Photo : X (DrSEShinde)
ठाणे

उल्हासनगरमध्ये शिवसेनेचाच महापौर; वंचितचा निर्णायक पाठिंबा, भाजप विरोधी बाकांवर बसणार

वंचित बहुजन आघाडीच्या निर्णायक भूमिकेमुळे उल्हासनगरमध्ये शिवसेनेचाच महापौर होणार, हे आता जवळपास निश्चित झाले आहे. वंचितकडून निवडून आलेल्या दोन नगरसेवकांनी रविवारी मध्यरात्री अधिकृतरीत्या शिंदे शिवसेनेला पाठिंबा दिल्याने भाजपला सत्तेपासून दूर राहावे लागणार असून विरोधी बाकांवर बसण्याची वेळ आली आहे.

Swapnil S

उल्हासनगर : उल्हासनगर महानगरपालिकेतील सत्तासंघर्षाला अखेर निर्णायक कलाटणी मिळाली असून शहराच्या राजकारणात नवे सत्ता समीकरण स्पष्ट झाले आहे. वंचित बहुजन आघाडीच्या निर्णायक भूमिकेमुळे उल्हासनगरमध्ये शिवसेनेचाच महापौर होणार, हे आता जवळपास निश्चित झाले आहे. वंचितकडून निवडून आलेल्या दोन नगरसेवकांनी रविवारी मध्यरात्री अधिकृतरीत्या शिंदे शिवसेनेला पाठिंबा दिल्याने भाजपला सत्तेपासून दूर राहावे लागणार असून विरोधी बाकांवर बसण्याची वेळ आली आहे.

उल्हासनगर महानगरपालिका निवडणुकीत भाजप आणि शिंदे गटाची शिवसेना यांच्यात अत्यंत अटीतटीची लढत झाली. भाजपला ३७, शिंदे गटाच्या शिवसेनेला ३६, वंचित बहुजन आघाडीला २, काँग्रेसला १, साई पक्षाला १ आणि एका अपक्ष उमेदवाराला यश मिळाले. ७८ सदस्यीय महापालिकेत बहुमतासाठी आवश्यक असलेल्या ४० आकड्यापर्यंत कोणताही पक्ष थेट पोहोचू शकला नव्हता. त्यामुळे सत्ता स्थापनेसाठी वंचित आणि काँग्रेसचे नगरसेवक किंगमेकर ठरले होते.

मात्र काँग्रेसच्या एका नगरसेवकाच्या पाठिंब्यानेही बहुमताचा आकडा गाठता येणार नव्हता. शिवाय राजकीय आणि नैतिक पातळीवर काँग्रेसला सोबत घेणे योग्य ठरणार नसल्याने सगळ्यांचे लक्ष वंचित बहुजन आघाडीकडे लागले होते. पहिल्यांदाच उल्हासनगर महापालिकेत प्रवेश करणारी वंचित बहुजन आघाडी या सत्तासंघर्षात निर्णायक ठरली.

या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीच्या नगरसेविका सुरेखा सोनावणे आणि नगरसेवक विकास खरात यांनी मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी जाऊन शिवसेनेला पाठिंबा देण्याचे अधिकृत पत्र सुपूर्द केले. या भेटी दरम्यान खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यासह आमदार डॉ. बालाजी किणीकर, माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी, नगरसेवक योगेश जानकर आणि शिवसेनेचे प्रवक्ते राहुल लोंढे उपस्थित होते.

वंचितने पाठिंबा दिल्याने शिवसेनेचे संख्याबळ थेट ४० वर पोहोचले असून काठावरचे पण निर्णायक बहुमत मिळाले आहे. त्यामुळे शिवसेनेची सत्ता स्थापन होण्याचा मार्ग सुकर झाला आहे.

दरम्यान, फोडाफोडीच्या राजकारणापासून वंचितचे नगरसेवक सुरक्षित राहावेत, यासाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी खबरदारी घेत त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवल्याचीही चर्चा आहे. या घडामोडींमुळे शिवसेनेचा सत्तास्थापनेचा मार्ग पूर्णपणे मोकळा झाल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

वंचित बहुजन आघाडीचे दोन नगरसेवक आणि एका अपक्ष नगरसेविकेचा पाठिंबा मिळाल्याने आता उल्हासनगर महानगरपालिकेत शिवसेना सत्ता स्थापन करणार, हे निश्चित झाले आहे. भाजप विरोधात बसणार असल्याचे स्पष्ट झाले असून काँग्रेसचा एक नगरसेवकही विरोधी बाकावर असणार आहे.

उल्हासनगर महापालिकेत सत्तास्थापनेनंतर शहरातील रखडलेली विकासकामे, पायाभूत सुविधा, पाणीपुरवठा, रस्ते आणि नागरी सोयीसुविधांना गती दिली जाईल, असा विश्वास शिवसेनेकडून व्यक्त करण्यात येत आहे. वंचितच्या निर्णायक पाठिंब्यामुळे उल्हासनगरच्या राजकारणात आता शिवसेनेचे पारडे जड झाले असून आगामी काळात शहराच्या राजकीय व प्रशासकीय घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे.

राज्यात २९ महानगरपालिकांच्या निवडणुकींचे निकाल लागल्यानंतर राज्यातील सत्ताधारी भाजप-शिवसेना (शिंदे) यांच्यात महापौरपदावरून जोरदार रस्सीखेच सुरू आहे. दोन्ही पक्ष पालिकेतील सत्तेसाठी नवनवीन डावपेच आखत आहेत.

सर्वांगीण विकासासाठी पाठिंब्याचा निर्णय

उल्हासनगरच्या विविध प्रभागांचा विकास रखडला आहे. या प्रभागांचा सर्वांगीण विकास, दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत रखडलेली विकासकामे मार्गी लावणे आणि मूलभूत नागरी सुविधांना गती देण्यासाठी शिवसेनेला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याचे या दोन्ही नगरसेवकांनी स्पष्ट केले. याआधी अपक्ष नगरसेविका सविता तोरणे-रगडे यांनीही शिवसेनेला पाठिंबा जाहीर केला होता. यामुळे उल्हासनगर महानगरपालिकेत शिवसेनेची सत्ता स्थापन करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

भारताची रशिया, यूएईकडून तेल खरेदीत मोठी वाढ; होर्मुझ सामुद्रधुनीतील वाहतूक पूर्ववत होण्यापूर्वीचा दिलासा

Mumbai : एचपीव्ही लसीकरणामुळे गर्भाशय कर्करोगावर नियंत्रण; केईएम रुग्णालयात २८२ लाभार्थ्यांना एचपीव्हीची मात्रा

Mumbai Rain : मेघगर्जनेसह पावसाचे जोरदार पुनरागमन! वांद्रे-वरळीसह अनेक भागांत मुसळधार सरी, ऑरेंज अलर्ट जारी

'मुलगा अडथळा ठरतोय'; प्रियकराच्या सांगण्यावरून आईने घेतला दोन वर्षांच्या चिमुकल्याचा जीव

NEET UG 2026 Re-Exam : फ्लश टँकमध्ये मोबाईल लपवून परीक्षेत कॉपीचा प्रयत्न; १८ वर्षीय विद्यार्थ्याला अटक