ठाणे

नेरूळमधील अनधिकृत इमारती पालिकेकडून सील, रहिवाशांच्या आडून भूमाफियांचा दहशत माजवण्याचा घाट

नेरूळ येथील सेक्टर १६ मधील गार्डनसाठी राखीव असलेल्या भूखंडावर उभ्या केलेल्या अनधिकृत इमारती नवी मुंबई महापालिकेने सील केल्या आहेत. या इमारतींवर लवकरच कारवाई केली जाणार असल्याने शेकडो कुटुंब बेघर होणार आहेत.

Swapnil S

नवी मुंबई : नेरूळ येथील सेक्टर १६ मधील गार्डनसाठी राखीव असलेल्या भूखंडावर उभ्या केलेल्या अनधिकृत इमारती नवी मुंबई महापालिकेने सील केल्या आहेत. या इमारतींवर लवकरच कारवाई केली जाणार असल्याने शेकडो कुटुंब बेघर होणार आहेत. या इमारतींमधील रहिवाशांची बिल्डरने जरी फसवणूक केली असली तरी त्यांनी आपला राग शिवसेनेचे उपशहरप्रमुख सतीश रामाणे यांच्यावर काढला आहे. रहिवाशांनी विनाकारण रामाणे यांच्या कार्यालयासमोर गर्दी करून या भागात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. या इमारती भाजप पदाधिकाऱ्याच्या आशीवार्दाने उभ्या राहिल्या आहेत. भाजपवाल्यांच्याच चिथावणीमुळे दहशत माजवण्याचा घाट घातल्याची चर्चा नवी मुंबईत सुरू झाली आहे.

नेरूळ येथील सेक्टर १६ एमधील भूखंड गार्डनसाठी राखीव ठेवण्यात आला होता. मात्र या भूखंडावर भूमाफियांनी अनधिकृत इमारती उभ्या केल्या. या बांधकामाविरोधात तक्रारी झाल्यानंतर पालिका प्रशासनाने या इमारतीवर कारवाई करण्यास सुरुवात केली. मध्यंतरी या इमारतींचा पाणी आणि वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. त्यानंतरही इमारतींमध्ये रहिवासी वापर सुरूच होता. त्यामुळे गेल्या चार दिवसांपूर्वी महापालिकचे उपायुक्त राहुल गेठे यांच्या मार्गदर्शनाखाली पालिका प्रशासनाने या इमारती सील केल्या. त्यामुळे येथील रहिवासी बेघर झाले. बिल्डर आणि भूमाफियांनी या रहिवांशाची मोठी फसवणूक केली आहे. मात्र या रहिवाशांच्या आडून भूमाफियांनी दहशत निर्माण करण्याचा घाट घातला आहे. फसवणूक झालेले रहिवासी मोठ्या संख्येने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपशहरप्रमुख सतीश रामाणे यांच्या कार्यालयासमोर जमले. तुम्ही तक्रार केल्यामुळेच आमची घरे तुटणार आहेत. तुम्हीच तक्रार केली असे आम्हाला पालिकेचे अधिकारी सांगत आहेत, असे तथ्यहीन आरोप यावेळी रहिवाशांनी करून रामाणे यांच्यावर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला.

माझ्या जीवाला धोका

नेरूळ येथील सेक्टर १६ एमधील अनधिकृत इमारती माझ्यामुळे सील झाल्या आहेत. असा अपप्रचार काही भूमाफियांनी चालवला आहे. पालिकेचे काही अधिकारीही त्याला खतपाणी घालत आहेत. त्यामुळे माझ्या आणि माझ्या कुटुंबाच्या जीवाला धोका असून याप्रकरणी आपण नेरूळ पोलिसांकडे तक्रार केली आहे, असेही रामाणे यांनी स्पष्ट केले आहे.

मी कोणत्याही बांधकामाची तक्रार केलेली नाही. मी नगरसेवक असताना ३१ ऑगस्ट २०१० रोजी गार्डनसाठी राखीव असलेल्या भूखंडाचा विकास करावा म्हणून प्रस्ताव टाकला होता. त्यावेळी या भूखंडावर अनधिकृत इमारती उभा नव्हत्या. त्यानंतर उभ्या राहिल्या. या इमारतीत घरे घेणाऱ्या रहिवाशांची फसवणूक बिल्डरांनी केली आहे. त्यांनी त्यांच्या घरावर मोर्चा काढावा. विनाकारण मला लक्ष करू नये.

- सतीश रामाणे, उपशहरप्रमुख (उबाठा)

संजय राऊत यांना गंभीर आजार; बाहेर जाण्यास, गर्दीत मिसळण्यास निर्बंध, पोस्ट करीत म्हणाले - 'नवीन वर्षात भेटू'

New Rules From November 1: उद्यापासून बँकिंग, GST, आधार आणि पेन्शनमध्ये मोठे बदल; तुमच्यावर कसा होणार परिणाम? जाणून घ्या

Powai Hostage Case : 'तो आधी फ्रेंडली होता, नंतर...'; ओलिस ठेवलेल्या मुलीने सांगितला घटनेचा थरार

Powai Hostage Case : माजी मंत्री दीपक केसरकरांचा जुना व्हिडिओ व्हायरल; रोहित आर्यच्या प्रकल्पाचं केलं होतं कौतुक

कल्याणमध्ये ३० वर्षांपासून राहणाऱ्या नेपाळी महिलेचा पर्दाफाश; भारतीय कागदपत्रांसह मुंबई विमानतळावर घेतले ताब्यात