उल्हासनगर महापालिकेतील सत्तासंघर्ष संपला; महापौर शिवसेनेकडे, उपमहापौर भाजपकडे Photo : X (DrSEShinde)
ठाणे

उल्हासनगर महापालिकेतील सत्तासंघर्ष संपला; महापौर शिवसेनेकडे, उपमहापौर भाजपकडे

निवडणुकीत परस्परविरोधात लढलेली शिवसेना (शिंदे गट) आणि भाजप सत्तेसाठी एकत्र येत महायुतीच्या माध्यमातून महापालिकेवर सत्ता स्थापन करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. महापौरपद शिवसेनेकडे तर उपमहापौरपद भाजपकडे जाणार असल्याने उल्हासनगरच्या राजकीय इतिहासात महायुतीचे नवे पर्व सुरू झाले आहे

Swapnil S

उल्हासनगर : उल्हासनगर महापालिकेतील सत्तासंघर्षाचा थरार अखेर संपुष्टात आला असून शहराच्या राजकारणात निर्णायक घडामोड घडली आहे. निवडणुकीत परस्परविरोधात लढलेली शिवसेना (शिंदे गट) आणि भाजप सत्तेसाठी एकत्र येत महायुतीच्या माध्यमातून महापालिकेवर सत्ता स्थापन करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. महापौरपद शिवसेनेकडे तर उपमहापौरपद भाजपकडे जाणार असल्याने उल्हासनगरच्या राजकीय इतिहासात महायुतीचे नवे पर्व सुरू झाले आहे.

राज्यस्तरावरील राजकीय समीकरणांचा थेट परिणाम शहराच्या राजकारणावर दिसून आला आहे. दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांच्या निर्णयानुसार शुक्रवारी झालेल्या नामांकन प्रक्रियेत शिवसेनेच्या वतीने अश्विनी कमलेश निकम यांनी महापौरपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला, तर भाजपकडून अमर लुंड यांनी उपमहापौरपदासाठी अर्ज भरला. या दोन्ही पदांसाठी अन्य कोणतेही उमेदवार पुढे न आल्याने सत्ता महायुतीकडे जाणे जवळपास निश्चित झाले आहे.

नामांकनावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार कुमार आयलानी यांच्यासह महायुतीतील बहुतांश नगरसेवक उपस्थित होते. महापालिका परिसरात यावेळी मोठी राजकीय हालचाल आणि गर्दी पाहायला मिळाली. दरम्यान, शिवसेनेकडून वरिष्ठ नगरसेवक राजेंद्र चौधरी आणि डिंपल ठाकूर यांच्या नावांची महापौरपदासाठी चर्चा होती. मात्र वरिष्ठ नेत्यांच्या हस्तक्षेपानंतर अचानक अश्विनी निकम यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. नामांकनावेळी राजेंद्र चौधरी यांची अनुपस्थिती राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली.

नाराजीची कुजबुज

राजकीय जाणकारांच्या मते, अश्विनी निकम या प्रथमच निवडून आलेल्या नगरसेविका असून थेट महापौरपदाची जबाबदारी मिळाल्याने पक्षांतर्गत काही प्रमाणात नाराजीची कुजबुज सुरू आहे. त्यांना कालानी कुटुंबाच्या निकटवर्तीय मानले जाते आणि या राजकीय समीकरणामुळे सत्तागणित महायुतीच्या बाजूने झुकल्याची चर्चा रंगली आहे.

महापालिकेत विरोधी पक्षाला थारा नाही

महायुतीकडे स्पष्ट बहुमत असल्याने येत्या ३ फेब्रुवारी रोजी होणारी महापौर व उपमहापौरपदाची निवडणूक केवळ औपचारिकता ठरणार आहे. सत्तास्थापनेनंतर महापालिकेत प्रभावी विरोधी पक्ष उरणार नसल्याचा टोला खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी लगावला आहे. त्यामुळे पुढील काळात उल्हासनगर महापालिकेचे प्रशासन, निर्णयप्रक्रिया आणि राजकीय दिशा कशी राहणार याकडे शहराचे लक्ष लागले आहे.

'ज्ञानेश कुमार मस्ट गो'चा नारा! शिवाजी पार्कवर अवतरली तरुणाई; राजीनामा न दिल्यास 'पुन्हा जंतरमंतर'चा अभिजीत दीपकेंचा इशारा

'विनर्स अकॅडमी'ला ठोकले सील; दिवेआगर दुर्घटनेनंतर प्रशासनाची मोठी कारवाई

'समृद्धी'वर अपघात : ७ ठार, १९ जखमी; अमरावतीत ट्रकची पिकअप व्हॅनला धडक

दादासाहेब फाळके चित्रनगरीसाठी मानखुर्दची १४ एकर जमीन; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती

सुवर्णपदकाच्या मार्गात पाकिस्तानचा अडथळा! श्रेयसच्या नेतृत्वात भारतीय टी-२० संघाची आज अंतिम परीक्षा