ठाणे

Ulhasnagar : पोटच्या ११ वर्षीय मुलीवर वडिलांचे अत्याचार; ‘गुड टच-बॅड टच’ सत्रात विद्यार्थिनीने सांगितली धक्कादायक कहाणी

मुलींच्या सुरक्षिततेसाठी शाळांमध्ये पोलीस समुपदेशन कार्यक्रम राबवत असताना, या उपक्रमादरम्यानच एक भयंकर प्रकार उघडकीस आला.

Swapnil S

उल्हासनगर : मुलींच्या सुरक्षिततेसाठी शाळांमध्ये पोलीस समुपदेशन कार्यक्रम राबवत असताना, या उपक्रमादरम्यानच एक भयंकर प्रकार उघडकीस आला. एका ११ वर्षीय मुलीने आपल्या वडिलांकडून होणाऱ्या लैंगिक अत्याचाराची माहिती धाडसाने शिक्षिकेला दिली आणि या प्रकाराने संपूर्ण शहर हादरले. विशेष म्हणजे, पोलीस आयोजित ‘गुड टच आणि बॅड टच’ मार्गदर्शन सत्रामुळेच तिला आपल्या वडिलांचे कृत्य चुकीचे असल्याचे समजले. यानंतर तिने शिक्षिकेला सत्य सांगितले, आणि पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपी वडिलाला अटक केली आहे.

उल्हासनगरमधील एका शाळेत पोलिसांनी विद्यार्थ्यांना ‘गुड टच आणि बॅड टच’ या विषयावर मार्गदर्शन केले. यामुळे मुलींना सुरक्षिततेविषयी जागरूक करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, याच व्याख्यानामुळे एका अल्पवयीन मुलीला तिच्यासोबत घडणाऱ्या प्रसंगांची जाणीव झाली. वडीलच तिचे शारीरिक शोषण करत असल्याचे तिला समजले, आणि तिने मोठ्या धाडसाने आपल्या शिक्षिकेकडे मदतीची याचना केली.

शिक्षिकेने मुलीच्या बोलण्यातून परिस्थितीचे गांभीर्य ओळखले आणि तिने तातडीने मुलीच्या आईला याची माहिती दिली. पीडित मुलीची आई ही विभक्त राहत असून, तिच्या दोन मुली वडिलांकडे होत्या. सत्य समजताच आईने त्वरित पोलीस ठाणे गाठले आणि आपल्या पतीविरोधात पोक्सो कायद्यांतर्गत तक्रार नोंदवली.

तक्रार मिळताच पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपी बापाला अटक करण्यात आली.

ही अत्यंत गंभीर आणि संतापजनक घटना असून, पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपी बापाला अटक केली आहे. पोक्सो कायद्यांतर्गत कठोर गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे. मुलांच्या सुरक्षिततेसाठी पालकांनी आणि शिक्षकांनी सतर्क राहण्याची गरज आहे. अशा घटनांवर कठोर कारवाई करण्यास पोलीस सदैव तत्पर आहेत. - शंकर अवताडे (वरिष्ठ पोलीस निरीक्षक)

मुंबईसह राज्यातील कबुतरखाने बंद होणार; उद्योग मंत्री उदय सामंत यांची माहिती

बाळ चोरीला गेल्यास रुग्णालयाची नोंदणी रद्द होणार; राज्य सरकारचा निर्णय

मुंबई, दिल्ली मेट्रो शहरांचा झगमगाट आता संधीच्या नकाशावर मागे! आता Freshers साठी चेन्नई ठरतंय पगाराचा नवा 'हॉटस्पॉट'

आता २४ तास वाळू वाहतूक; GPS, CCTV बसवणे बंधनकारक; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची सभागृहात घोषणा

सरकारी यंत्रणा शेतकऱ्यांची मारेकरी! महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राहुल गांधी आक्रमक