. माझी दोन महिला पोलीस कर्मचाऱ्याशी बाचाबाची देखील झाली. त्या याला अपघात असल्याचं सांगत होत्या. मी त्यांना हा अपघात नसल्याचं सांगितलं. हा अपघात असता तर एवढी मीडिया आली नसती. मी सात दिवसांपासून एकच गोष्ट झेलत आहे."

ती पुढे म्हणाली, " माझा पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांवर विश्वास आहे. मला फक्त न्याय हवा आहे. 307 कलम लावल्यानंतर मी बोलेल. मी पोलिसांच्या कारवाईवर समाधानी नाही. त्यांच्यामुळे माझी प्रकृती खराब झाली. मी मीडियाला विनंती करते माझ्यावर आरोप करू नका, मला सपोर्ट करा, सात दिवसांपासून मी न्याय मागत आहे. मी मानसिक दृष्ट्या खचली आहे. शारीरिक दुखापत आपण बघतच आहात. सात दिवस झाले काहीही कारवाई नाही. एक मॉडेल म्हणून माझं करिअर संपलेलं आहे. माझ्यावर केलेल्या आरोपात तथ्य नाही. देण्यासारखं माझ्याकडे पण खूप काही आहे. मात्र हळूहळू देईल. मला आता एमआरआयसाठी नेलं जात आहे. "

पुढील तपासासाठी डीसीपी अमरसिंह जाधव यांच्या नेतृत्वाखाली एसआयटी स्थापन

याप्रकरणी सखोल चौकशी करण्यासाठी डीसीपी अमरसिंह जाधव यांच्या नेतृत्वाखाली एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. यात प्रियकर अश्वजित अनिल गायकवाड याच्यासह त्याच्या साथिदारांना आरोपी म्हणून नाव देण्यात आलं आहे. याप्रकरणी सर्व पैलूंचा विचार केला जात आहे. साक्षीदारांचे जबाब नोंदवले जात असून फॉरेन्सिक पुरावे गोळा केले जात असल्याचं ठाण्याचे एसीपी जय जीत सिंग यांनी सांगितलं.

दरम्यान, ठाण्यातील कासारवडवली पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असला तरी या घटनेला इतके दिवस उलटूनही मुख्य आरोपी अश्वजित गायकवाड आणि त्याचे मित्र मोकाट फिरत आहेत. त्यांना पोलिसांनी अद्यापही अटक केलेली नाही. अश्वजीत गायकवाड हा ठाणे विभागातील भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाचा अध्यक्ष ('X' बायोनुसार) असल्याने तसंच त्याची ठाण्यातील अनेक प्रमुख नेत्यांशी राजकीय जवळीक असल्याने आणि तो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे असलेल्या एमएसआरडीसी खात्याचे व्यवस्थापकीय संचालक अनिल गायकवाड यांचा पुत्र असल्याने ठाणे पोलीस दबावाखाली कारवाई करत नाहीत काय? असा सवाल उपस्थित होत आहे.

मुख्यमंत्रीपदाचा फैसला आज; महायुतीचे नेते व केंद्रीय संसदीय मंडळ घेणार निर्णय

महायुतीत मंत्रिपदासाठी २१-१२-१० चा फॉर्म्युला

आजपासून सुरू होणारे संसदेचे हिवाळी अधिवेशन वादळी ठरणार; अदानी, मणिपूरवर चर्चा करा! सर्वपक्षीय बैठकीत विरोधकांची मागणी

यशस्वी, विराटचा शतकी तडाखा; भारताचा दुसरा डाव ४८७ धावांवर घोषित; ऑस्ट्रेलियाची ३ बाद १२ अशी अवस्था

यूपीतील हिंसाचारात तिघांचा मृत्यू; २० पोलिसांसह अनेक जण जखमी