उल्हासनगर : उल्हासनगरमधील एका नामांकित महाविद्यालयाच्या सात दिवसीय शैक्षणिक सहलीदरम्यान घडलेल्या अनपेक्षित घटनेमुळे विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घबराट निर्माण झाली. सहलीदरम्यान कथित 'भूत दिसल्याच्या' अफवांमुळे वातावरण तणावपूर्ण बनल्यानंतर काही विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडली आणि अखेर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महाविद्यालय प्रशासनाला सहल अर्ध्यावरच रद्द करण्याचा निर्णय घ्यावा लागला.
सदर महाविद्यालयाची सात दिवसांची शैक्षणिक सहल सुरू असताना उशिरा रात्री काही विद्यार्थ्यांनी विचित्र अनुभव आल्याचे सांगत कथित भुतासारखी आकृती दिसल्याची चर्चा सुरू केली. ही चर्चा काही वेळातच संपूर्ण कॅम्पमध्ये पसरली आणि विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.
सहलीच्या पहिल्याच दिवसापासून काही विद्यार्थ्यांना अस्वस्थ वाटत असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र एका रात्री अचानक अनेक विद्यार्थ्यांना चक्कर येणे, घाबरल्यासारखे वाटणे, श्वास घेण्यास त्रास होणे, अशा तक्रारी वाढल्या.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत महाविद्यालय प्रशासनाने नियोजित वेळेच्या दोन दिवस आधीच सहल थांबवण्याचा निर्णय घेतला. एका विद्यार्थिनीने सांगितले की, कॅम्पच्या सुरुवातीपासूनच वातावरण काहीसे वेगळे वाटत होते. मात्र कथित भुताच्या चर्चा सुरू झाल्यानंतर आणि काही विद्यार्थी आजारी पडू लागल्यावर सर्वांमध्ये भीती पसरली.
सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर
ही घटना कोणत्याही अलौकिक कारणामुळे नसून मानसिक तणाव आणि भीतीमुळे निर्माण झालेल्या घबराटीच्या (पॅनिक) अवस्थेमुळे घडल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. तरीही खबरदारीचा उपाय म्हणून सात ते आठ विद्यार्थ्यांना उल्हासनगरमधील मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.
मानसिक आरोग्याकडे लक्ष
या घटनेनंतर शहरात विविध चर्चांना उधाण आले असले, तरी महाविद्यालय प्रशासनाने अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. केवळ वैद्यकीय अहवालावर विश्वास ठेवावा आणि कोणत्याही गैरसमजाला बळी पडू नये, असे स्पष्ट करत विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याकडे विशेष लक्ष दिले जात असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.