
नवी मुंबई : मागील तीन-चार दिवसांपासून पडलेल्या मुसळधार पावसामुळे एपीएमसी भाजी मार्केट येथे विक्रीसाठी ठेवण्यात आलेला भाजीपाला मोठ्या प्रमाणात खराब झाल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. २१ जुलै रोजी व्यापाऱ्यांनी सडलेला भाजीपाला काही प्रमाणात तेथेच टाकून दिल्याचे दिसून येत आहे. २२ जुलै रोजी पाऊस ओसरल्यानंतर एपीएमसी भाजी मार्केटमध्ये साचलेला कचरा अखेर जेसीबीद्वारे उचलण्यात आला.
दुसरीकडे पावसामुळे एपीएमसी भाजी मार्केटकडे ग्राहकांनी पाठ फिरवली असून २२ जुलै रोजी भाजीपाल्याला उठाव नव्हता. त्यामुळे घाऊक बाजारात भाज्यांच्या दरात घसरण झाली. तर किरकोळ बाजारात मात्र भाजीपाल्याचे चढेच दर होते. पावसामुळे बाजारात भाजीपाल्याची आवक देखील खूपच कमी झालेली आहे. २२ जुलै रोजी एपीएमसी मार्केटमध्ये ६०० गाड्या भाजीपाल्याची आवक झाली. पण, उठाव नसल्याने भाजीपाल्याच्या किमती २५ ते ३० टक्के कमी झाल्या.