
नवी दिल्ली : भारतातील आयपीओद्वारे निधी उभारणी आणखी एका विक्रमी पातळीवर गेली असून कंपन्यांनी २०२४ मध्ये १.६ लाख कोटी रुपये उभारले आहेत. उत्तम आर्थिक वाढ, बाजारातील अनुकूल परिस्थिती आणि नियामक चौकटीमधील सुधारणांमुळे कंपन्यांना हे शक्य झाले आहे. तर पुढील वर्षासाठी ‘पाइपलाइन’मध्ये अनेक कंपन्या आयपीओद्वारे निधी उभारण्याची अपेक्षा आहे.
२०२४ मध्ये कंपन्यांनी मोठ्या प्रमाणावर निधी उभारला नाही तर त्यांचा विश्वास दिसून आला. तसेच कंपन्या सूचीबद्ध झाल्याच्या दिवसापासून उत्तम परतावा आणि दीर्घकालीन वाढीची क्षमता असलेल्या कंपन्यांकडून आणखी परतावा मिळविण्याची गुंतवणूकदारांची उत्सुकता देखील ठळक दिसून आली.
शेअर बाजाराकडे उपलब्ध असलेल्या आकडेवारीनुसार २०२४ मध्ये ९० सार्वजनिक इश्यू लॉन्च केले गेले आणि त्यांनीनी एकत्रितपणे १.६ लाख कोटी रुपये उभारले. त्यामध्ये आर्थिक वर्ष २३-२४ मधील डिसेंबरमध्ये समाप्त होणाऱ्या आठ आयपीओचा समावेश आहे. याशिवाय, युनिमेक एअरोस्पेस ॲन्ड मॅन्युफॅक्चरिंगचा ५०० कोटींचा आयपीओ २३ डिसेंबर रोजी उघडणार आहे. याव्यतिरिक्त, व्होडाफोन आयडियाने फॉलो-ऑन पब्लिक ऑफर (एफपीओ) द्वारे १८ हजार कोटी रुपये उभे केले.
२०२४ मध्ये आयपीओद्वारे सुमारे १.६ लाख कोटी रुपयांची उभारणी २०२३ मध्ये ५७ कंपन्यांनी आयपीओद्वारे उभारलेल्या ४९,४३६ कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. तुलनेने, २०२१ मध्ये ६३ कंपन्यांनी १.२ लाख कोटी रुपयांची उभारणी होऊन दोन दशकांतील सर्वोत्तम आयपीओ वर्ष गणले गेले. मुबलक तरलता, किरकोळ गुंतवणूकदारांचा वाढलेला सहभाग आणि प्राथमिक बाजारपेठेत कायम उत्साहीपणा यांचा लाभ झाला.
प्राइमडेटाबेस डॉट कॉम द्वारे प्रदान केलेल्या डेटानुसार, आयपीओद्वारे निधी उभारण्याचा उत्साह एसएमई विभागातही पोहोचला आणि या विभागाने २३८ लघु आणि मध्यम उद्योगांनी ८,७०० कोटी रुपये उभे केले, जे २०२३ मध्ये उभारलेल्या ४,६८६ कोटी रुपयांच्या जवळपास दुप्पट होते.
किरकोळ गुंतवणूकदारांचा वाढता सहभाग, मजबूत देशांतर्गत आवक आणि एफपीआयचा सक्रिय सहभाग (जरी ते दुय्यम बाजारात निव्वळ विक्रेते असले तरी), खाजगी भांडवली बाजारातील वाढ आणि पायाभूत सुविधांवर आणि प्रमुख क्षेत्रांवर सरकारचे धोरणात्मक लक्ष यामुळे भारतात निधी उभारून मजबूत पाया घातला गेला आहे, असे व्ही. प्रशांत राव, संचालक आणि प्रमुख-ईसीएम, आनंद राठी ॲडव्हायझर्सचे इन्व्हेस्टमेंट बँकिंग म्हणाले.
नवीन वर्षात निधी उभारणीचा वेग आणखी वाढण्याची अपेक्षा आहे, संभाव्यत: २०२४ च्या विक्रमी आकडेवारीला मागे टाकले जाईल, अशी अपेक्षा बाजार विश्लेषकांनी सांगितले. ७५ दस्तावेजांवर आधारित आयपीओ मंजुरी/मार्केटिंग आणि डील अशा विविध टप्प्यांवर असल्याने आम्हाला २०२५ मध्ये आयपीओद्वारे उभारला जाणारा निधी २.५ लाख कोटी रुपयांच्या पुढे जाण्याची अपेक्षा आहे, असे मुनीष अगरवाल, व्यवस्थापकीय संचालक आणि इक्विटी कॅपिटल मार्केट्सचे प्रमुख, इक्विरस म्हणाले. पुढील वर्षाच्या आयपीओ उभारण्यच्या प्रक्रियेमध्ये एचडीबी फायनान्शिअल सर्व्हिसेसचा प्रस्तावित रु. १२,५०० कोटींचा इश्यू, एलजी इलेक्ट्रॉनिक्स इंडियाचा रु. १५ हजार कोटी सार्वजनिक फ्लोट आणि हेक्सावेअर टेक्नॉलॉजीजचा ९,९५० कोटींच्या ऑफरचा समावेश आहे.
ह्युंदाई, स्विगी, एनटीपीसी ग्रीन एनर्जीने उभारला मोठा निधी
२०२४ वर्षात ह्युंदाई मोटार इंडियाचा आयपीओ ऐतिहासिक ठरला, कारण या कंपनीने देशाच्या इतिहासातील सर्वात मोठा निधी २७,८७० कोटी रुपये उभारले. त्यानंतर स्विगी (रु. ११,३२७ कोटी), एनटीपीसी ग्रीन एनर्जी (रु. १० हजार कोटी), बजाज हाऊसिंग फायनान्स (रु. ६,५६० कोटी) आणि ओला इलेक्ट्रिक मोबिलिटी (रु. ६,१४५ कोटी) यांचा क्रमांक लागतो. याउलट, विभोर स्टील ट्यूब्सने ७२ कोटी उभारून सर्वात लहान आयपीओ लाँच केला. या वर्षात मोठ्या, मध्यम आणि लहान कंपन्यांनी आयपीओद्वारे निधी उभारला. त्यांचा सरासरी इश्यू आकार २०२३ मधील ८६७ कोटी रुपयांवरून २०२४ मध्ये १,७०० कोटी रुपयांपर्यंत लक्षणीय वाढला. केवळ डिसेंबर महिन्यातच किमान १५ आयपीओ लाँच झाल्यामुळे आयपीओ बाजारात मोठा उत्साह दिसून आला.